कोल्हापूरचे ‘उत्तर’ राजेश क्षीरसागर

सतीश घाटगे, कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जबरदस्त कमबॅक करत शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकावला. क्षीरसागर यांनी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा २९ हजार ५६३ मतांनी पराभव केला. क्षीरसागर यांच्या विजयाने शिवसेनेचा गड पुन्हा अभेद्द राहिला. २०१९ च्या निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षाने जिंकली होती.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांची उमेदवारी बदलून मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली, पण माघारीच्या अंतिमक्षणी मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केली. काँग्रेसने सामान्य कार्यकर्ता लाटकर विरुद्ध क्षीरसागर असा प्रचार केला. आघाडी आणि युतीकडून आरोप-प्रत्यारोपाची खैरात झाली. हात चिन्ह नसतानाही लाटकर यांचे चिन्ह असलेल्या प्रेशर कुकरचा प्रचार महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी केला. पण महायुतीने एकत्रितपणे मोट बांधून कोल्हापूर उत्तरमधील विजय खेचून आणला.

शनिवारी सकाळी कसबा बावडा येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच्य फेरीत कसबा बावड्यातील मतदारांनी लाटकरांना हात दिल्याने त्यांनी २४४२ मतांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत ते मताधिक्य ४१८४ मतांपर्यंत वाढवले. लाटकरांच्या सुरवातीच्या मताधिक्याने महाविकास आघाडीच्या गोटात समाधान पसरले, तर महायुतीच्या गोटात चिंता वाढली. तिसऱ्या, चौथ्या फेरीत राजेश क्षीरसागर यांनी मताधिक्य घेऊनही लाटकर यांनी आपली आघाडी कायम राखली होती. पाचव्या आणि सहाव्या फेरीत लाटकर यांनी पुन्हा आघाडी घेत आपले मताधिक्य ५४८५ मतांपर्यंत वाढवले. क्षीरसागर यांनी सातव्या, आठव्या, नवव्या, दहाव्या, अकराव्या फेरीत मते मिळवत मताधिक्य कमी केले. बाराव्या फेरीत लाटकरांनी नाममात्र २७३ मतांनी आघाडी घेतली.

बाराव्या फेरीनंतर राजेश क्षीरसागर यांचा झंझावात सुरू झाला. प्रत्येक फेरीत अडीच ते तीन हजारांचे मताधिक्य मिळवत क्षीरसागरांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली. १६ व्या फेरीत क्षीरसागरांनी ७५ हजारांचा टप्पा पार करत ७५ हजार ६०८ मते मिळवली. लाटकरांना ६१ हजार ६१२ मते मिळाली. क्षीरसागर यांनी १३ हजार ९९६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर दोन ते तीन हजारांचे मताधिक्य कायम ठेवत २१ व्या फेरीत क्षीरसागरांनी प्रथमच एक लाखाचा टप्पा पूर्ण करून एक लाख तीन हजार ३५८ मते मिळवली. अखेरच्या तेविसाव्या फेरीपर्यंत मताधिक्य वाढवत क्षीरसागर यांनी २९ हजार ५६३ मतांनी विजय संपादन केला. क्षीरसागर यांना एक लाख ११ हजार १८५ मते मिळवली, तर लाटकर यांनी ८१ हजार ५२२ मते मिळवली.

राजेश क्षीरसागरांना वाढदिवसाची भेट

राजेश क्षीरसागर यांचा रविवारी, २४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असून आजच्या विजयाने त्यांना कार्यकर्त्यांनी वाढदिवसाची भेट दिली. यापूर्वी क्षीरसागर यांनी २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोन वेळा विजय मिळविला, पण २०१९ मध्ये त्यांचा काँग्रेसचे उमेदवार चंद्रकात जाधव यांनी पराभव करत त्यांची हॅटट्रिक हुकवली होती. पराभव झाल्यानंतर क्षीरसागर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले होते. शिवसैनिकांची मोट बांधून, शहरात विकासकामांसाठी मोठा निधी आणून त्यांनी आपली उमेदवारी प्रबळ ठेवत विजय खेचून आणला.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी