आयडीबीआय बँकेतील भारताचा हिस्सा  विदेशी कंपनीला विकणे धोकादायक

Selling India’s stake in IDBI Bank is dangerous

मुंबई : प्रतिनिधी : आयडीबीआय बँकेतील एलआयसी व भारत सरकारचा ६०.७२% भांडवली हिस्सा कॅनडाच्या ‘फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्स लिमिटेड’ या कंपनीला ५२,२८३ कोटी रुपयांना विकण्यास केंद्र सरकारने दिलेली परवानगी ही बेकायदेशीर आहे. असा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला नसून तो संसदेला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा विदेशी कंपनीला विकणे देशहिताचे नसून ते देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्ला आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांनी केला आहे. आयडीबीआय  बँकेतील एलआयसी आणि भारत सरकारचे भागभांडवल परदेशी गुंतवणूकदाराला विकण्याचा प्रस्तावित निर्णय मागे घ्या, अशी मागणी विश्वास उटगी यांनी केली आहे. (Selling India’s stake in IDBI Bank is dangerous)

आयडीबीआय बँक प्रचंड नफ्यात

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना विश्वास उटगी म्हणाले, आयडीबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, तिची स्थापना भारत सरकारने १९६४ मध्ये ‘डेव्हलपमेंटल फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन’  म्हणून केली होती. कालांतराने तिचे रूपांतर ‘युनिव्हर्सल बँक’मध्ये झाले. गेल्या पाच वर्षांत या बँकेच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून ही बँक प्रचंड नफ्यात आहे. या बँकेची मुंबई व हैदराबाद येथे एक लाख कोटी रुपयांची जमीन आहे, देशभरात २२०० शाखा आहेत. ही बँक विकल्यास १ लाख कोटी मिळतील असा केंद्र सरकारचा अंदाज होता, तो नंतर ८२ हजार कोटी व नंतर ७२ हजार कोटीपर्यंत आला आणि आता तो ५२ हजार कोटी रुपये निश्चित केला आहे. (Selling India’s stake in IDBI Bank is dangerous)

एलआयसी पॉलिसीधारकांचे हित धोक्यात

भारत सरकारचे हे पाऊल सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या हिताच्या विरोधात आहे. या बँकांनी कठीण काळातही स्वतःला सिद्ध केले असून, त्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी एक साधन आहेत. भारत सरकारद्वारे वेळोवेळी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठीही या संस्था एक माध्यम म्हणून काम करतात. याव्यतिरिक्त, एलआयसीने २०१८ मध्ये ६१ रुपये प्रति शेअर दराने गुंतवणूक केली होती, तर आता प्रस्तावित परदेशी गुंतवणूकदार भारत सरकारने सुचवल्याप्रमाणे, त्यापेक्षा कमी किमतीत हे शेअर्स खरेदी करू इच्छित आहेत. या प्रस्तावित प्रक्रियेमुळे पॉलिसी धारकांचे हितही धोक्यात आले आहे.

निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

 आज सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँक विदेशी कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय एसबीआयसह सार्वजनिक क्षेत्रातील १२ महत्वाच्या बँकांच्या अस्तित्वावर गंडांतर आणणारा ठरू शकतो. या १२ बँकांच्या तीनच बँका करण्याचा केंद्र सरकारचा मनसुबा आहे. खाजगी बँकांमध्ये विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के असताना सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेतील जवळपास ६१ टक्के हिस्सा कसा काय विकला जाऊ शकतो, असा प्रश्न उटगी यांनी उपस्थित केला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरु झाली आहे, असेही विश्वास उटगी म्हणाले. (Selling India’s stake in IDBI Bank is dangerous)

Related posts

गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विरोधकांना धुळ चारली

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार;  मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

गोकुळमध्ये सतेज पर्व