मुंबई : प्रतिनिधी : तब्बल बारा दिवसाच्या मुक्कामानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी संपूर्ण राज्यभर जनसमुदाय रस्त्यांवर उतरला आहे. ढोल ताशांचा गजर, चिरमुरे आणि गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशी आर्त साद घालत सार्वजनिक गणेशोत्सवातील भव्य दिव्य मूर्ती मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाल्या आहेत. (Sarvajanik Ganesh immersion procession begins)
मुंबईत भव्य दिव्य मूर्तीच्या मिरवणुकीस सुरुवात
भव्यता आणि मांगल्याचा अविष्कार असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईत शुक्रवारी सकाळपासून गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी रस्त्यांवर गर्दी केली आहे. गुलालाच्या उधळणीत लालबागच्या राजाची मिरवणूकीस दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. मिरवणूकीत तरुणाईचा प्रचंड उत्साह दिसत आहे. गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूकही मार्गस्थ झाली आहे. पारंपरिक वाद्याच्या गजरात गुलाची मुक्त हस्ताने उधळण करण्यात येत आहे. अंदाजे चार टन वाजनाची पर्यावरणपूरक मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे. काळाचौकीच्या महागणपतीवर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी केली जात आहे. चिंचपोकळीचा चिंतामणीची मूर्तीही विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे. २४ फूट उंचीची मूर्ती यंदा तिरुपतीच्या रुपात साकारली आहे. (Sarvajanik Ganesh immersion procession begins)
पुण्यातील मानाचे गणपती मिरवणुकीत दाखल
पुण्यात पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. पुण्याचा कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक वाद्याचा जल्लोष पहायला मिळत आहे. आज सकाळी राज्याच्या उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दगडशेठ हलवाई गणेशाचे दर्शन घेऊन पूजा केली. सायंकाळी अनेक मंडळांनी साऊंड सिस्टीमवर मिरवणूका काढण्याची जय्यत तयारी केली आहे. साऊंड सिस्टीमला फाटा देऊन पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुका काढा असे आवाहन प्रशासनाने केली आहे. पुणे शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूरात मानाच्या तुकाराम माळी तालमीच्या गणपतीचे पूजन
कोल्हापूरात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीच्या मिरवणुकीने विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. महापौर रुपाराणी निकम, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला. महाद्वार रोड हा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण मार्ग असल्याने सायंकाळच्या सत्रात साऊंड सिस्टीमसह विद्युत रोषणाईने मिरवणुका काढण्यासाठी मंडळांनी तयारी केली आहे. मिरवणूक रेंगाळू नये म्हणून मिरवणूक मार्गावर सिग्नल व्यवस्था केली आहे. मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला एकाच जागेवर वीस मिनिटे थांबण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. रेड सिग्नल लागल्यावर मंडळाना मिरवणूक मार्गस्थ करण्याचे बंधन घातले आहे. (Sarvajanik Ganesh immersion procession begins)