जमीर काझी; मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात डावल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी सागर बंगल्यावर पुतणे समीर भुजबळ यांच्यासह जवळपास ४० मिनिटे मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा करुन आपल्या व्यथा मांडल्या. पक्षप्रमुख अजित पवार व अन्य नेत्यांना न भेटता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच गाऱ्हाणे मांडल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे. भुजबळांचा राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा इरादा स्पष्ट झाला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना आठ ते दहा दिवस सबुरी बाळगा, असा सल्ला दिला आहे. (Chhagan Bhujbal)
मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळण्यात ओबीसी समाजाचा मोठा हातभार आहे, राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिले असल्याचे सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तारात डावल्याने भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे .राज्यात ठिकठिकाणी ओबीसी समाजाचे मेळावे घेऊन ते पुढील भूमिका निश्चित करणार आहेत. ते सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत असल्याने ते राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगला गाठला. पुतणे समीर भुजबळ यांच्यासमवेत त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांना भेटून आल्यानंतर त्यांच्याशी सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की,” फडणवीस यांनी निवडणुकीत जो महाविजय झाला यात ओबीसी समाजाचे मोठे पाठबळ मिळाले असून त्याबद्दल आभार मानत त्यांनी ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. याबाबत मी काळजी घेणार आहे. राज्यात जे काही सुरू आहे, त्यामुळं मला आठ ते दहा दिवस द्या. त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू,” असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal)
भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर अजितदादांना जबाबदारी द्यायची आहे : मुख्यमंत्री
भुजबळांची आपली सविस्तर चर्चा झाली असून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. अजित पवार यांना राष्ट्रीयस्तरावर जबाबदारी द्यायची आहे .याबाबत चर्चा करून येता काही दिवसात समाधान करून तोडगा काढला जाईल, भाजपात येण्यासाठी काही मागणी केली नाही,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे : अजित पवार
छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही तो सोडवू असे उत्तर दिले. (Chhagan Bhujbal)
हेही वाचा :