कीव; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीववर हा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने ६० क्षेपणास्त्रे डागली आहेत. युक्रेनवर करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यांदरम्यान लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी बंकरची मदत घेतली.
गेल्या काही दिवसांत रशियाकडून युक्रेनवर अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत; पण ट्रम्प हेही त्यांचा शांतता फॉर्म्युला घेऊन पुढे जात आहेत. केवळ कीवमध्येच नव्हे तर इतरही काही ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. यासोबतच इराणमधून घेतलेल्या ड्रोनचाही या हल्ल्यात वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लोक अजूनही बंकरमध्ये असल्याची माहिती आहे आणि जोपर्यंत हवाई हल्ले सुरू आहेत, तोपर्यंत त्यांना बंकरमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि म्हटले आहे, की त्यांचे प्रशासन हे युद्ध संपवण्यावर लक्ष केंद्रित करेल. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे प्रशासन काम करेल असेही ट्रम्प म्हणाले.