Raju Shetty : मुख्यमंत्री साहेब या लेकींचा काय दोष ? 

Raju Shetty

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लेकीला दहावीला पडलेल्या ९२ टक्क्यांचा आनंद तुमच्या बरोबरच सगळा महाराष्ट्र साजरा करतो. त्या आनंदातूनच थोडा वेळ काढून तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा व सांगा या दुर्दैवी लेकींचा, यात त्यांचा दोष काय ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मिडियावर केला आहे. सरकार लक्ष देत नसल्याने खासदार शेट्टी यांनी दोन्ही मुलींचा संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Raju Shetty)

सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना या गावातील सचिन जाधव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून १५ दिवसापुर्वी आत्महत्या केली. आणि अर्धांगिनीची दुर्दैवी भुमिका बजावत त्याच सायंकाळी त्याच्या ७ महिन्याच्या गरोदर पत्नीनेही आत्महत्या केली. खरं तर कर्जबाजारी शेतक-याने असं किडामुंगीसारखं मरणं महाराष्ट्राला नवं नाही. भामट्यांना लाखो कोटी रूपयांची कर्ज माफ करताना काही हजारांसाठी इज्जतवान कास्तकाराला जीवाची होळी करावी लागणं ही विकसित म्हणून टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात नित्याचंच आहे.  मी त्यांच्या घरी जाऊन त्या कुटूंबाची भेट घेतली. तडे गेलेल्या  भिंती , गंजलेल्या पत्र्याचे छत व मोडकी तोडकी भांडी, आणि तिथं होते सचिनचे असहाय्य वयस्कर वडील,  त्याचा हतबल भाऊ व नकळत्या वयात आई बाप गमावलेल्या ५ व ३ वर्षाच्या कार्तिकी व श्रीया या  दोन निरागस मुली पाहून डोळे पाणावले. (Raju Shetty)

खासदार शेट्टी यांनी पोस्टमध्ये सरकारवर टीका केली आहे, ते म्हणतात सचिनचं मरणं म्हणजे शेतकऱ्याचा खोटा कळवळा आणणाऱ्या सरकारला मारलेली सणसणीत चपराक आहे. अर्थात या निष्ठूर,उलट्या काळजाच्या राक्षसांनी अशा कितीही चपराकी खाल्ल्या तरी त्यांचा निर्लज्जपणा जाणार नाहीच.  कर्ज माफ होईल या आशेवर संसाराचा गाडा ढकलणाऱ्या सचिनच्या मरणावर २८ मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेल्या  ‘ कर्जमाफी होणार नाही तातडीने पिककर्ज भरावे ‘ या फर्मानाने  शिक्कामोर्तब केले. पण कर्जमाफीच्या आशेवर बसलेल्या सचिनच्या काळजावर जणू दगडच टाकला. १५ दिवस विवंचनेत काढले, आणि त्यानंतर त्याने कर्जास कंटाळून आत्महत्या केली. लगेचच सायंकाळी त्याच्या सात महिन्याच्या गरोदर पत्नीनेही आपले जीवन संपविले. गरीबीतही आनंदात जगणाऱ्या एका घरावर जणू वरवंटाच फिरला.  (Raju Shetty)

सचिनच्या दोन निरागस मुली एक कार्तिकी व दुसरी श्रीया या दोघांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या पुढील आयुष्याचा संघर्ष डोळ्यांसमोर येतो. आई नाही, बाप नाही.बिनलग्नाचा चुलता, थकलेला आजोबा.अठरा विश्व दारिद्रय सोबतीला घेऊन या पोरी नशीबाचे चटके कुणाच्या भरोशावर सोसणार? त्या घरातून बाहेर पडल्यानंतर अशाच प्रश्नांनी गर्दी केलीय मनात…शेवटी माझंही काळीज बापाचं आहे हो…!! (Raju Shetty)

               म्हणूनच, आई – बापाविना उघड्या पडलेल्या त्या लेकरांचा, या कपटी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि दिलेल्या शब्दावरून फिरण्याच्या कृतघ्नतेमुळे बळी गेलेल्या कर्त्या पुरुषाच्या घराचा आक्रोश सरकारला दाखविण्यासाठी मी व माझे सहकारी माळसोन्ना ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रखरखत्या उन्हात पदयात्रेस सुरवात केली. पडणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर  निरागस दोन मुलींचा चेहरा व त्यांचा भविष्यातला संघर्ष माझ्या मनाला खूप वेदना देत होत्या. एका दाण्याचे  हजार दाणे करणा-या माझ्या शेतकऱ्याने अशी काय चुक केली की त्याची किंमत त्याच्या संपुर्ण कुटूंबाला चुकवावी लागत आहे? राज्यकर्त्यांनी त्यांच्या स्वार्थी सत्तेच्या हव्यासापोटी दिलेली आश्वासने एखाद्या कुटूंबाचा किती मोठ्या प्रमाणात विध्वंस करू शकतात हे या घटनेवरून लक्षात येते. एवढी भयावह घटना घडूनही राज्यातील एकाही राज्यकर्त्यांने त्याठिकाणी जाण्याच औदार्य दाखविले नाही. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर या तर महिला आहेत. एक स्त्री म्हणून जगत असताना आई , बहीण , पत्नी या सर्व भुमिका पार पाडणाऱ्या पालकमंत्र्यांना  किमान त्या लेकरांच्या संघर्षाची जाणीव होवून त्यांना  पाझर फुटेल अशी अपेक्षा होती पण ती पण फोलच ठरली. (Raju Shetty)

     रखरखत्या उन्हामध्ये या सर्व विचारात मी त्या लेकरांना सोबत घेऊन शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचलो व त्यांच्या हाताने दळभद्री सरकारला निवेदन दिले. एक जबाबदार बाप व भाऊ म्हणून माझे अंतर्मन मला शांत बसू देत नव्हते शेवटी मी ठरवलंय कि या दोन्ही मुलींची जबाबदारी आपण पार पाडायची. भलेही बाप व आई म्हणून त्यांना दररोज मायेने गोंजारण व रागावणं शक्य नाही पण त्यांना समाजात ताठ मानेन उभ करणं हे माझ कर्तव्य समजून त्या मुलींच्या संगोपनाची जबाबदारी मी स्विकारतोय, असे त्यांनी सोशल मिडियावरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे. (Raju Shetty)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर