८३ वर्षीय वर्षा गगराणी यांच्या १४ पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

Publication of 14 books by Varsha Gagrani

कोल्हापूर :  प्रतिनिधी : मराठी साहित्याचा समृद्ध वारसा हिंदी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका वर्षा गगराणी  यांनी मराठीतून हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या तब्बल १४ पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांचा भाषेवरील व्यासंग आणि साहित्य निर्मितीची ऊर्जा थक्क करणारी असून, ग्रंथाली व राजकमल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात त्यांच्या या अमूल्य प्रवासाचा गौरव करण्यात आला. (Publication of 14 books by Varsha Gagrani)

रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमास संपादक हुबनाथ पांडे,  अशोक माहेश्वरी, रमन मिश्र, राकेश शर्मा, अरुण पुराणिक, संजय पाटील, अशोक गगराणी, भुषण गगराणी, डॉ. कविता गगराणी, डॉ. सुनिलकुमार लवटे ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, कार्यक्रमाचे संयोजक धनश्री धारप यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठीतून हिंदीत भाषांतर करताना प्रतिभेचा कस लागतो

 डॉ. दामोदर खडसे म्हणाले, मला कोल्हापूरपासून नेहमीच प्रेरणा मिळते. लेखिका वर्षा गगराणी यांनी वयाच्या ८३ व्या वर्षीही केलेले पुस्तकांचे भाषांतर अत्यंत उल्लेखनीय आहे. मराठीतून हिंदीत भाषांतर करताना प्रतिभेचा कस लागतो. मराठी शब्दाला हिंदीत योग्य पर्यायी शब्द शोधून लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. अनुवादक हा दोन भाषा आणि संस्कृतींमधील ‘नाविक’ असतो, जो विचार आणि साहित्य एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवतो. अनुवादात मूळ भाषेचा भाव, संस्कृती आणि भावनिक खोली अचूकपणे उतरवणे हे मोठे आव्हान असते. ज्या अनुवादात मूळ मजकुरातून काहीही वगळले जात नाही आणि स्वतःहून काहीही वाढवले जात नाही, तोच खरा आणि परिपूर्ण अनुवाद ठरतो. हिंदी ही देशाची केंद्रीय भाषा असल्याने मराठी साहित्य देशभरात पोहोचिण्यासाठी ती प्रभावी ठरते. याचे उत्तम उदाहरण देत असताना दया पवार यांच्या ‘बलुतं’ पुस्तकाच्या आठवणी आणि त्याचे हिंदीत झालेले स्वागत, ज्यामुळे त्यांना देशभरात मिळालेली ओळख याबाबत त्यांनी विवेचन केले. (Publication of 14 books by Varsha Gagrani)

प्रत्येक स्त्रीचे जीवन एका कादंबरीसारखे

 आपल्या भावना व्यक्त करताना अनुवादिका वर्षा गगराणी म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीचे जीवन एका कादंबरीसारखे असते. आपल्या प्रवासात कुटुंबाचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतार आणि साहित्य प्रवासाचा सविस्तर पट उपस्थितांसमोर मांडला. घरातील आणि बाहेरील जबाबदारी पार पाडताना स्त्रियांना पुरषांच्या आणि पुरुषांना स्त्रियांची गरज असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या कुटुंबाला कोल्हापूरात ६१ वर्षे पूर्ण झाली आहे. विशेषत हा लक्ष्मीपूरीत राहत असतानाचे घर मालक, शेजारी मित्र मंडळी, स्नेही यांच्याकडून मिळालेला आधार व सहकार्य या बदल कृतज्ञता व्यक्त केली.  बदलत्या काळानुसार स्त्रियांनी थोडे तरी आर्थिक स्वातंत्र राखले पाहिले आणि स्वत:च्या मर्जीने काही पैसे खर्च केले पाहिजे हा विचारही त्यांनी मांडला.

संजय पाटील यांनी आपल्या मनोगतात ‘ग्रंथाली’ चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला.  ‘ग्रंथाली’च्या सुरुवातीच्या काळात विजय तेंडुलकर, कुमार केतकर, रवींद्र लागू, अरुण साधू आणि दिनकर गांगल यांच्यासोबत काम करताना एसटी बसच्या छतावर पुस्तकांचे गठ्ठे चढवल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी प्रमुख डॉ. हुबनाथ पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार हिंदी चित्रपटांचे लेखन व संवाद पूर्ण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. भाषणाच्या शेवटी अरुण कोलटकर, दासू वैद्य आणि अरुण काळे यांच्या कविता विषयक विचारांचा संदर्भ देण्यात आला; विशेषतः “माणसं भंगारात जाऊ नयेत म्हणून कविता लिहितात,” या अरुण काळेंच्या विधानाने वक्तव्याचा समारोप करण्यात आला.

चित्रपटसृष्टी बहरली, खुलली कोल्हापुरातच

लेखक अरुण पुराणिक यांनी देवानंद यांचा ‘हम दोनों’ चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमाच्या प्रेमात पडल्याची आणि गिरगावातील शाळेच्या दिवसांत नियमित चित्रपट पाहिल्याची आठवण त्यांनी सांगितले.  वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कलावंतापेक्षा एक चांगला प्रेक्षक आणि श्रोता बनून, गाणी आणि चित्रपटांचा अभ्यासपूर्ण व शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याची सवय अंगीकारली.  भारतीय चित्रपटसृष्टीची पाळेमुळे मुंबईत असली, तरी ती खरी बहरली आणि फुलली ती कोल्हापुरात बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांच्या योगदानाचा आणि ऐतिहासिक चित्रपटांत वापरल्या गेलेल्या तांग्याच्या घोड्यांच्या वैशिष्ट्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. 

हिंदी २०० वर्षाची, मराठीची परंपरा १२०० वर्षाची

डॉ. हुबनाथ पांडे म्हणाले,  वर्षा गगराणी यांच्या भाषेवरील प्रभुत्वाची प्रशंसा करताना सांगितले, हिंदी ही सुमारे २०० वर्षांची भाषा आहे, तर मराठीला तब्बल बाराशे वर्षे जुनी समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेचे साहित्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही वर्षा गगराणी यांनी मराठीतील उत्कृष्ट कृतींचा हिंदीत अनुवाद करून दोन्ही भाषांमधील संवादाचा पूल बांधला आहे.रमन मिश्र म्हणाले, वर्षा गगराणी यांनी अनुवाद क्षेत्रात केलेले कार्य हिंदी भाषिक वाचकांसाठी मराठी साहित्य अधिक सुलभ आणि समृद्ध करणारे ठरेल. त्यांच्या या उपक्रमातून आणि ऊर्जेतून आम्हा सर्व प्रकाशकांना नवीन प्रेरणा मिळाली आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. (Publication of 14 books by Varsha Gagrani)

Related posts

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंह

न्यूझीलंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत भारताचा विजय  

ऑडिओ क्लिपमधील चर्चा करणारे भाजप संबधित; सामंताची चौकशीची मागणी