ॲमस्टेलविन : पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेल्या अपयशामुळे भारतीय पुरुष हॉकी संघास प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. यजमान नेदरलँड्सने अखेरच्या चार मिनिटात निर्णायक गोल नोंदवत भारतावर ३-२ अशा गोलफरकाने मात केली. (Pro-hockey league)
प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या नेदरलँड्समधील टप्प्यामध्ये भारताला पहिल्या सामन्यात नेदरलँड्सकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारत या पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र भारतीय संघाने सोमवारच्या सामन्यात बऱ्याच टाळता येण्याजोग्या चुका केल्या. सामन्याचे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत गेल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीस भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, भारताला या संधीचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. त्यानंतर, विसाव्या मिनिटास भारताच्या अभिषेकने मैदानी गोल करून संघाचे गोलखाते उघडले. त्यानंतर, चारच मिनिटांमध्ये नेदरलँड्सकडून व्हॅन डॅम धिसने बरोबरीचा गोल नोंदवला. मध्यंतरावेळी दोन्ही संघांमध्ये १-१ अशी बरोबरी होती. (Pro-hockey league)
तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीस जेप होडमेकर्सने नेदरलँड्सतर्फे दुसरा गोल नोंदवून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या सत्रामध्ये भारताला एकूण सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु एकाही कॉर्नरवर भारताला गोल करण्यात यश आले नाही. अखेरच्या सत्रामध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यांपैकी दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर जुगराज सिंगने भारतातर्फे बरोबरीचा गोल केला. परंतु, यानंतर दोनच मिनिटात नेदरलँड्सला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जिप जेसनने चेंडू अचूकपणे गोलजाळ्यात धाडून संघाला पुन्हा ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. अखेर, ३-२ या गोलफरकासह नेदरलँड्सने विजय निश्चित केला. या विजयासह नेदरलँड्सचा संघ १० सामन्यांअखेर २० गुणांसह गुणतक्त्यात अग्रस्थानी आहे. भारताचे दहा सामन्यांमध्ये १५ गुण झाले असून भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. (Pro-hockey league)
हेही वाचा :
इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी