नवी दिल्ली/कोल्हापूर : इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड ‘प्रादा’ने नुकत्याच झालेल्या फॅशन शोमध्ये सादर केलेल्या सँडलची मूळ प्रेरणा कोल्हापुरी चप्पल असल्याचे मान्य केले आहे. आम्ही सादर केलेल्या सँडलची रचना भारतीय हस्तनिर्मित पादत्राणांपासून ‘प्रेरित’ असल्याचे म्हटले आहे. (Prada acknowledged)
नुकत्याच झालेल्या ‘प्रादा’च्या २०२६ च्या पुरुषांच्या फॅशन शोमध्ये सादर करण्यात आलेले सँडल अद्याप डिझाइनच्या टप्प्यावर आहेत. त्यांतील कोणत्याही सँडल्सचे व्यावसायिकरण झालेल्या नसल्याचेही इटालियन हाऊसने स्पष्ट केले आहे. (Prada acknowledged)
‘प्रादा’च्या प्रतिनिधीने यासंबंधीचे पत्र उत्तरादाखल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) पाठवले आहे.
‘‘प्रादा मेन्स २०२६ च्या फॅशन शोमध्ये दाखवलेले सँडल शतकानुशतकांचा जुना वारसा असलेल्या पारंपरिक भारतीय हस्तकलेनी समृद्ध असलेल्या पादत्राणांपासून प्रेरित आहे. हे आम्ही नि:संशयपणे मान्य करतो. अशा भारतीय कारागिरीचे सांस्कृतिक महत्त्व आम्ही मनापासून जाणतो,’’ असे प्रादाच्या प्रतिनिधीने चेंबरला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. (Prada acknowledged)
‘प्रादा’ला लिहिलेल्या पत्रात चेंबरने, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक हक्कांचा आदर करणाऱ्या नैतिक फॅशन पद्धतींचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर पारंपरिक कारागिरांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन आणि योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
‘प्रादा’ने फॅशन शोमध्ये सादर केलेली चप्पल पाहिली आणि चेंबरच्यावतीने आम्ही संबंधित फॅशन हाऊसला पत्र लिहिले. कोल्हापुरी चप्पलची बांधणी खूप वेगळी आहे. आम्हाला आमची पारंपरिक वेगळ्या शैलीची आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधणीची पादत्राणे नवनव्या बाजारपेठेत जावेत असे वाटते. परंतु त्याला योग्य मान्यता मिळायला हवी.
-ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
भारतीय कारागिरांसोबत देवाणघेवाणीची ‘प्रादा’ची तयारी
‘प्रादा’ची स्थापना १९१३ मध्ये मिलानमध्ये मारियो प्रादा यांनी केली. ते एक जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी फॅशन हाऊस आहे. (Prada acknowledged) ‘प्रादा’ने चेंबरला पाठविलेल्या पत्रात स्थानिक भारतीय कारागीर समुदायांसोबत अर्थपूर्ण देवाणघेवाणीची तयारी दर्शवली आहे. शतकानुशतकांचा वारसा असलेल्या जुन्या कलाकृतींना योग्य मान्यता मिळावी तसेच सांस्कृतिक सहभाग वृद्धिंगत व्हावा, यासाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, असे ‘प्रादा’चे कॉर्पोरेट (सामाजिक जबाबदारी) प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे. तसेच संबंधित कारागिरांचे संघ आमच्यासोबतच्या चर्चेत सहभागी होतील, असा आशवादही त्यांनी व्यक्त केला आहे.