Pooran : निकोलास पूरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Pooran

किंग्जस्टन : वेस्ट इंडिजचा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज निकोलास पूरनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विंडीज संघातर्फे वन-डे आणि टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या पूरनने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. (Pooran)

अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी आपण उपलब्ध नसल्याचे पूरनने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला कळवले होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचा टप्पा पूर्ण करताना पूरनने आणखी १०० आंतरराष्ट्रीय टी-२० खेळण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यामुळे त्याची निवृत्ती धक्कादायक मानली जात आहे. पूरनने सप्टेंबर, २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२०, तर फेब्रुवारी, २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय वन-डे पदार्पण केले होते. त्याने विंडीजतर्फे ६१ वन-डे सामन्यांत ३९.६६ च्या सरासरीने १९८३ धावा केल्या असून त्यामध्ये ३ शतके व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर, त्याने १०६ टी-२० सामन्यांत १३ अर्धशतकांसह २६.१४च्या सरासरीने २२७५ धावाही केल्या आहेत. विंडीजतर्फे आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने विंडीजच्या वन-डे संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. (Pooran)

पूरनने मंगळवारी सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीसंबंधी पोस्ट टाकली आहे. “बराच विचार केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त जाहीर करण्याचे ठरवले आहे. या खेळाने मला खूप काही दिले आणि यापुढेही देत राहील. विंडीजच्या गणवेशात मैदानावर उतरणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे, हे शब्दांत व्यक्त करता येणार नाही. माझ्या पाठीशी सदैव उभे राहणाऱ्या क्रिकेटचाहत्यांचा मी ऋणी आहे. विंडीज संघाला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा,” असे पूरनने म्हटले आहे. पूरनने अखेरचा वन-डे सामना जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि अखेरचा टी-२० सामना डिसेंबर, २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला. आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतरही जगभरातील लीग क्रिकेटमध्ये खेळणे पूरन सुरू ठेवणार आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पूरन लखनौ सुपरजायंट्स संघाकडून खेळत असून नुकत्याच संपलेल्या यंदाच्या आयपीएल मोसमात त्याने ५२४ धावा फटकावल्या.

हेही वाचा :
ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रू अनावर….

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर