Police arrogancy : पोलिसांचा हा माज कुठून येतो ?

Police arrogancy

जालना येथे पोलिस अधिकाऱ्यानं आंदोलकाला पाठीमागून धावत येऊन लाथ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून पोलिसांच्या मुजोरीबद्दल संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला काही वर्षांपूर्वीची उत्तर प्रदशातील एक घटना आठवली. (Police arrogancy)

डॉ. विजय चोरमारे

उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात पिलखुआ पोलिस ठाण्यात काही वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आठवली. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रदीप तोमर याला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं. एका खुनाच्या प्रकरणात प्रदीप तोमरच्या भावाचं नाव आलं होतं. त्याप्रकरणी चौकशीसाठी प्रदीप तोमरला बोलावलं होतं. फक्त चौकशीच तर होती. त्यामुळं प्रदीप आपल्या दहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात गेला. तिथं दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला गुरासारखं बडवलं. विजेचे शॉक दिले. मारहाण करीत असताना पोलिस दारुसुद्धा पीत होते. दारुच्या नशेत ते हैवान बनले होते. मात्र त्याचवेळी पाणी मागणाऱ्या प्रदीप तोमरला पोलिसांनी पाणीही दिलं नाही. वडिलांच्यावर होणारे हे अत्याचार दहा वर्षांचा मुलगा उघड्या डोळ्यांनी पाहात होता. मारहाणीनं प्रदीप अर्धमेला झाला. बाहेर असलेल्या मुलाला गंडवण्यासाठी दहा रुपयांचे एक चिप्सचे पाकिट पोलिसांनी आणून दिलं. म्हणजे नको तिथे पोलिसांची सहृदयता कशी ओसंडत असते बघा. प्रदीप तोमरला नंतर दवाखान्यात दाखल केलं, तिथं त्याचा मृत्यू झाला. (Police arrogancy)

ही घटना आठवण्याचं कारण म्हणजे जालना येथे अनंत कुलकर्णी नामक पोलीस अधिकाऱ्याने एका आंदोलकाला पाठीमागून धावत येऊन फिल्मी स्टाइल लाथ मारली. त्यावेळी पोलिसांच्या सोबत त्या गृहस्थाचा छोटा मुलगाही चालत होता. छोट्या मुलासमोर बापाला लाथ मारताना संबंधित पोलिस अधिकाऱ्याला काही वाटलं नसेल का, असा प्रश्न यानिमित्तानं मनात आल्यावाचून राहात नाही.. (Police arrogancy)

सामान्य जनतेला त्रास देण्याचा अधिकार नाही

पोलिसांना कामाचा ताण असतो. त्यांना सुट्ट्या मिळत नाहीत. कुटुंबासाठी वेळ देता येत नाही, अशा अनेक समस्या सांगितल्या जातात. त्या चुकीच्या नाहीत. त्या खऱ्या आहेत. स्वास्थ्य मिळत नसल्यामुळे ते गुन्हेगारांशी हिंसक वागतात, असा युक्तिवादही अनेकदा केला जातो. आता पोलिसांना रजा, सुट्ट्या मिळत नाहीत. कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. सणवार साजरे करता येत नाहीत. लोकांनी सणवार साजरे करावे म्हणून ते अहोरात्र रस्त्यावर असतात. हे खरेच आहे. पण त्यांचे हे प्रश्न सरकारशी संबंधित आहेत. सरकारच्या निष्क्रियतेमुळे किंवा उदासीनतेमुळे किंवा चुकीच्या हाताळणीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असेल, म्हणून त्यांना सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही.

सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार

प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी, मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा आधिकार आहे. आंदोलन सत्तेविरोधातच असते. सरकार विरोधातच असते. परंतु संबंधित विषयांवर संवाद साधून मार्ग काढता येऊ शकतो. ते न करता आंदोलन मोडून काढायचे. आंदोलकांना मारहाण करायची असले मार्ग पोलिसांकडून अवलंबले जातात. आताच नाही, तर वारंवार या गोष्टी घडत असतात. जालन्यातील प्रकारही अशाच मानसिकतेतून घडला आहे. (Police arrogancy)

कोण कुठला फालतू माणूस येतो. सतत निवेदने देतो. आंदोलनाचे इशारे देतो. आणि स्वातंत्र्यदिनी थेट पालकमंत्र्यांना भेटायची इच्छा व्यक्त करतो….. पोलिसांना हे सहन झाले नसावे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर होत्या. त्यांच्या ताफा जात असताना एका आंदोलकाने त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलीस ठाण्यात नेत असताना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी धावत येऊन फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लाथ घातली. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. (Police arrogancy)

नेमकं हे प्रकरण काय आहे…

जालना शहरातील चौधरी कुटुंबातील सून लग्नानंतर घटस्फोट न घेता निघून गेली. तिने दुसरं लग्नही केलं. याची तक्रार कुटुंबातील पती गोपाळ आणि रमेश चौधरी यांनी पोलिसांत केली होती. मात्र पोलिसांनी सुनेच्या उलट तक्रारीवरूनच चौधरी कुटुंबावर गुन्हा दाखल केला. त्यामुळं चौधरी कुटुंबाने गेल्या अनेक दिवसांपासून सुनांसह त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलनाचा पावित्र घेतला. मात्र कुणीच दाद देत नसल्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा जात असताना चौधरी कुटुंबातील लोकांनी त्यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं. पैसे खाऊन पोलीस आपल्याविरोधात कारवाई करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्री पंकजा मुंडे येत असल्याने आपल्याला त्यांना भेटू द्या अन्यथा आत्मदहन करू असा इशारा आंदोलकांनी दिला होता. तर दुसरीकडे आंदोलकांनीच महिला पोलिसांच्या अंगावर रॉकेट टाकण्याचा प्रयत्न केल्याने आम्हाला बळाचा वापर करावा लागला असा खुलासा पोलिसांनी केला आहे. संबंधित व्यक्तिच्या पत्नीने अमरावती जिल्ह्यात जाऊन लग्न केले आहे, आणि ते प्रकरण आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, ते अमरावती पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येते हे सांगूनही संबंधिताला पटत नाही, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून आम्हाला मुद्दाम त्रास दिला जात असल्याचा चौधरी कुटुंबीयांचा आरोप आहे.

पोलिसांचे यातले म्हणणे काहीही असू शकते.  परंतु एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने भर रस्त्यात स्टंट करावा. थिल्लरपणा करावा, लहान मुलासमोर त्याच्या बापाला लाथ मारावी, हे कुठल्याही पातळीवर समर्थनीय ठरू शकत नाही.

वेगवेगळ्या प्रकरणांच्या निमित्ताने राज्यातील पोलिसांचे अपयश आणि निष्क्रियता समोर येत आहे. गृहखात्याच्या अपयशाची चर्चा होत आहे. त्यातच पोलिसांच्या अशा मुजोरीमुळे आणि संवेदनहीनतेमुळे पोलिसांची प्रतिमा अधिकच खालावत चालली आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर