इम्फाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (१३ सप्टेंबर) मणिपूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते चुराचंदपूर आणि इम्फाळमधील अंतर्गत विस्थापित लोकांशी संवाद साधतील, असे राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी सांगितले. (PM to visit Manipur)
राज्यात दोन वर्षे प्राणघातक वांशिक हिंसाचार धुमसत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात ते ८,५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या कामाचा प्रारंभ करणार आहेत.
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यामुळे राज्यात शांतता, सामान्यता आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास गोयल यांनी शुक्रवारी (१२ सप्टेंबर) व्यक्त केला. त्यांनी मोदींच्या दौऱ्याची माहिती यावेळी माध्यमांना दिली. (PM to visit Manipur)
कुकी आणि मेईतेई समुदायांमधील संघर्षांमुळे झालेल्या चुराचंदपूर येथील पीस ग्राउंडवरून मोदी ७,३०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. राज्याची राजधानी इम्फाळ येथून मोदी एकूण १,२०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उदघाटनही करतील. (PM to visit Manipur)
कुकी आणि मेईतेई समुदायांमधील वांशिक संघर्षानंतर राज्याला एकदाही भेट न दिल्याबद्दल मोदी यांच्यावर विरोधी पक्षांकडून वारंवार टीका सुरू होती. या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा होत आहे. मे २०२३ पासून कुकी आणि मेईतेई समुदायांमधील वांशिक संघर्षामुळे २६० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत.
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
दरम्यान, इम्फाळ आणि चुराचंदपूर जिल्हा मुख्यालय शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इम्फाळमधील सुमारे २३७ एकरच्या कांगला किल्ल्याभोवती आणि चुराचंदपूरमधील शांतता मैदानावर राज्य आणि केंद्रीय दलांचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत.