काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला मंगळवारी (२३ एप्रिल) पहेलगाममध्ये झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, असे घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांनी सांगितले आहे. निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, पण… (Pahelgaum attack)
-विजय चोरमारे
पहेलगाममधील हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ नामक संघटनेने घेतली आहे. टार्गेट किलिंग हे या संघटनेचे वैशिष्ट्य राहिले आहे. विशिष्ट लोकांना लक्ष्य बनवायचे. मग ते हिंदू असतील किंवा काश्मिरच्या बाहेरचे असतील. पहेलगामचा ताजा हल्ला त्याच प्रकारातला आहे. यानिमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक घटनांना उजाळा मिळाला आहे. त्या सगळ्याचा आढावा.
दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्याचे समाजमाध्यमांतून आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतूनही व्हायरल करण्यात आले. जेव्हा ‘आज तक’चा रिपोर्टर लाईव्ह सांगत होता, की जिथे हजारो पर्यटक होते त्या पहलगाममध्ये एकही पोलिस नव्हता, ही सुरक्षेतील गंभीर त्रुटी आहे. त्यावेळी त्याला अचानक तोडून पुढची बातमी घेतली जाते. म्हणजे समाजमाध्यमांपासून मेनस्ट्रीम मीडियापर्यंत सगळ्या गोष्टी किती सुनियोजितपणे राबवल्या जाताहेत, हे दिसून येते. म्हणजे पुलवामा हल्ला झाला, चाळीस जवान शहीद झाले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना घडली. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यासंदर्भात केंद्र सरकारचे पुरते वस्त्रहरण केले आहे. परंतु त्या घटनेचाही राजकीय फायदा उचलून लोकसभा निवडणुका जिंकल्या. चाळीस किलो आरडीएक्स कुठून आले, याचे उत्तर अद्याप देशवासीयांना मिळालेले नाही. (Pahalgam attack)
मंगळवारी पहेलगाममध्ये काय घडले, ते आधी पाहूया.
पहेलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात किमान २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह देशभरातील नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. काश्मीरमध्ये यंदा मोठ्या संख्येने देशविदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. पहेलगाम शहरापासून सहा किलोमीटरवर बैसरनचे गवताळ पठार आहे. पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अनेक पर्यटक येथे आले असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. मोकळे मैदान असल्यामुळे पर्यटकांना कुठे लपताही आले नाही. गोळीबार करून दहशतवादी पळून गेले. स्थानिक नागरिकांनी खेचरांवरून अनेक जखमींना रुग्णालयात नेले. थोड्या वेळाने पोलिस तसेच लष्कराची पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून तीन संशयितांची स्केचेसही जारी करण्यात आली आहेत. (Pahalgam attack)
सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी हल्ल्याचा ‘एक्स’ समाजमाध्यमावरून निषेध केला असून, दोषींना कडक शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली. तर ओमर अब्दुल्ला यांनी गेल्या काही वर्षांत सामान्य नागरिकांवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे म्हटले असून हल्लेखोरांना श्वापदे असे संबोधले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जेद्दाहमध्ये असलेल्या पंतप्रधानांबरोबर संवाद साधला. घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधानांच्या सूचनेवरून शहा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तातडीने श्रीनगरला रवाना झाले. दिल्लीत असलेले जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, गुप्तचर संघटनेचे (आयबी) संचालक तपन देडा यांच्यासह गृह खात्यातील वरिष्ठ अधिकारीही शहा यांच्याबरोबर श्रीनगरला गेले. (Pahalgam attack)
आसावरी जगदाळे यांनी सांगितलेली माहिती
दहशतवाद्यांच्या भीतीने आम्ही तंबूत शिरलो. त्यांनी माझे ५४ वर्षीय वडील संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील कलमा म्हणण्यास सांगितले. त्यांनी जेव्हा म्हटल्या नाहीत तेव्हा त्यांना गोळ्या घातल्या असे २६ वर्षीय आसावरी जगदाळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘वडील जमिनीवर कोसळल्यावर त्यांच्या शेजारी असलेल्या काकांनाही गोळ्या घातल्या. आम्ही पाच जण होतो. स्थानिक पोलिसांप्रमाणे हल्लेखोरांचा वेश होता. आम्हाला सुरुवातीला दहशतवादी व सुरक्षारक्षक यांच्यात ही चकमक सुरू आहे असे वाटले. दहशतवाद्यांच्या गटाने सुरुवातीला शेजारच्या तंबूत गोळीबार केला. त्यानंतर आमच्या तंबूकडे येत माझ्या वडिलांना ‘चौधरी तू बाहर आ जा,’ असे दरडावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याबद्दल शेरेबाजी केली. पाठोपाठ काश्मिरी दहशतवादी निरपराध महिला व मुलांना ठार मारणार नाहीत असा दावा केला. पोलिस किंवा लष्कराचे जवान घटना घडल्यानंतर २० मिनिटांनी आले. ज्या व्यक्ती आम्हाला तेथे घेऊन गेल्या त्यांनी आम्हाला परतण्यास मदत केली. आम्हाला पहेलगाम क्लब येथे हलविण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता हल्ला झाला. मात्र पाच तासांनंतर माझे वडील किंवा काकांबद्दल काहीही माहिती देण्यात आली नाही.’’
देशात हिंदू-मुस्लिम भावा-बहिणीप्रमाणे राहतात. दोन्ही धर्मातील लोकांच्या घट्ट मैत्रीची अनेक उदाहरणे आहेत. परंतु राजकारणासाठी धार्मिक विद्वेष पसरवणारे लोक दोन्हीकडे आहेत, त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत असल्याची भावनाही आसावरी यांनी बोलून दाखवली.
दहशतवाद आणि धर्म
पहेलगाममधील हल्ला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कोणताही दोष नसलेल्या निष्पाप नागरिकांचे त्यात बळी गेले आहेत. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, असे जे सांगितले जाते ते खरे असेल. परंतु त्यावरून लगेच विद्वेष पसरवणारी मंडळी चेकाळली आहेत. ‘बघा दहशतवादाला धर्म नसतो म्हणता ना, इथे दिसला दहशतवादाचा धर्म.’ ‘नाहीतर मग जात नाही विचारली, धर्म विचारला,’ अशा पोस्ट करून लगेच धार्मिक कलह वाढवण्यास सुरूवात झाली. आजच्या उथळ जगात हे होणे स्वाभाविक आहे. सरकारचे अपयश लपवण्यासाठी अशा गोष्टी करणे ही त्यांची मजबुरी आहे, पण त्यापलीकडे जाऊन आपण समाज म्हणून, व्यवस्था म्हणून विचार करणार का, हा खरा प्रश्न आहे. (Pahalgam attack)
पहिली गोष्ट नोटाबंदीची…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली. सामान्य व्यावसायिकांना देशोधडीला लावले. त्याचे कारण सांगितले होते, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी.
परंतु त्यानंतरही मोठे दहशतवादी हल्ले झाले. पुलवामा हे त्यातले प्रातिनिधिक.
जम्मू-काश्मिरमधील ३७० कलम हटवले. म्हणाले, दहशतवादाला पायबंद बसला. तिथं कुणीही जमिनी खरेदी करू शकतो. पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी पाठ थोपटून घेतली.
तरीही पहेलगामचा दहशतवादी हल्ला झाला.
हल्ला घडला तेव्हा घटनास्थळी असलेले लोक सांगत होते -, पहेलगामकडे जाताना अनेक ठिकाणी तपासणी नाके होते आणि तिथे कठोर सुरक्षा व्यवस्था होती. ती असणे स्वाभाविक आहे. पण ज्या ठिकाणी हजारो पर्यटक होते, तिथे मात्र पोलिस किंवा सुरक्षा दलाचे जवान कुणी नव्हते. घटना घडल्यानंतर सुमारे वीस मिनिटांनी ते घटनास्थळी दाखल झाले. (Pahalgam attack)
सुरक्षा यंत्रणेतला हा मोठा गोंधळ आहे. त्याची जबाबदारी कुणाची? हजारो पर्यटक असलेल्या ठिकाणाच्या सभोवती सुरक्षा व्यवस्था नको का? मोकळ्या माळावर दहशतवादी येतात. मृत्यूचे तांडव घडवतात. आणि आले तसे पसार होतात. सुरक्षा व्यवस्थांना ना आधी काही कळते. ना नंतर ते सापडतात.
इतके सगळे होऊनसुद्धा चर्चा कशाची– तर दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या.
‘जय श्रीराम’ म्हणायला लावून अल्पसंख्याकांचे मॉब लिंचिंग करणे आणि धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घालणे या प्रवृत्तींमध्ये काहीच फरक नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटींची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांवर येते की नाही? मुर्शिदाबाद दंगलीबद्दल जर ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितला जात असेल तर पहेलगाम घटनेबद्दल अमित शाह यांचा राजीनामा मागायला नको का? (Pahalgam attack)
अशावेळी मात्र राजकारण नको म्हणून गळे काढले जातात.
देशात जे हिंदू-मुस्लिम विद्वेषाचे राजकारण केले जाते, त्याची ही परिणती आहे, हे लक्षात घ्या. धर्माचे विष अन्य कशापेक्षाही फोफावत जाते. आग लागली तर ती लावणाऱ्यांनाही कवेत घेते. आगच असते ती.
पहेलगाममध्ये एक स्थानिक मुस्लिम तरुणाचाही बळी गेलाय. तो कुटुंबातला कर्ता होता.
हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनीच जखमींना दवाखान्यात नेले, ही गोष्ट विसरून चालणार नाही.
आणि दहशतवादी हल्ल्यात निष्पापांचे बळी गेले. कुणी आपला बाप, भाऊ, नवरा गमावला. हसती खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
दहशतवादी हे कुठल्या धर्माचे नव्हे, तर देशाचे दुश्मन असतात. भले त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असतील. त्याचा फटका स्थानिक मुस्लिमानांनाच बसणार आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. म्हणजे स्थानिक मुसलमानांच्या पोटावरही त्यांनी पाय दिला आहे.
दहशतवाद्यांचा खात्मा करायला पाहिजे. त्यांचे जे आका असतील त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनाही धडा शिकवायलाच पाहिजे. पाकिस्तानचे तुकडे करून स्वतंत्र बांगला देश निर्माण करणारा हा देश आहे. अशा हल्ल्यांना ‘ईट का जवाब पत्थर,’ या न्यायाने प्रतिकार करायलाच पाहिजे. देश म्हणून करायला पाहिजे. पण धार्मिक विद्वेष पसरवून देशातील वातावरण बिघडवायचे आणि निवडणुका जिंकायच्या असले घाणेरडे राजकारण थांबायला पाहिजे.
सर्वसामान्य लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरेही कधीतरी मिळायला पाहिजेत…
- उदाहरणार्थ – पुलवामा होऊन सहा वर्षे झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कसे आणि कुठून आले. जवानांना नेण्यासाठी विमानाची मागणी करण्यात आली होती ती का नाकारली आणि जवान रस्त्याने जाणार आहेत ही माहिती दहशतवाद्यांपर्यंत कशी पोहोचली…. या प्रश्नांची उत्तरे केंद्रातल्या सध्याच्या सरकारने कधीतरी द्यायला पाहिजेत.
- पहेलगाम हल्ल्याबाबतही असेच प्रश्न पडतात. म्हणजे पर्यटकांची एवढी गर्दी असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती
- अंधाधुंद गोळीबार सुरू असताना सुरक्षा दले घटनास्थळी का पोहोचली नाहीत आणि त्यातल्या एकालाही पकडण्यात त्यांना यश का आले नाही
- दहशतवादी संघटना हल्ल्याची जबाबदारी घेतात. परंतु सरकारमधल्या कुणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. ती घेतली जात नाही. उलट आपल्या नामुष्कीचे भांडवल करून निवडणूक जिंकण्याच्या कामाला लागतात. आजवर हे चालत आले आहे. आणि भविष्यातही यापेक्षा वेगळे काही घडेल असे दिसत नाही.