हिंदुदुर्ग!

महाराष्ट्राचे माजी मुमं तथा माजी
केन्द्रीय सूक्ष्मोद्योग मंत्री ना. ता. राणे यांचे
प्रथम चिरंजीव माजी खासदार, विद्यमान आमदार डॉ. निलेश,
द्वितीय सुपुत्र विद्यमान आमदार नितेश, तसेच
आमदार दीपक केसरकर यांचे सेवेशी (Rane-Kesarkar )
साष्-टांग नमस्कार वि.वि.

कालच्या मंगळवारी म्हणजे १० डिसेंबरला बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरुपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी म्हणून आपल्या तिघांच्या राजकीय पुढाकाराने सिंधुदुर्ग नगरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला तो पाहून आमची छाती अक्षरश: ५६ इंचापेक्षा जास्त फुगली आणि अतिरिक्त अभिमानाने अंगावरचा बनियनही टराटरा फाटून गेला. बनियन एक फाटला तर दुसरा घेता येतो; पण हिंदुत्व फाटले तर ते पुन्हा जोडता जोडताना नाकी नऊ येतात, हा मोहनराव भागवतांचा अनुभव असल्याने यापुढे कितीही चड्ड्या आणि बनियन फाटली तरी हिंदुत्वाचा फुगलेला अभिमान आम्हीही कमी करणार नाही, असा शब्द आम्ही आपणांस यानिमित्ताने देत आहोत. (Rane-Kesarkar)

माननीय राणे बंधुजी, पूर्वी आपले पिताश्री आणि गरीब कोकण्यांचे अदानी अर्थात नारायण तातू राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अभिजात समाज सेवक दीपकभाई केसरकर यांची लुटुपुटुची दशावतारी लढाई पाहण्यासाठी हजारेांची गर्दी कधीही आणि कुठेही जमा होत असे. ‘राणे साहेबांच्या दहशतवादाविरुद्ध माझी लढाई आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मी ती दहशत हद्दपार करणार आहे,’ अशा घोषणा करत दीपकभाई निवडून यायचे. तथापि, आता ते (म्हणजे केसरकर) तुमच्या खांद्याला खांदा लावून बांगलादेश मधल्या दहशतवादाविरुद्ध लढू लागले आहेत, हे एक अभूतपूर्व दृष्य, होय असेच म्हणावं लागेल. मोर्चामध्ये विहिंप, आरएसएस, सनातनवाले वगैरे मंडळीही आता सामील असल्यामुळे, मोर्चाचे निवेदन घेतल्यावर सिंधुदुर्गनगरी ऊर्फ ओरोस येथील जिल्हाधिकारी जिल्ह्याचे नाव आपल्या अधिकारात बदलून हिंदुदुर्ग करतात की काय असे क्षणभर उपस्थित पत्रकारांना वाटून गेले. मोर्चा भव्य होता आणि दिव्य तर होताच होता. या मूक मोर्चाचा आवाज ओरोस पासून बांगलादेशची राजधानी ढाक्यापर्यंत पोहोचायला किती दिवस लागतील माहीत नाही. (Rane-Kesarkar)

बांगलादेशामध्ये हिंदुंवर जो अन्याय आणि अत्याचार होत आहेत, त्याचा तीव्र निषेध भारत सरकारने अधिकृतरित्या केला आहेच. आणि वेळ आलीच तर आरएसएसचे स्वयंसेवकही लाठ्याकाठ्या घेऊन बांगलादेशवर तुटून पडायला कमी करणार नाहीत. असे असताना सिंधुदुर्ग नगरीत हा ॲडिशनल मोर्चा काढून बांगलादेशला इशारे देण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न एका मालवण्याने तिरक्या चालीत आम्हांस कालच विचारला. त्याला आम्ही, `सिंधुदुर्गचे मूळ नाव हिंदुदुर्ग होते आणि हे स्पष्ट करणारा एक शिलालेख राणेंच्या फणसवाडी गावात सापडण्याची शक्यता आहे,` असे उत्तर देऊन गप्प बसवले.

‘कोकणची माणसे साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी..’ हे रमेश अणावकर यांचे गीत कोकणची आणि कोकणी माणसाची बदनामी करणारे आहे, अशी चर्चा या आपल्या मोर्चामुळे सुरु झाली आहे, हा एका दृष्टीने, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने फायदाच झाला आहे. साधेभोळे राहून विकासही होत नाही आणि प्रगतीही होत नाही. भोळ्या, खुळ्या मतदारांना फसवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष नेहमीच आघाडीवर असतात. आजवर कोकणची माणसे साधीभोळी अशी इमेज आणि नॅरेटिव सर्वत्र प्रसारित केले गेले असल्यामुळे कोकण्यांना फसवण्यासाठी जास्त मेहनत कुणाला घ्यावी लागली नाही. आता ही कोकणची इमेज बदलायला सुरुवात केली सन्माननीय नारायण तातू राणे यांनी आणि आतातर त्यांचे दोन चिरंजीव व एके काळचे विरोधक हे पुढे सरसावून, कोकण म्हणजे ‘हिंदू विरोधकांना ठोकण’ अशी नवी इमेज निर्माण करण्यासाठी कार्यरत झाले आहेत. याची दखल कुठंतरी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारच आहे. तसे झाल्यास येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कदाचित दोन राणे बंधू व एक केसरकर यांना विभागून एक तृतीयांश समप्रमाणात ‘भारतरत्न’ पुरस्कारही दिला जाऊ शकतो.

दस्तुरखुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांवर आणि फळबागांवर आणि पारंपरिक मासेमारी इत्यादींवर बांगलादेशमधील हिंदुंपेक्षा भीषण अत्त्याचार होत आहेत आणि त्याविरुद्ध आवाज उठवल्यास राष्ट्रद्रोहाचा शिक्का आपल्यावर बसेल, अशी सूज्ञ नागरिकांत भीती पसरल्याची अफवा जिल्ह्यामध्ये पसरली आहे. अगदी आमच्यासारख्या जुन्या जाणत्या विनम्र बालकांचा अशा अफवांवर मुळीच विश्वास नसतो, हे आपणांस माहित आहेच. फोंडाघाटहून करुळमार्गे कणकवलीला ईमर्जन्सी डिलीव्हरी बेसीस ऑटोरिक्षाने किंवा स्वत:च्या वाहनाने येत असताना गेल्या महिनाभरात रस्त्यात मध्येच बारा बायका बाळंत झाल्या, अशीही अफवा जोरात आहे. वैभववाडीत रस्त्यांची परिस्थिती उबाठा गटासारखीच म्हणजे अगतिक आणि केविलवाणी झालेली आहे, असे त्या गटाचे नुकतेच भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक रणजित तावडे यांचे मत आहे. मा. नितेशजी, आपण या तावडेंचे अलिकडेच मोठे वाजत-गाजत स्वागत केले, हे चांगलेच झाले. बांगलादेशची कढी पातळ करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा कितपत उपयोग होईल माहीत नाही. पण वैभववाडीच्या रणजित तावडेंचा काही उपयोग करुन घ्यावा, ही विनंती.

माननीय नितेशजी, अहमदनगर जिल्ह्यात अशाच एका प्रसंगी रामगिरी महाराजांचे समर्थन करतांना, ‘मशिदींमधे घुसून एकेकाला वेचून खतम करु’ अशा आशयाचे विधान केल्याबद्दल आपणावर श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल आहे. असे असतांना मंगळवारच्या सकल हिंदु मार्चात सिंधुदुर्गनगरी येथे ‘पोलिसांनी पाच मिनिटे सुट्टी घेऊन घरी बसावे, आम्ही पाच मिनिटांत बांगलादेशींना किड्यासारखे चिरडून टाकू,’ असे विधान आपण केलेत, या आपल्या धाडसाला खरोखरच दाद दिली पाहिजे. समस्त सिंधुदुर्गवासीयांनाच काय पण समस्त बांगलादेशवासीयांना आपल्या शूरपणाबद्दल इतकी खात्री आहे की, रोहिंग्या बांगलादेशींनी भारत सरकारकडे वाय सिक्युरिटी मागितल्याची अफवा सुद्धा वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदुत्ववादी विचारांचे तीन आमदार आहेत आणि देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील हिंदुंना सुखासमाधानाचे जीवन जगण्यासाठी बळ मिळेल, अशी आशा बहुसंख्य हिंदुंना वाटते आहे. पण शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासारख्या हिंदुंना आणि केंद्रात सोनिया, प्रियांका, राहुल गांधीसारख्या आणि केजरीवालांसारख्या हिंदुंना तशी आशा वाटत नाही. ईव्हीएम नावाचे रोहिंगे पोसून भारतातील खोटे हिंदुत्ववादी, खऱ्या हिंदुत्ववाद्यांवर बांगलादेशप्रमाणेच अत्याचार करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांना उत्तर देण्यासाठी
पुढील मोर्चा कधी निघतो
याची वाट पाहणारा…

आपला,
विनम्र बालक

ताव ‘डे’१९/११
असुनी नाथ
स्नेहबंध आणि स्नायूबंध

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

पोटातले ओठावर!