सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले
संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे
कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त,
माजी काळजीवाहू मुख्यमंत्री,
विद्यमान उपमुख्यमंत्री
माननीय श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांचे चरणी
कोपरापासून हात जोडून
साष्-टांग नमस्कार.
नको इतके बहुमत महाराष्ट्र विधान निवडणुकीत महायुतीला मिळाल्यानंतर प्रस्तावित मुख्यमंत्रीपदाबाबत बरीच भवती न भवती झाल्यावर या शर्यतीतून माघार घेतल्याबद्दल आपले करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे आणि मानावे तेवढे आभार कमीच आहेत. निवडणुकीचे निदान आल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव आपण आपल्या दरे या गावी निघून गेल्याने महायुतीच्या बैठका लांबल्या आणि फडणविसांची काळजी एवढी वाढली की शिंदेंना मुख्यमंत्री करा-मी काळजीवाहू आहेच असं ते आपल्या श्रेष्ठींना सांगतात की काय अशी भीती संघ परिवाराला वाटू लागली. विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीला असे निर्विवाद बहुमत मिळाले असते आणि तरीही त्यांनी वेळकाढूपणा केला असता तर सन्माननीय राज्यपाल महोदयांनी दोन-तीन दिवस वाट बघून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली असती. तथापी, ते तर बिचारे हुकूमाचे ताबेदार असल्याने तुम्ही मंडळी सरकार कधी स्थापन करता याची वाट पहात बसले.
शेवटी कसा का होईना पण शपथविधी समारंभ संपन्न झाला. खरे तर‘दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला नाही.. खिशातल्या चोर खिशाची शपथतुला नाही..?’ अशी राजकारण्यांची सार्वत्रिक प्रसिध्दी आहे.
आम्हाला तर पहाट झाली रे झाली की तो पहाटेचा शपथविधी आठवतो. कोंबड्याचं आरवणं कानी येण्याआधी ‘मी अमुक तमुक ढमुक इश्वराला स्मरुन शपथ घेतो की..’ असे शब्द ऐकू येऊ लागतात.
पण त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंचे मुख्यमंत्रीपद आणि महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद जेमतेम अडीच दिवस टिकले होते. तेव्हा पहाटेच्या शपथा लाभत नाहीत, असे लक्षात आल्यावर, यावेळी गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला, हे ठीकच झाले. (Open letter to eknath shinde)
‘अडीच वर्षांपूर्वी देवेंद्रफडणवीस यांनी माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मला त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करताना आनंद होत आहे’, असं आपण म्हणालात खरं, पण त्यांना परत मुख्यमंत्रीपदी येताना पाहून आपणांस किती दु:ख झाले असेल, याची कल्पना केवळ आपले पूर्वाश्रमीचे नेते उद्धव ठाकरे हेच करु शकतात.
खरे म्हणजे राजकारणातल्या पुढारी मंडळींनी आता खालच्या जागेवर काम करणे, ही पदावनती मानता कामा न्ये. क्रिकेटमध्ये कसं जेव्हा गावसकर कॅप्टन होता, तेव्हा कपिलदेव त्याच्या टीममध्ये खेळत होता. नंतर कपिलदेव कॅप्टन झाला आणि गावसकर त्याच्या टीममध्ये होता. म्हणजे एक प्रमुखअसताना दुसरा त्याच्याखाली आणि हा दुसरा प्रमुख होतो तेव्हा पहिलात्याच्या खाली. हे क्रिकेटमध्ये ज्या सहजतेनं स्वाकरलं गेलं आहे, त्याप्रमाणे राजकारणात तुम्ही मंडळी सहज का स्वीकारत नाही? आपणही शिंदेसाहेब यावेळी महायुती प्रचंड बहुमताने निवडून येऊनही आणि त्यात भारतीय जनता पक्षाला आपल्या नवशिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळूनही देवाभाऊंच्या मुख्यमंत्रीपदी येण्यासाठी अडथळे आणायला नको होते. अशा नाकाबंदीमधून कसं सुटयचं याचा पूर्यानुभव दांडगा आहे हो. ते बिचारे तुमची समजूत काढता काढता अगदी बेसुमार घामाघूम झाले. एकवेळ अमृतावहिनींची समजूत घालणं परवडलं; पण तुमचा रुसवा कसा काढावा हे त्या गरीबांच्या चाणक्यालाही कळेना.
अखेर याहीवेळी मंत्रीपदाचे इच्छुक असलेले आपल्या गटातील काही व्यवहारवादी इसम जसे की उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील वगैरेंनी ‘वर्षा’वर धाव घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सत्तेव असणे कसं आवश्यक आहे याविषयी आपली शाळा घेतली आणि एकंदरीत रागरंग पाहून मिळेल त्यावर समाधान मानून आपण अगदी शेवटच्या अर्ध्या तासात आपणही शपथ घेणार आहात, असे राज्यपाल महोदयांना कळविले हे शहाणपणाचे आहे. (Open letter to eknath shinde)
आपण प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करता, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. तथापी, फडणवीस आणि अजित पवार हेही थेट लोकांमध्येच जाऊन काम करणारे नेते आहेत. शिवाय ते आपल्या एवढेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे तिघांपैकी एक कोणीतरी मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच, अशी अटकळ आम्ही पत्रकारांनी बांधली होती. पण ‘पायाला भिंगरी लावून काम करणाराच मुख्यमंत्री होतो’ असा निकष लावला तर अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठीपुढे येऊ शकतात. मुरलीधर मोहोळ यांचे नांव अचानक पुढे आले आणि मिडियामध्ये त्याचा एवढा प्रचार झाला की शेवटी दस्तुरखुद्द मोहोळ यांनाच खुलासा करुन मुख्यमंत्रीपदाशी आपला काही संबंध नाही, असं जाहीर करावं लागलं. डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण यांचही नाव काही काळ पुढे येऊनच र्चेत राहीलं. ते खुलासा वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता मंगळवारी थेट आंगणेवाडीत गेले आणि भराडी देवीला गाऱ्हाणं घालून म्हणाले की ‘देवी भराडी आई, कृपाकरुन जे आहे ते सार्वजनिक बांधकाम खातं माझ्याजवळ राहील अशी व्यवस्था केलीस तरी पुरे. मला मुख्यमंत्री, गृहमंत्री वगैरे व्हायची अजिबात इच्छा नाही.’
तुम्ही छगन भुजबळांसारख्या एकेकाळी राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या गृहस्थांना विचारले असते तर त्या खात्यासाठी हट्ट न धरण्याचा सल्ला त्यांनीही तुंम्हास दिला असता. याचे कारण म्हणजे भुजबळांच्या मते कुठे एकादी कोंबडी चोरीला गेली किंवा रात्री दारु पिऊन श्रीमंतांच्या बाळांनी पोर्शे कारवर निबंध लिहिण्यासाठी म्हणून कुणाला तरी ठोकलं, तरी लोक गृहमंत्र्यांनाच थेट जबाबदार धरतात. आपण सुद्धा गृहमंत्रालयाचे काम अंगावर घेऊन कारणन सताना पायांना भिंगरी लावण्याचे उद्दिष्ट ठेवू नये, अशी विनंती आहे. गृहमंत्रालयासाठी काम करणे म्हणजे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणेआणि पोलिसांना एखाद्या गुन्हेगाराचा थेट मर्डर करण्याचा गुप्त आदेश देऊन झटपट न्यायदान करणे होय. आपण तर अतिशय साधे, सरळ, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहात. तेव्हा…
स्वाभिमान वगैरे ठेवून कोणाकडे काही
मागण्याची वेळ
आपल्यावर येऊ नये असे वाटणारा,
आपला,
लाडका विनम्र बालक