नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन : राजेश लाटकर

कोल्हापूर : आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही.  जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून निस्वार्थी जनसेवा करणे व ‘नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन असेल. असे प्रतिपादन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते.

राज्याचे नियोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या विरोधी उमेदवारांच्या कारभाराने कोल्हापूरची दुर्दशा करून ठेवली आहे. रस्ते सुस्थितीत नाहीत, पाण्याचे असमान वितरण होत आहे, कचऱ्याचे ढीग वाढले आहेत. केवळ खंडणी व कमिशन हेच धोरण असलेल्या आमच्या विरोधकाने शहर भकास करून स्वतःचा विकास केला. दहशतीचे हे वातावरण संपवण्यासाठी प्रेशर कुकर या माझ्या चिन्हापुढील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन लाटकर यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडी सरकार महिलांना प्रतिमाह तीन हजार रुपये देणार आणि ते सुद्धा सन्मानाने देणार अशी घोषणा राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी केली. त्या म्हणाल्या.  छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य दैवत. पण त्यांच्या पुतळ्यातही सत्तेत बसलेल्या गद्दारांनी भ्रष्टाचार केला व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. सरलाताई पाटील म्हणाल्या, काँग्रेसने श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना अशा कित्येक योजना आणल्या पण त्याचा कधीही बॅनर, जाहिराती देऊन गाजावाजा केला नाही. महिला कोणत्या पक्षाच्या आहे हे न पाहता सर्वाना त्याचा लाभ दिला. यावेळी बोलताना प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्याप्रमाणे लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून प्रत्येक घटक सक्षम, स्वावलंबी होण्यास मदत होईल. या सभेत सुनील मोदी, रविकिरण इंगवले, संदीप देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. यासभेसाठी राजारामपुरी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस आरती सिंग, आर.के.पोवार, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, संदीप देसाई, सरलाताई पाटील, भारती पवार, संध्या घोटणे, प्रवीण इंदुलकर, विशाल देवकुळे, दिनेश परमार, दिलीप शेटे, भारती पोवार, महेश उत्तुरे, दत्ता टिपुगडे, कॉ. चंद्रकांत यादव, पूजा नाईकनवरे हे प्रमुख उपस्थित होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी