Newzealand Series : अखेरच्या सामन्यातही न्यूझीलंडची बाजी

Newzealand Series

Newzealand Series

वेलिंग्टन : जेम्स निशॅमची गोलंदाजी आणि टीम सिफर्टच्या नाबाद ९७ धावांमुळे न्यूझीलंडने मालिकेतील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांची ही टी-२० क्रिकेट मालिका ४-१ अशी जिंकली. (Newzealand Series)

न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. निशॅमच्या प्रभावी गोलंदाजीमुळे पाकिस्तानला २० षटकांत ९ बाद १२८ पर्यंतच मजल मारता आली. निशॅमने २२ धावांमध्ये पाकचा निम्मा संघ गारद करून टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पाककडून केवळ कर्णधार सलमान आघा आणि शादाब खान यांना वैयक्तिक २५ धावांचा टप्पा ओलांडता आला. आघाने ३९ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकारासह ५१ धावांची खेळी केली. शादाबने २० चेंडूंमध्ये ५ चौकारांसह २८ धावा केल्या. (Newzealand Series)

सिफर्टच्या धुवाँधार फटकेबाजीमुळे पाकिस्तानचे माफक आव्हान न्यूझीलंडने अवघ्या १० षटकांमध्ये पार केले. सिफर्ट आणि फिन ॲलन यांनी पॉवर-प्लेमध्ये न्यूझीलंडला तब्बल ९२ धावांची सलामी दिली. सुफियान मुकीमने ॲलनला बाद करून ही जोडी फोडली. त्यापाठोपाठ त्याने मार्क चॅपमनचीही विकेट काढली. त्यानंतर, सिफर्टने डॅरेल मिचेलच्या साथीने संघाचा विजय साकारला. शादाबच्या दहाव्या षटकात सिफर्टने लागोपाठ तीन षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.(Newzealand Series)
सिफर्टने ३८ चेंडूंमध्ये ६ चौकार व १० षटकारांच्या मदतीने नाबाद ९७ धावा फटकावल्या. त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले असले, तरी टी-२० क्रिकेटमधील त्याची ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. निशॅम या सामन्याचा सामनावीर ठरला, तर मालिकेत एकूण २४९ धावा करणाऱ्या सिफर्टला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. न्यूझीलंड व पाकिस्तानमध्ये २ एप्रिलपासून तीन सामन्यांच्या वन-डे क्रिकेट मालिकेस सुरुवात होणार आहे. (Newzealand Series)

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान – २० षटकांत ९ बाद १२८ (सलमान आघा ५१, शादाब खान २८, महंमद हारिस ११, जेम्स निशॅम ५-२२, जेकब डफी २-१८) पराभूत विरुद्ध न्यूझीलंड १० षटकांत २ बाद १३१ (टीम सिफर्ट नाबाद ९७, फिन ॲलन २७, सुफियान मुकीन २-६).

हेही वाचा :
कबड्डी संघटनेवरील बंदी उठवणार

Related posts

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

Punishment : विनयभंग करणाऱ्या शिक्षकास सक्तमजुरी

BCCI Tribute : पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली