तज्ज्ञ नसल्याने अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामात सावळा गोंधळ

Need for archaeology experts at the Ambabai Temple

कोल्हापूर : प्रतिनिधी : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाचा कोणताही तज्ज्ञ अधिकारी नसल्याने सावळा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे ठेकेदारांकडून मनमानी काम होण्याची शक्यता सामाजिक संघटना आणि अंबाबाई मंदिर अभ्यासकांनी व्यक्त केले. (Need for archaeology experts at the Ambabai Temple)

अंबाबाई मंदिरात संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. मंदिराच्या अनेक ठिकाणी गळती झाली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, शिवसेनेचे हर्षल सुर्वे, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, ओंकार कोळेकर यांनी मंदिरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते. यावेळी एक निवेदनही देण्यात आले आहे.

देवस्थान समितीकडे संवर्धन कामाची कागदपत्रे नाहीत

मंदिराचे काम राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे.  त्या विभागाकडून कामावर नियमित देखरेख करण्यासाठी कोणताही तज्ज्ञ अधिकारी प्रत्यक्ष स्थळी उपलब्ध करून दिलेला दिसून आलेला नाही याकडे अंबाबाई अभ्यासक आणि सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी लक्ष वेधले. मंदिर ज्यांच्या नियंत्रणाखाली आहे त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडेही मंदिराच्या जतन व संवर्धन कामासंदर्भातील नकाशे, कामाची पद्धत, तांत्रिक माहिती अथवा संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे दिसून आले. मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम ज्या खाजगी कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे, त्या कंपनीनेही संवर्धन विषयातील आवश्यक तज्ज्ञांची नियुक्ती केलेली नाही. (Need for archaeology experts at the Ambabai Temple)

मातृलिंगावर मुख्य शिखरास गळती

मंदिरातील श्री मातृलिंगावरील मुख्य शिखरास गळती लागलेली असून सध्या पाऊस थांबल्यामुळे तिची तीव्रता वाढलेली नाही. मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी या शिखराच्या संवर्धनाचे काम पूर्ण करणे अथवा पावसाचे पाणी शिखरामध्ये मुरणार नाही यासाठी आवश्यक ती संरक्षणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे याकडे लक्ष वेधण्यात आले.

शिलालेखाकडे दुर्लक्ष

मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना परिसरातील शिलालेखांच्या संरक्षणाची योग्य ती काळजी घेतलेली दिसून येत नाही. या शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यांचे संरक्षण प्राधान्याने केले जाणे आवश्यक आहे.

गरुड मंडपातील खांबांना तडे

मंदिरासमोरील गरुड मंडपातील तब्बल आठ खांबांना तडे गेले असून हे खांब पुन्हा बदलण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे यासाठी अतिरिक्त वेळ आणि निधी खर्च होण्याची शक्यता आहे.

महाद्वारातील स्वच्छतेचे काम खराब

मंदिरासमोरील महाद्वारावर एअर-अब्रेशन (Air Abrasion) पद्धतीने स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे. तथापि, पाऊस व वातावरणीय परिणामांमुळे महाद्वारावरील काही भाग पुन्हा खराब होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या पद्धतीने करण्यात आलेल्या कामाच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.

तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची गरज

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराबाबत असलेल्या तीव्र लोकभावना लक्षात घेता शासनाने केवळ राज्य पुरातत्त्व विभागातील एका अधिकाऱ्यावर अवलंबून न राहता कोल्हापूर तसेच राज्यातील इतर भागांतील वास्तू संवर्धन, पुरातत्त्व, स्थापत्य, शिल्पकला आणि इतिहास क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली विस्तृत सल्लागार समिती स्थापन करून या महत्त्वपूर्ण कामावर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. या जतन व संवर्धन कामांवर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधी खर्च होणार असल्याने या खर्चाचे वेळोवेळी स्वतंत्र आणि तांत्रिक मूल्यमापन करणे आवश्यक आहे, अशी मागणी अंबाबाई अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. (Need for archaeology experts at the Ambabai Temple)

Related posts

अंबाबाई मंदिरात गळती; पुरातत्त्व विभागाने काय दिले स्पष्टीकरण

सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर ?

मुलीच्या बारशापूर्वीच आईची आत्महत्या; सासरचे चौघे अटकेत