मुंबई: विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण त्यामुळे ईडीपासून सुटका झाली होती. माझ्यासाठी तर इंडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता, अशी निःसंदिग्धपणे कबुली राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती, असा दावा त्यात करण्यात आला आहे. या पुस्तकावरून विरोधकांनी भाजप व महायुतीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली असून या पुस्तकाचा फटका भाजपा व महायुतीला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, भुजबळांनी पुस्तकातील आपल्या मुलाखतीचा इन्कार केला आहे.
याबाबत लेखक सरदेसाई यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाईचाही इशारा दिला आहे. सरदेसाई यांच्या ‘२०२४: द इलेक्शन दंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकाने ही खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकात ‘हमारे साथ इंडी है’ या शीर्षकाचे एक प्रकरण आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतर, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि त्यामागील कारणांबाबत भुजबळ यांनी रोखठोक मते मांडली आहेत. “अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख आणि मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही, अशी साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते.
पण ते भाजपाबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते, तेका अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपाबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली. मी ओबीसी असल्यामुळे मला जाणीवपूर्वक खूप त्रास देण्यात आला. उच्च जातीचा असतो तर काहीही झाले नसते, अशी भावना भुजबळांनी त्यात व्यक्त केली आहे.
अजित पवारांनाही घेरले होते
अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून त्यांना घेरण्यात आले होते. या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. त्यामुळे कदाचित त्यांना अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तेव्हा त्यांनाही घाम फुटला होता, अशी माहिती राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने दिली. यानंतर अजित पवार यांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती. तोडगा कसा काढायचा यावर खल झाला. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई झाली. त्यांच्या इमारतीतील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी सुरू झाली होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करू, अशी शरद पवारांकडे बाजू मांडली होती. शरद पवारांनी भाजपाबरोबर जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या.
भाजपाबरोबर हातमिळवणी करण्याच्या बदल्यात ईडीची चौकशी सुरू असलेल्या नेत्यांची प्रकरणे बंद केली जातील वा त्यासाठी यंत्रणेकडून पाठपुरावा केला जाणार नाही, असे ठरले असल्याचे पुस्तकात म्हटले आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या दाव्याचा इन्कार केला असून ‘आमच्यासमोर विखुरलेले विरोधक की स्थिर सरकार देणारे मोदी असे दोन पर्याय होते. आम्ही स्थिर सरकारला प्राधान्य दिले,’ असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी पुस्तकातील दाव्याचा इन्कार केला. ते म्हणाले, ‘मी अशा पद्धतीची कोणतीही मुलाखत दिलेली नाही.
ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही सगळे सरकारसोबत गेलो असे आरोप आमच्यावर सातत्याने केले गेले, मात्र मला कोर्टाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लीन चीट दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार असतानाच कोर्टाने क्लीन चीट दिली होती. त्यानंतर मी त्यांना आणि पवारसाहेबांना पेढेही दिले होते. आम्ही सर्वजण विकासाच्या मुद्द्यावर पक्षातून बाहेर पडलो. पक्ष फुटला त्यावेळी एकटाच नव्हतो. ५४ आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. आपण सरकारमध्ये गेले पाहिजे, असे अनेकांना वाटत होते. त्या सर्वांवर ईडीच्या केसेस नव्हत्या. आमच्यासोबत आजही जे आहेत त्या सर्वांवर ईडीच्या केसेस नाहीत. आम्ही सर्वांनी जो निर्णय घेतला, त्याचा फायदा आम्हाला विकास करण्यासाठी होत आहे. मात्र पुस्तकात असे का छापले ? निवडणुकीच्या वेळी मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी असे केले जातेय का? ते माहिती नाही. पुस्तक अजून वाचलेले नाही. त्यानंतर वकिलांसोबतही चर्चा करेन. त्यात चुकीचे जे जे काही असेल त्यावर निवडणुकीनंतर कायदेशीर कारवाई करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुश्रीफ शपथ घेताना सोमय्या ओशाळले
मुंबई भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनीच हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांना भाग पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोमय्या यांनी फसवणूक आणि मनी लॉडिंगमध्ये मुश्रीफ यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करणारे दस्तऐवज उघड केले. नंतर, जेव्हा मुश्रीफ यांनी भाजपसोबत सत्तावाटपाच्या व्यवस्थेत मंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा सोमय्यांना लाज वाटली, असेही पुस्तकात महटले आहे.
माझे पुस्तक हे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरते मर्यादित नाही; तर देशातील तत्कालीन सर्व घडामोडींचा आढावा घेणारे आहे. त्यामध्ये केवळ एक प्रकरण महाराष्ट्राबाबतचे आहे. प्रत्येकाने ते पहिल्यांदा पूर्ण वाचावे. त्यानंतर आपली मते बनवावीत.
– राजदीप सरदेसाई