श्रीनगर : पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याबद्दल सेवेतून काढून टाकण्यात आलेले जम्मू आणि काश्मीरमधील सीआरपीएफ जवान मुनीर अहमद यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. बडतर्फीविरोधात त्यांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निकाहबाबत सीआरपीएफच्या सर्व परवानग्या आणि कागदपत्रे सादर केलेली असतानाही झालेल्या या सजेविरोधात त्यांनी आव्हान दिले आहे. (Munir Ahmed)
अहमद यांनी त्यांचे वकील आणि भाजप नेते अंकुर शर्मा यांच्यामार्फत त्यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती जावेद इक्बाल वाणी यांनी प्रतिवादींना, म्हणजेच महासंचालक सीआरपीएफ आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील सीआरपीएफच्या ४१ व्या बटालियनच्या बंगरासिया आणि जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सोदरा, सुंदरबनी येथील ७२ व्या बटालियनच्या कमांडंट्सना नोटिसा बजावल्या आहेत.
न्यायालयाने प्रतिवादींना पुढील सुनावणीच्या तारखेला किंवा त्यापूर्वी त्यांचे आक्षेप दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. ३० जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (Munir Ahmed)
मुनीर अहमद २०१७ मध्ये सीआरपीएफमध्ये सामील झाले. त्यांनी छत्तीसगड, बिहार, जम्मू-काश्मीर आणि मध्य प्रदेशात सेवा बजावली आहे. नातेवाईक असलेली पाकिस्तानी महिला मीनल खान हिच्याशी लग्न केल्याबद्दल मुनीर यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.
मी मीनलशी लग्न करणार असल्याबद्दल सीआरपीएफ मुख्यालयाला आधीच कळवले होते, असा दावा मुनीर यांनी केला आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “माझे लग्न पाकिस्तानी नागरिक मीनल खानशी होते, जी माझी मावस बहीणही आहे. हे लग्न आधीच माझ्या वडिलांनी ठरवले होते. मीनलशी लग्न करणार असल्याची माहिती मी २०२२ मध्ये सीआरपीएफ अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच लग्नासाठी परवानगीही मागितली होती. सीआरपीएफने २४/०१/२०२३ रोजी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना, काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानुसार मी १८/१०/२०२३ रोजी आवश्यक कागदपत्रे सादर केली. पुन्हा, ०५/११/२०२३ रोजी, मी मीनलसोबत लग्नासाठी मंजुरी/एनओसी मागितली.”
त्यावर ३०/०४/२०२४ रोजी नवी दिल्लीतील सीआरपीएफ महासंचालक कार्यालयाने त्यांना कळवले की एनओसी देणे आवश्यक नाही. भारतीय नागरिकाव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी लग्न करू इच्छिणाऱ्यांना फक्त अधिकाऱ्यांना कळवावे लागते, असे कार्यालयाने सांगितले, असे मुनीर यांनी सांगितले. (Munir Ahmed)
नियमांनुसार परदेशी नागरिकाशी झालेल्या लग्नाची माहिती सरकारला देऊन आवश्यक औपचारिकताही पूर्ण केल्या आहेत.
मीनल खानसोबत २४/०५/२०२४ रोजी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाइन पद्धतीने विवाह झाला. ‘‘माझ्या निकाहनंतर, मी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ७२ बटालियन मुख्यालयात लग्नाचे फोटो, निकाह कागदपत्रे आणि लग्नाचे प्रमाणपत्र सादर केले. त्यावेळी मी तिथे तैनात होतो,’’ असे ते म्हणाले.
मीनल २८ फेब्रुवारी रोजी १५ दिवसांच्या व्हिजिट व्हिसावर भारतात आली. ‘‘आम्ही ४ मार्च रोजी दीर्घकालीन व्हिसासाठी (एलटीव्ही) अर्ज केला आणि मुलाखतीसह सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्या. २१ दिवसांचा अनिवार्य कालावधीनंतर व्हिसा मंजूर केला जातो, मात्र तो आधीच निघून गेला आहे,’’ मुनीर म्हणाले. पहेलगाम दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते (एलटीव्ही) ची वाट पाहत होते.
२२ एप्रिल रोजीच्या पहेलगाममधील हल्ल्यानंतर भारताने देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा निलंबित केले आणि पाकिस्तानशी राजनैतिक संबंधही कमी केले. हद्दपारीच्या यादीतील पाकिस्तानी नागरिकांमध्ये मीनलचा समावेश असल्याने, मुनीरने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर २९ एप्रिल रोजी सुनावणी झाली आणि १४ मे पर्यंत तिच्या हद्दपारीला स्थगिती दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर, मीनलला अटारी सीमेवरून जम्मू-काश्मीरमधील मुनीरच्या निवासस्थानी परत आणण्यात आले.
हेही वाचा :
एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही : हवाई दल प्रमुख
अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर