MP Shahu Chhatrapati : कोल्हापुरात राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करण्यासाठी खासदार शाहू छत्रपतींची मागणी

MP Shahu Chhatrapati

कोल्हापूर :  कोल्हापूर शहरातील फुटबॉलचा वाढता प्रसार, शंभर वर्षांची परंपरा आणि हजारो खेळाडूंचा सहभाग लक्षात घेता येथे राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करण्याची मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडावीय यांच्याकडे केली केली आहे. (MP Shahu Chhatrapati)

दिल्लीत खासदार शाहू छत्रपती यांनी  केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. क्रीडा मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात कोल्हापूरच्या समृद्ध फुटबॉल परंपरेचा आढावा घेतला असून, शहरात सध्या १२८ नोंदणीकृत संघ, २६८० पेक्षा जास्त खेळाडू, आणि सहा महिला संघ कार्यरत असल्याचे नमूद केले आहे.

कोलकाता, गोवा, केरळ नंतरचे कोल्हापूर चौथे महत्त्वाचे फुटबॉल केंद्र आहे. १९४० मध्ये छत्रपती राजाराम महाराज व मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज यांच्या प्रेरणेतून ‘कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन’ची स्थापना झाली. ही संस्था ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि  वेस्टर्न महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनशी संलग्न आहे. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या केएसए लीग स्पर्धांमध्ये सुमारे अडीच हजारहून अधिक खेळाडू सहभाग घेतात. या मैदानावर आतापर्यंत आय लीग, संतोष ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय महिला सामन्यांचाही यशस्वी आयोजन झाले आहे. (MP Shahu Chhatrapati)

कोल्हापूर शहरात फुटबॉलची चळवळ असूनही या खेळाच्या विकासासाठी कोल्हापुरात अद्यापही शासकीय स्तरावर फुटबॉलचे तांत्रिक प्रशिक्षण देणारी एकही संस्था नाही. परिणामी, स्थानिक पातळीवर खेळाडू घडत असले तरी त्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास खुंटतो. फुटबॉलचा प्रसार आणि दर्जदार खेळाडू निर्माण होण्यासाठी खासदार शाहू छत्रपती यांनी बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर कोल्हापुरातही फीफा व एआयएफएफच्या सहकार्याने राष्ट्रीय फुटबॉल अकादमी स्थापन करावी, अशी मागणी केली आहे. (MP Shahu Chhatrapati)

कोल्हापूर शहर हे विमान, रेल्वे व रस्ते अशा सर्व प्रकारच्या दळणवळणाने सज्ज शहर असून येथे पाच थ्री स्टार व एक फाईव्ह स्टार हॉटेलही आहेत. त्यामुळे देशविदेशातील स्पर्धा घेण्यासाठी हे शहर आदर्श ठरू शकते. कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी १५ हजारांहून अधिक प्रेक्षक मैदानात उपस्थित राहतात. अशा ठिकाणी राष्ट्रीय फुटबॉल अकादमीची स्थापना झाल्यास देशाला भविष्यात दर्जेदार खेळाडू लाभू शकतात, असा विश्वास खासदारांनी व्यक्त केला. (MP Shahu Chhatrapati)

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय