मुंबई : प्रतिनिधी : उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील एकूण १७२ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. यापैकी १७१ पर्यटकाशी संपर्क झाला असून ते सुरक्षित ठिकाणी आहेत. उर्वरीत एक पर्यटक कृतिका जैन यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. (Maharashtra tourists safe)
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये काल दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली. तसेच परिसरातील रस्ते देखील पुर्ववत सुरू करून त्याद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास विभाग राज्यमंत्री अजय तमता यांची देखील मंत्री महाजन यांनी भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी संवाद साधला आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra tourists safe)
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात एकूण १७२ पर्यटकांपैकी १४७ पर्यटक येथे सुखरुप आहेत. मातली येथे ६७, जॉली ग्रँट येथे सहा तर उत्तरकाशीत ७४ पर्यटक सुरक्षित आहेत. या पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील वाटचाल सुरु केली आहे. २४ पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असुन त्यांना एअर लिफ्ट करुन आयटीबीपी कॅम्प मताली येथे हलविण्यात येणार आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष महाराष्ट्र हे उत्तराखंड राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, उत्तरकाशी, आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र नवी दिल्ली यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मदत कार्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तराखंड येथे घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने त्यासंबंधी उपाय योजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत. गंगोत्री ते हर्षील हेलीपॅड यांचे दरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षीततेसाठी १० आयटीबीपी टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक टीम ३० यात्रेकरूंना संरक्षण देणार आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथक धराली येथे कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा व रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. संपर्क व रस्ते पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.
उत्तराखंडमध्ये आपत्ती बचाव कार्यासाठी जबाबदार अधिकारी राजीव स्वरूप यांच्याद्वारे उपग्रह फोन तैनात करण्यात आले असून लष्कराच्या छोट्या सॉर्टी सुरू आहेत. (Maharashtra tourists safe)