इतिहास लेखनाची पुण्याची मक्तेदारी जयसिंगराव पवार यांनी मोडून काढली

कोल्हापूर: इतिहास लेखनातली पुण्याची मक्तेदारी जयसिंगराव पवार यांनी मोडून काढली आणि वस्तुनिष्ठ इतिहास लोकांसमोर आणला, अशा शब्दात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या इतिहास लेखनाचा गौरव केला. (Shahu Puraskar to Jaysingrao Pawar)

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने २०२६ चा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते श्रीमती वसुधा जयसिंगराव पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून पवार कुटुंबीयांच्यावतीने पुरस्काराची रक्कम शिवाजी विद्यापीठाकडे देण्याची घोषणा केली. त्यात आणखी काही रक्कम घालून त्याद्वारे दरवर्षी मराठा इतिहासासंदर्भातील उत्कृष्ट प्रबंधास पुरस्कार द्यावा असे सुचवण्यात आले.  

यावेळी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, विश्वस्त तथा कुलगुरू डॉ. राजनीश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, तसेच प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते. (Shahu Puraskar to Jaysingrao Pawar)

इतिहास संशोधनात मौलिक कार्य

खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांचे संशोधन देश-विदेशात मान्यता पावले आहे. आधीच्या पिढीतल्या इतिहासकारांनी विपर्यास करणारे इतिहास लेखन केले होते. योग्य पुराव्यांचे दाखले देऊन त्यांनी खोटा इतिहास पुसून टाकला आणि नवा वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुण्याची मक्तेदारी मोडून काढून डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी इतिहास संशोधन क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा आदर्श आजच्या पिढीने घ्यायला हवा. (Shahu Puraskar to Jaysingrao Pawar)

पुरस्काराची रक्कम विद्यापीठाकडे

राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन व कार्य यांचे विवेचन करणाऱ्या शाहू स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणिकेच्या संपादनाचे काम डॉ. जयसिंगराव पवार यांनी पूर्ण केले होते. (Shahu Puraskar to Jaysingrao Pawar)

पुरस्कार प्रदान झाल्यानंतर डॉ. जयसिंगराव पवार कुटुंबीयांच्यावतीने यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जयसिंगराव पवार यांची कन्या आणि गेली २८ वर्षे त्यांच्यासोबत संशोधन करणारी सहाय्यक या भूमिकांमधून त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक हळवे पैलू उलगडून दाखवले. (Shahu Puraskar to Jaysingrao Pawar)

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रास्ताविक केले. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर यांनी डॉ जयसिंगराव पवार यांचा जीवनप्रवास आणि इतिहास लेखनाचा आढावा घेतला. सन्मानपत्राचे वाचन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस बँडतर्फे मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांच्या गौरवगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले, तर आभार राजदीप सुर्वे यांनी मानले. नूतनीकरण झाल्यानंतर हा शाहू स्मारक भवनाच्या मुख्य सभागृहातील पहिलाच समारंभ होता.

Related posts

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा