कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. त्यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी तसे प्रयत्न करावेत. सर्किट बेंचचे परमनंट बेंचमध्ये रुपांतर होण्यासाठी जे काही लागणार आहे, त्याची पूर्तता लवकरात लवकर होईल याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी (१७ ऑगस्ट) येथे केली. (Kolhapur Circuit Bench inaugurated)
आपल्या भाषणा न्या. गवई यांनी कोल्हापूर खंडपीठ असाच उल्लेख केला. या खंडपीठाच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य माणसाला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोल्हापूर सर्किट बेंचचे उदघाटन न्या. गवई यांच्याहस्ते रविवारी अतिशय उत्साही वातावरणात उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Kolhapur Circuit Bench inaugurated)
तुतारीच्या निनादात, टाळ्यांच्या कडकडाटात, सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य जनतेने अखंडपणे तब्बल ४० वर्षे लढा दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे स्वप्न प्रत्यक्ष साकारले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, न्या. मकरंद कर्णिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी सरन्यायाधीश गवई यांना कोल्हापूर पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला . त्यांचे औक्षण करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांचे स्वागत केले. (Kolhapur Circuit Bench inaugurated)
उदघाटनानंतर सरन्यायाधीश गवई यांनी सर्किट बेंच मुख्य कोर्टामध्ये प्रवेश केला. तेथील इमारतींचे उदघाटनही त्यांच्याहस्ते झाले. त्यांनी नवीन सर्किट बेंचच्या दालनांची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (Kolhapur Circuit Bench inaugurated)
त्यानंतर मेरी वेदन मैदानावर उदघाटनानंतरचा मुख्य सोहळा पार पडला. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकारांसह नागरिकांनी या सोहळ्याला प्रचंड संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
खंडपीठाच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित होईल
देशाला राज्यघटना सुपूर्द करताना घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करून न्या. भूषण गवई म्हणाले, ‘‘बाबासाहेब म्हणाले होते की, आपण आता एका प्रचंड विरोधाभासात प्रवेश करत आहोत. राजकीय समता आपण प्रस्थापित करू शकलो. पण जोपर्यंत सामाजिक, आर्थिक समता आणि न्याय प्रस्थापित करत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला काहीही अर्थ नाही. आता ही सामाजिक, आर्थिक समता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे काम या खंडपीठाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास वाटतो.’’ (Kolhapur Circuit Bench inaugurated)
वकिलांपेक्षा सामान्य माणूस केंद्रस्थानी
कोल्हापूर सर्किट बेंचचा विचार करताना मी कधीही वकिलांचा विचार केला नाही, असे स्पष्ट करून सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, ‘‘बेंचचा विचार करताना माझ्यासमोर नेहमीच दुर्गम, खेड्यातला, कर्नाटकच्या सीमाभागातला, कोकण-गोव्याच्या सीमेवरील सामान्य पक्षकार होता. या सामान्य माणसाला न्यायासाठी मुंबईला जाणे परवडणारे नव्हते. तेथील वकिलांच्या फीबद्दल तर विचारायलाच नको. अशा परिस्थितीत कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन झाले पाहिजे, याचा जाहीर उच्चार मी करत आलो आहे. आज ते स्वप्न साकार होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराजांनी पाहिलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न या माध्यमातून निश्चितच साकार होईल, असा विश्वास आहे.’’ (Kolhapur Circuit Bench inaugurated)
न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचा आग्रह
सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, तोही कमी खर्चात आणि कमी वेळेत, अशी माझी धारणा आहे. आज मी ज्या पदावर आहे किंवा जिथे कुठे मी काम करत आहे ते केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच, असे सांगून न्या. गवई म्हणाले, ‘‘राज्यघटनेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. त्याला सर्व प्रकारचा न्याय मिळायचा असेल तर न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे असा माझा आग्रह आहे. त्यामुळेच आम्ही अगदी कमी वेळेत अनेक न्यायाधीशांच्या नियुक्त्या करू शकलो. अनेकांचा असा गैरसमज असतो की ग्रामीण भागात बेंच स्थापन झाले की न्यायदानाची गुणवत्ता कमी होईल. मात्र हा गैरसमज अनेक बेंचनी दूर केला आहे. छत्रपती संभाजीनगरचे खंडपीठ याचे ढळढळीत उदाहरण आहे. या खंडपीठाने उच्च न्यायालयाला चार न्यायाधीश दिले आहेत. अत्यंत उच्च दर्जाचे वकील येथे तयार झाले आहेत.’’
कोल्हापुरातूनही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तयार होतील
कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्येही न्यायदानाची दर्जेदार परंपरा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करून सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, ‘‘कोल्हापूरमध्ये काम करण्यासाठी जवळपास दोनशे वकील मुंबईतून स्थलांतरित होतील. पुढच्या दहा वर्षांत याच खंडपीठातून उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही निर्माण होतील. राज्यात न्यायव्यवस्थेतील पायाभूत सुविधाही अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. कोल्हापुरातही तशाच सुविधा निर्माण होतील, त्याचा फायदा शेवटी सर्वसामान्यांना होईल.’’ (Kolhapur Circuit Bench inaugurated)
बारामती-पुणे कोल्हापूरला अटॅच करा
सरन्यायाधीशांनी पुणे खंडपीठाच्या मागणीचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. तथापि, तेथील मागणी ही वकिलांसाठी आहे, कोल्हापूरची मागणी ही सर्वसामान्य गरीब पक्षकारांसाठी आहे, असा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला. आज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार असते तर मी त्यांच्याकडे आग्रह धरला असता, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरतो की इकडे तिकडे एक्स्प्रेस वे करण्यापेक्षा पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस वे करा, पुणे-कोल्हापूर, बारामती-कोल्हापूर अटॅच करा. ही दोन्ही शहरे कोल्हापूरशी अटॅच होतील, असे म्हणताच उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
कोल्हापूरकरांबद्दल कृतज्ञता
गेले दोन दिवस मी कोल्हापुरात आहे. कोल्हापूरकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. त्यांच्याप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे भावोद्गारही सरन्यायाधीशांनी काढले.
कोल्हापूरसाठी विकासाचे दालन : मुख्यमंत्री
कोल्हापूरला केवळ सर्किट बेंच आले नाही तर विकासाचं दालन उघडले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘कोल्हापुरात आज इतिहास रचला जात आहे आणि त्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. या सगळ्या प्रक्रियेत खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला मिळाले. कोल्हापूरसह पुण्याचा विचार करावा असे पत्र नको तर कोल्हापूरमध्येच खंडपीठ व्हावे अशी मागणी माझ्याकडे करण्यात आली. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयाला केवळ कोल्हापूरला खंडपीठ व्हावे असे पत्र दिले. आम्हाला जमीन, इमारती आणि इतर पायाभूत सुविधांबद्दल विचारणा झाली, त्याची देखील व्यवस्था केली, पण तरी देखील कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे नाव निघत नव्हते. शेवटी भूषण गवई सरन्यायाधीश झाले आणि सर्किट बेंचच्या कामाला गती मिळाली. केवह सर्किट बेंचची मंजुरीच नाही तर उदघाटनाची तारीख देखील न्या. गवई यांनी सांगितली. उच्च न्यायालयाचे सरकारला पत्र आल्यानंतरही सरन्यायाधीश गवई यांनी लवकरात लवकर उत्तर देण्याबाबत आम्हाला सूचना केल्या. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी जमीन हस्तांतर केली आहे. लवकरात लवकर आराखडा तयार करून बांधकामही सुरू करण्यास आम्ही बांधील आहोत. कोल्हापूरच्या इतिहासाला साजेशे काम इथून पुढे आम्ही करत राहू.’’
सर्किट बेंचच्या नवा अध्याय : न्यायमूर्ती आराध्ये
मुंबई उच्च न्यायालयाची सर्किट बेंच कोल्हापूर सुरू झाले आहे हा क्षण इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल, अशी भावना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये यांनी व्यक्त केली. कोल्हापूर सर्किट बेंचच्या माध्यमातून एक नवा अध्याय सुरू होत आहे. सहा जिल्ह्यातील पक्षकारांना मोठा प्रवास करून मुंबईला सुनावणीसाठी यावे लागत होते. त्यांचा पैसा आणि वेळ खर्च होत होता, पण सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन झाल्याने सर्वसामान्य गरीब पक्षकारांना न्याय मिळेल, असा विश्वास न्या. आराध्ये यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण : उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होण्याचा आजचा दिवस कोल्हापूरसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोनेरी अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जलद, निष्पक्ष, संवेदनशील न्यायदानावर भर दिला आहे. त्यांचे न्यायदानातील योगदान अभिमानास्पद आहे. राजर्षी शाहू छत्रपतींनी सामाजिक न्यायाची भूमिका कोल्हापुरात मांडून ती कृतीद्वारे प्रत्यक्षात आणली. आज कोल्हापुरात सर्किट बँकेची स्थापना होऊन सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. सामाजिक न्यायाचा परिघ भविष्यात विस्तारत जाणार आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे म्हणाले, या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दारी न्यायालय आले आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य जनतेचा कोल्हापूर सर्किटला बेंचला पाठिंबा होता. कोल्हापूर सर्किटची मागणी महाराष्ट्राच्या सुपुत्राने पूर्ण करत महाराष्ट्रासह कोल्हापूरचे पांग फेडले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सरन्यायाधीशांचे हे ऋण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
व्यासपीठावरच जागेचे हस्तांतरण
सर्किट बेंचच्या इमारतीसाठी शेंडा पार्क येथील २७ एकर जागा देण्यात येणार आहे. या जागेच्या हस्तांतरणाची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यासपीठावरच दिली. तसा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
सरन्यायाधीशांना श्रेय
महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम देसाई यांनी कोल्हापूर सर्किट बेंचचे श्रेय सरन्यायाधीश गवई यांना देताना सर्किट बेंच स्थापनेसाठी आमच्यासाठी देवदूत ठरले अशी भावना व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे, विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते सतीश पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार प्रतीक पाटील, आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक, गोपीचंद पडळकर, अशोकराव माने, विश्वजीत कदम, अरुण लाड आदी उपस्थित होते.