महिलांचा अपमान की सन्मान करणारा आमदार पाहिजे हे ठरवा : नवोदिता घाटगे

कागल; प्रतिनिधी : कागलमध्ये दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे आणि माजी खासदार सदाशिव मंडलिक यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. पण, त्यांनी एकमेकांवर टीका करताना कधीही पातळी सोडली नाही. मात्र, अलीकडे विद्यमान लोकप्रतिनिधींसह त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे. त्यात महिलांबाबत अपमानकारक वक्तव्ये होत आहेत. छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलमध्ये हे अशोभनीय आहे. आता कागलचा आमदार निवडताना महिलांचा अपमान करणारा की त्यांना सन्मान देणारा आमदार पाहिजे, ते ठरवा, असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले. (Kagal Politics)

शहरातील हणबर गल्ली, श्रमिक वसाहत आणि शाहू उद्यान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभांवेळी त्या बोलत होत्या.

घाटगे म्हणाल्या, गेल्या पंचवीस वर्षांत विरोधकांनी महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबविले नाहीत. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. दुसरीकडे कोणतेही संवैधानिक पद नसलेल्या समरजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना लघू उद्योगासाठी प्रशिक्षण, कर्जपुरवठा, विक्री व्यवस्था, आरोग्यविषयक उपक्रम, प्रबोधनपर व्याख्याने, विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले. महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलणाऱ्या समरजितना आमदार म्हणून निवडून देण्यासाठी अगदी शेतशिवारातील महिलांपासून शहरी भागातील महिलाही सरसावल्यामुळे कागलमध्ये यावेळी बदल होणार आहे.

विरोधकांकडे मुद्दाच नाही

माजी नगरसेविका विजया निंबाळकर म्हणाल्या, सायबर क्राईमसारख्या गुन्ह्यात आपल्यासारखी इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून नवोदिता घाटगे यांनी स्वतःहून गुन्हा नोंदविला. मात्र विरोधकांकडे त्यांच्यावर बोलण्यासाठी मुद्दे नसल्यामुळे अशा गोष्टींचा ते चुकीच्या पद्धतीने वापर करुन गैरसमज पसरवित आहेत. त्यानंतर जिल्ह्यात आणखी काही अशा घडल्या. एका फसवणूक प्रकरणात तर त्यांचेच नाव वापरले होते. समरजित घाटगे यांना या प्रकरणाचे राजकारण करता आले असते. मात्र, पोलीस तपासाधीन असलेल्या या घटनेवर त्यांनी काहीही भाष्य केले नाही.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी