मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटीत शैलीदार फलंदाजी करताना जो रुटने कसोटी क्रिकेटमधील ३८ वे शतक झळकावत इंग्लंडला सुस्थितीत नेले. रुटचे इंग्लंडमधील २३ वे शतक तर भारताविरोधात नववे शतक आहे. चहापानापर्यंत इंग्लंडने ४ बाद ४३३ धावा केल्या. रुट १२१ धावांवर खेळत असून कर्णधार बेन स्टोक्स ३६ धावांवर खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात दोन सत्रात भारताला दोन बळी मिळाले तेही वॉशिग्टंन सुंदर मिळविले. (Joe Root’s 38th century)
भारताच्या ३५८ धावांचा पाठलाग करताना कालच्या २ बाद २२५ धावसंख्येवरुन इंग्लंडने आज खेळ पुढे सुरू केला. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह, अंशुल कांबोज, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजांची गोलंदाजी इंग्लंडच्या ऑली पॉप आणि जो रुटने व्यवस्थित खेळून काढले. उपाहारापर्यंत दोघेही खेळपट्टीवर नांगर टाकून बसल्याने गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. एकेरी, दुहेरी धावा पळून काढताना खराब आणि आखूड टप्प्याच्या चेंडूना त्यांनी सीमापार धाडले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने २ बाद ३३२ धावा केल्या. दोघांनी १०७ धावांची यशस्वी भागिदारी केली होती. (Joe Root’s 38th century)
उपाहारानंतर चार ते पाच षटकानंतर भारत नवीन चेंडू घेण्याच्या तयारी असल्याने भारतीय गोलंदाजाची धुरा फिरकी गोलंदाजाकडे दिली. वॉशिंग्टन आणि जडेजाने फिरकीचा मारा सुरू केला. दोघेही खेळपट्टीवर टिकले असे वाटत असताना वॉशिग्टंन सुंदरच्या गोलंदाजीवर ऑली पोप चकला. त्याच्या बॅटची कट घेऊन चेंडू स्लिपमधील के.एल. राहूलच्या हातात विसावला. १२८ चेंडूत ७१ धावा केल्या. त्याने सात चौकार मारले. रुट आणि पोपने १४४ धावांची भागिदारी केली. इंग्लंड त्यावेळी साडेतीनशे धावांच्या टप्प्यावर पोचला होता. (Joe Root’s 38th century)
रुटच्या साथीला हॅरी ब्रुक आला. सुंदरच्या गोलंदाजीवर ध्रुव जुरेलने त्याला यष्टीचीत केले. तीन धावा करुन हॅरी ब्रुक तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स मैदानात उतरला. दोघांनी भारतीय संघाची धावसंख्या ओलांडत ४०० धावांचा टप्पा पार केला. त्याचबरोबर जो रुटने चौकार मारुन आपले ३८ वे शतक साजरे केले. इंग्लंडमधील त्याचे २३ शतक आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी पाँटिंगच्या धावांचा विक्रम मागे टाकला. रिकी पॉटिंगने १३ हजार ३७८ धावा केल्या आहेत. जो रुट कसोटीमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे.