JAMNER MOB LYNCHING :  जामनेरमधील मॉब लिंचिंगमुळे गिरीश महाजन वादात

JAMNER MOB LYNCHING

मॉब लिंचिंगच्या उत्तरेकडून येणा-या बातम्यांचा जमाना मागे पडला आहे आणि महाराष्ट्रातही मॉब लिंचिंग घडू लागले आहे. जामनेरमध्ये सुलेमान पठाण या तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करून त्याला त्याच्या घरासमोर फेकण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. महाराष्ट्र अधिकृतरित्या गायपट्ट्यात समाविष्ट झाल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. सरकारचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांच्या गावातच घटना घडल्यामुळे महाजनही वादात सापडले आहेत. (JAMNER MOB LYNCHING)

  • डॉ. विजय चोरमारे

सुलेमान पठाण हा तरुण जामनेरमधील कॅफेमध्ये एका मुलीबरोबर बसलेला होता. तेव्हा तरुणांचा एक गट तिथे आला आणि ते सुलेमानला तिथून घेऊन गेले. त्यानंतर सुलेमानला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला.

‘जामनेरपासून पंधरा किलोमीटरवर बेटावद नावाचं गाव आहे. तिथला सुलेमान रहिवासी आहे. पोलीस भरतीच्या ऑनलाईन फॉर्मची माहिती घेण्यासाठी अकरा ऑगस्टला सुलेमान जामनेरला आला होता. पोलीस स्टेशनच्या बाजूलाच कॅफे आहे. तिथं तो मैत्रिणीसह बसला होता. त्याचे शाळा-कॉलेजचे त्याचे मित्रही कॅफेमध्ये होते. पोलीस स्टेशनच्या बाजूला कॅफे आहे, तिथून जंगलात नेऊन त्याला सहा ते सात तास अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर गावात नेऊन सुलेमानच्या घरासमोर त्याला फेकण्यात आलं. त्यानंतर त्याची आई आणि बहीण घराबाहेर आल्या. त्यांच्यासमोरही त्याला मारहाण केली. तसंच, त्याची आई, बहीण आणि वडिलांनाही मारहाण केली गेली,” असाही सुलेमानच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. सुलेमानला दवाखान्यात नेण्यात आलं, परंतु तिथं त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी सुरुवातीला रुग्णालयातून मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. त्यासाठी जामनेर शहरात दीड तास रास्ता रोको करण्यात आला. (JAMNER MOB LYNCHING)

आरोपींना अटक केल्यानंतर परिसरातील वातावरण काहीसं शांत झालं. शवविच्छेदनानंतर सुलेमानच्या मृतदेहावर त्याच्या मूळ गावी म्हणजेच बेटावदमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत प्रसार माध्यमांना जी माहिती दिली, ती अशी आहे :

 “जामनेरमध्ये अकरा ऑगस्टला एका कॅफेत एक १७ वर्षांची मुलगी आणि मुलगा बसलेले होते. त्याठिकाणी त्या शहरातले इतर काही मुलं आले आणि त्यांना तिथून घेऊन गेले. गावात नेऊन मुलाला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर काही वेळानं मुलाची स्थिती गंभीर झाल्यानं, त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं.” (JAMNER MOB LYNCHING)

याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात कलम 103 (1) आणि 103 (2) म्हणजे मॉब लिंचिंग आणि हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (JAMNER MOB LYNCHING)

पोलीस अधीक्षक रेड्डी पुढे म्हणाले की, “या प्रकरणी चार आरोपींना त्याचदिवशी अटक केली, तर आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसंच, एकाला जळगावमधून ताब्यात घेतलं आहे. अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

शवविच्छेदन अहवाल अद्याप हाती आलेला नाही, पण प्रथमदर्शनी डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, असंही पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितलं आहे.

मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करून मकोका लावावा, या मागणीसाठी नगरपालिका चौकात आणि नंतर पाचोरा रोडवरील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमावाकडून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर बंदोबस्तात शववाहिका शहराबाहेर काढण्यात आली.

मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटना

उत्तरेकडच्या मॉब लिंचिंगच्या बातम्याच आजवर वाचनात येत होत्या. परंतु आता महाराष्ट्रातही त्या घडू लागल्या आहेत. दिल्लीजवळच्या दादरीमध्ये २०२५ साली फ्रीजमध्ये गोमांस असल्याची आवई उठवून जमावाने अखलाकची हत्या केली होती. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर घडलेली ही पहिली आणि गंभीर मॉब लिंचिंगची घटना होती. या घटनेनंतर पंतप्रधानांनी साधा शोकही व्यक्त केला नाही, त्यामुळे देशभरातील साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहीम राबवली.

२०१७ साली पेहलू खान प्रकरणही गाजले. राजस्थानमधील एका दुग्ध उत्पादक शेतकऱ्याची जमावाने गाईच्या तस्करीच्या संशयावरून हत्या केली. त्यानंतर कथित गोरक्षकांनी अनेक निरपराधांना मारहाण केली किंवा त्यांच्या हत्या केल्या. (JAMNER MOB LYNCHING)

झारखंडमध्ये २०१९ साली मुलांच्या अपहरणाबद्दल चुकीच्या माहितीमुळे मॉब लिंचिंगच्या काही घटना घडल्या.  महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातही मुले पळवणा-या टोळीच्या अफवेमुळे तीन साधूंची हत्या करण्यात आली होती.

तबरेझ अन्सारी प्रकरण २०१९ साली खूप गाजले होते. या घटनेत चोरीचा आरोप असलेल्या तबरेझला धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडले गेले.

महाराष्ट्र सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे जामनेर हे कार्यक्षत्र. सरकारचे संकटमोचक म्हणून काम करता करता त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सामान्य माणसांची संकटे वाढवून ठेवल्याचे काही घटकांचे मत आहे.

पत्रकार अजय पाटील यांची महत्त्वाची पोस्ट

झी २४ तासचे माजी पत्रकार अजय पाटील यांनी त्यासंदर्भात फेसबुकवर दिलेली माहिती त्यादृष्टिने खूप महत्वाची आहे. त्यांनी म्हटले आहे की, जामनेर हा तसा शांत तालुका आहे. धर्मावर आधारित वैर किंवा संघर्ष इथे कधी नव्हता. परंतु गिरीश महाजन यांनी २०२३ साली शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांना तालुक्यात आणले. त्यांनी बहुजन तरुणांच्या मनात मुस्लिम विद्वेषाचे बीज पेरले. बहुजन तरुणांना हिंस्त्र श्वापदं बनवून टाकले. याच तरुणांनी एका मुस्लिम तरुणाला झुंडीने गाठून हाल हाल करून मारले.

अजय पाटील यांनी म्हटले आहे की, आदित्य देवरे, सोज्वळ तेली, कृष्णा तेली, अभिषेक राजपूत, रणजित माताडे अशी मॉब लिंचिंगप्रकरणी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. ही सगळी पोरं बहुजन कुटुंबातून आली आहेत. संभाजी भिडे यांना गिरीश महाजन यांनी जामनेरमध्ये आणले. आरोपींचे गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न

घटना घडल्यानंतर आणखी एक आरोप करण्यात आला. ज्या कॅफेमधून मुस्लिम तरुणाचे अपहरण केले गेले, तिथे अवैध कृत्ये चालतात असा आरोप करून प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न झाले. परंतु अजय पाटील यांनी त्यावरही प्रकाश टाकला आहे. या कॅफेचे उदघाटन गिरीश महाजन यांच्याच हस्ते झाले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. अवैध कृत्ये चालतील अशा कॅफेचे उदघाटन गिरीश महाजन करतील का, असा प्रश्नही अजय पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांकडून गुन्हेगारांना संरक्षण

अलीकडच्या काळात देशामध्ये मॉब लिंचिंग हे कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक सौहार्दाच्या संदर्भाने एक गंभीर आव्हान म्हणून समोर आले आहे. सामाजिक-सांस्कृतिक पूर्वग्रह, धार्मिक विद्वेष, राजकीय हेतू आणि अफवांमुळे विशेषतः या घटना  घडतात. राजकीय दबावातून पोलिसांकडून गुन्हेगारांना मिळणारे संरक्षण हे असे गुन्हे वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. धार्मिक विद्वेष पसरवणारे संभाजी भिडे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, नगरचे संग्राम जगताप, पुण्याचे महेश लांडगे अशांना सरकारने मोकळे सोडल्यामुळे समाजातील वातावरण दूषित होत आहे. यापूर्वी अनेक दंगली झाल्या आहेत. आता मॉब लिंचिंगची घटनाही घडली आहे.  पोलिसांनी वर्दीशी प्रामाणिक राहून काम केल्याशिवाय अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही. आणि आजच्या राजकीय संवेदनशून्यतेच्या काळात हेच मोठे कठीण काम होऊन बसले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर