IPL Play-off : ‘प्ले-ऑफ’साठी चुरस वाढली

IPL Play-off

मुंबई : आयपीएलचा अठरावा मोसम अंतिम टप्प्यात आला असताना प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी संघांमधील चुरस वाढली आहे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे तीन संघ अगोदरच प्ले-ऑफमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे, उर्वरित एका जागेसाठी मुंबई इंडियन्स, लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे तीन संघ स्पर्धेत आहे. (IPL Play-off)

गुजरातने रविवारी दिल्लीवर १० विकेटनी एकतर्फी मात करत १८ गुणांसह गुणतक्त्यात अग्रस्थान पटकावण्याबरोबरच प्ले-ऑफ फेरीतील प्रवेशही निश्चित केला. गुजरातच्या या विजयामुळे प्रत्येकी १७ गुण असणाऱ्या बेंगळुरू आणि पंजाब संघांच्या ‘प्ले-ऑफ’मधील प्रवेशावरही शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे, आता या तीन संघांमध्ये गुणतक्त्यातील पहिल्या दोन स्थानांवर राहण्यासाठी स्पर्धा असेल. गुणतक्त्यात पहिल्या दोन स्थानांवर राहणाऱ्या संघांना प्ले-ऑफमध्ये दोन सामने खेळण्याची संधी मिळते. दुसरीकडे, चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांच्या प्ले-ऑफ गाठण्याच्या आशा अगोदरच संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे, आता मुंबई, दिल्ली आणि लखनौ यांपैकी एक संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होईल, हे निश्चित आहे. (IPL Play-off)

सध्या मुंबईचा संघ १२ सामन्यांअखेर १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. मुंबईचे उर्वरित सामने दिल्ली आणि पंजाबविरुद्ध होणार आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास मुंबई संघाचे १८ गुण होतील. त्यामुळे, प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याबरोबरच मुंबई पहिल्या दोन स्थानांसाठीही दावेदारी सांगू शकेल. दोनपैकी मुंबईने दिल्लीविरुद्धचा सामना जिंकला, तरी मुंबईचे १६ गुण होतील व दिल्लीचे आव्हान संपुष्टात येईल. त्या परिस्थितीत मुंबईला प्ले-ऑफकरिता लखनौशी स्पर्धा करावी लागेल. सद्यस्थितीत मुंबईची धावगती गुणतक्त्यात सर्वांत सरस (१.१५६) असून लखनौची धावगती उणे (-०.४६९) आहे. परिणामी, दिल्लीविरुद्ध विजय मिळवणे मुंबईला प्ले-ऑफसाठी पुरेसे आहे. तथापि, दिल्लीकडून पराभव पत्करावा लागल्यास, मुंबईला पंजाबविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य असेल, तसेच पंजाबने दिल्लीला नमवण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. (IPL Play-off)

दिल्लीचा संघ सध्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानी असून त्यांच्या खात्यात १२ सामन्यांअखेर १३ गुण आहेत. त्यांचे उर्वरित सामने मुंबई व पंजाबविरुद्ध आहेत. प्ले-ऑफ प्रवेश निश्चित करण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. यांपैकी मुंबईकडून पराभव पत्करावा लागल्यास त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात येईल. मुंबईविरुद्ध विजय मिळवून पंजाबकडून पराभूत झाल्यास दिल्लीचे १५ गुण होतील. त्या स्थितीत पंजाबनेही मुंबईला हरवावे आणि लखनौने उर्वरित तीनपैकी दोन सामने गमवावेत, अशी प्रार्थना दिल्ली संघाला करावी लागेल.

लखनौचा संघ सध्या ११ सामन्यांमध्ये १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. लखनौचे उर्वरित सामने हैदराबाद, गुजरात आणि बेंगळुरूविरुद्ध आहेत. यांपैकी एकही सामना गमावल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. त्यांची धावगतीही सध्या दिल्ली व मुंबईच्या तुलनेत उणे असल्यामुळे लखनौचा एखादा सामना रद्द झाल्यासही त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याचे सावट आहे. उर्वरित तिन्ही सामने जिंकल्यानंतरही लखनौचे १६ गुण होतील. त्यावेळी, त्यांचा प्ले-ऑफमधील प्रवेश हा मुंबईच्या दोन आणि दिल्लीच्या किमान एका पराभवावर अवलंबून असेल. हेही वाचा :

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर