India Leads : पंत, राहुलची शतके

India Leads

लीड्स : लोकेश राहुल व रिषभ पंतने ठोकलेल्या शतकांमुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत चौथ्या दिवशी चहापानापर्यंत ३०४ धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात ७५ षटकांत ४ बाद २९८ धावा केल्या असून लोकेश राहुल १२०, तर करुण नायर ४ धावांवर खेळत आहे. (India Leads)

हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यामध्ये भारताने तिसऱ्या दिवशी २ बाद ९० धावांपर्यंत मजल मारली होती. सोमवारचा खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात ब्रायडन कार्सने भारताचा कर्णधार शुभमन गिलचा त्रिफळा उडवला. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या गिलला दुसऱ्या डावामध्ये केवळ ८ धावा करता आल्या. त्यानंतर, राहुलने रिषभ पंतसोबत सावध फलंदाजी करून नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत संघाला दीडशतक पार करून दिले. यादरम्यान, राहुलने वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले. उपाहारावेळी खेळ थांबला, तेव्हा राहुल ७२, तर पंत ३१ धावांवर खेळत होता. (India Leads)

उपाहारानंतर, विशेषत: पंतने फटकेबाजी करत धावांचा वेग वाढवला. राहुलने नेहमीच्या शैलीत संयमी खेळ करून कसोटी कारकिर्दीतील नववे शतक पूर्ण केले. त्याने २२७ चेंडूंमध्ये १५ चौकारांसह नाबाद १२० धावांची खेळी केली. पंतने सलग दुसऱ्या डावात शतक झळकावताना १४० चेंडूंमध्ये १५ चौकार व ३ षटकारांसह ११८ धावा फटकावल्या. राहुल व पंत यांनी चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. अखेर बशीरला पंतला बाद करून ही जोडी फोडण्यात यश आले. पंत व राहुलच्या शतकांमुळे एकाच कसोटीत पाच शतके ठोकणारा भारत हा केवळ तिसरा संघ ठरला. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने १९५५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध, तर पाकिस्तानने २००१ मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती. (India Leads)

राहुल दुसऱ्या स्थानी

लोकेश राहुलचे हे सलामीवीर म्हणून सहावे शतक आहे. भारताकडून आशियाबाहेर सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत राहुल दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी भारताकडून सलामीला येत आशियाबाहेर सर्वाधिक १५ शतके झळकावली आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या नावावर सलामीवीर म्हणून आशियाबाहेर ४ शतके आहेत.

केवळ दुसरी वेळ

इंग्लंडमध्ये भारताच्या दोन सलामीवीरांनी तब्बल ८९ वर्षांनी एकाच सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. यापूर्वी, १९३६ मध्ये विजय मर्चंट आणि मुश्ताक अली या सलामीवीरांनी मँचेस्टर कसोटीत शतके साजरी केली होती.

धावफलक : भारत – पहिला डाव ४७१. इंग्लंड – पहिला डाव ४६५.

भारत दुसरा डाव (२ बाद ९० वरून पुढे) – लोकेश राहुल खेळत आहे १२०, शुभमन गिल त्रि. गो. कार्स ८, रिषभ पंत झे. क्राउली गो. बशीर ११८, करुण नायर खेळत आहे ४, अवांतर १४, एकूण ७५ षटकांत ४ बाद २९८.

बाद क्रम ३-९२, ४-२८७.

गोलंदाजी ख्रिस वोक्स १२-३-३२-०, ब्रायडन कार्स १५-२-६२-२, जोश टंग १४-१-५५-०, शोएब बशीर १८-१-८०-१, बेन स्टोक्स १३-२-४०-१, जो रूट ३-०-२१-०.

हेही वाचा :
हॉकीपटू ललित उपाध्याय निवृत्त
 नीरजने जिंकली पॅरिस डायमंड लीग

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय