नॉर्दम्प्टन : इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारत अ संघाने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनौपचारिक कसोटीमध्ये पहिल्या डावात ३४८ धावा केल्या. त्यानंतर, शनिवारी दुसऱ्या दिवशी, लायन्सच्या डावादरम्यान पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर लायन्सने ३५ षटकांत २ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारली होती. (India A)
लोकेश राहुलचे शतक आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत अ संघाने सामन्याच्या पहिल्या दिवशी ७ बाद ३१९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारताच्या तळाच्या फलंदाजांना धावसंख्येत अवघ्या २९ धावांची भर घालता आली. त्यामुळे, भारताचा डाव पहिल्या सत्रामध्ये ३४८ धावांत संपुष्टात आला. लायन्स संघाकडून ख्रिस वोक्सने ३, तर जोश टंग आणि जॉर्ज हिल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या लायन्स संघाची पहिली विकेट आठव्या षटकात गेली. भारताच्या अंशुल कम्बोजने सलामीवीर बेन मॅकनीला अवघ्या १२ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर, टॉम हेन्स आणि एमिलिओ गे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. (India A)
हेन्सने अर्धशतक पूर्ण करताना ८८ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ५४ धावा फटकावल्या. अखेर तुषार देशपांडेला ही जोडी फोडण्यात यश आले. तेहतिसाव्या षटकात पावसामुळे खेळ थांबला. खेळ पुन्हा सुरू झाला, तेव्हा एमिलिओने जॉर्डन कॉक्सच्या साथीने पस्तिसाव्या षटकात संघाचे दीडशतक पूर्ण केले. (India A)
संक्षिप्त धावफलक : भारत अ – पहिला डाव ८९.३ षटकांत सर्वबाद ३४८ (लोकेश राहुल ११६, ध्रुव जुरेल ५२, करुण नायर ४०, ख्रिस वोक्स ३-६०, जॉर्ज हिल २-५६) विरुद्ध इंग्लंड लायन्स – पहिला डाव ३५ षटकांत २ बाद १५४ (टॉम हेन्स ५४, एमिलिओ गे ४९, अंशुल कम्बोज १-३८, तुषार देशपांडे १-४४).
हेही वाचा :
भारताचे चौघे बुद्धिबळपटू ‘टॉप टेन’मध्ये