लॉसन : इतिहासात प्रथमच भारताच्या चार बुद्धिबळपटूंनी जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले आहेत. डी. गुकेश, अर्जुन एरिगैसी, आर. प्रज्ञानंद आणि अरविंद चिदंबरम हे चौघे बुद्धिबळपटू जागतिक क्रमवारीत ‘टॉप टेन’मध्ये पोहोचले आहेत. (Chess Ranking)
नुकत्याच झालेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेश तिसऱ्या, तर अर्जुन पाचव्या स्थानी राहिला. जागतिक क्रमवारीत मात्र अर्जुनचे २,७७८.६ एलो पॉइंट असून तो चौथ्या स्थानावर आहे. त्याखालोखाल विश्वविजेता गुकेश २,७७६.६ गुणांसह पाचव्या, तर प्रज्ञानंद २,७७४.२ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. अरविंदने प्रथमच टॉप टेनमध्ये स्थान पटकावले आहे. सहाव्या स्टीफन अवाग्यान मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत अरविंदने ६.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. या विजेतेपदामुळे त्याचे गुणांकन ८.८ ने वाढून २७५७.८ इतके झाले. परिणामी त्याच्या क्रमवारीत दोनने सुधारणा होऊन तो अकरावरून नवव्या स्थानी पोहोचला. (Chess Ranking)
स्टीफन स्पर्धेच्या नवव्या फेरीअखेर अरविंद आणि प्रज्ञानंद यांच्यामध्ये ६.५ गुणांची बरोबरी झाली होती. परंतु, अरविंदने त्याच्यापेक्षा क्रमवारीत वरचढ असलेल्या बुद्धिबळपटूंविरुद्ध सरस कामगिरी केल्यामुळे त्याचे टायब्रेकर गुण अधिक होते. याआधारे त्याला विजेता घोषित करण्यात आले. दरम्यान, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशला अखेरच्या फेरीपर्यंत विजेतेपदाची संधी होती. मात्र, अखेरच्या फेरीत त्याला अमेरिकेच्या फॅबिआनो कॅरुआनाकडून पराभव पत्करावा लागला. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने १६ गुणांसह गुणतक्त्यात आघाडी घेत सातव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (Chess Ranking)
हेही वाचा :
पियुष चावला निवृत्त