स्फूर्तिदायी शिवपुतळ्याचा सुवर्णमहोत्सव

सतीश घाटगे : कोल्हापूर

भक्ती, शक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम नित्यनियमाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात अनुभवास येतो. विद्यापीठात आजअखेर शिकून गेलेल्या आणि शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा येथील मुख्य इमारतीसमोरील पुतळा ऊर्जा आणि स्फूर्ती देतो. या पुतळ्याचा सुवर्णमहोत्सवदिन रविवारी, एक डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. शिल्पकार स्वर्गीय बी. आर. खेडकर यांनी साकारलेला हा पुतळा शेतकरी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एक रुपयाच्या निधीतून उभारला आहे.

महाराष्ट्राचे भाग्यविधाते, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि विद्यापीठ स्थापनेसाठी कार्यतत्परेतेने स्वत:ला झोकून देणारे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई, डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी शिवाजी विद्यापीठातून शिक्षण घेऊन देशसेवेसाठी कार्यतत्पर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रांगणात मिळावी यासाठी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कारकिर्दीत निर्णय घेण्यात आला. पुतळ्यासाठी १९७० मध्ये जाहिरात देऊन डिझाईन मागवण्यात आले. यामध्ये शिल्पकार बी. आर. खेडकर यांचे डिझाईन निश्चित करण्यात आले. कुलगुरू आप्पासाहेब पवार हे स्वतः इतिहासाचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांनी पुतळ्याच्या डिझाईनमध्ये जातीने लक्ष घातले. खेडकर यांनी यापूर्वी उभारण्यात आलेल्या अनेक शिवाजी पुतळ्यांचे निरीक्षण केले. जातिवंत घोड्यांचेही निरीक्षण केले. अभ्यास, निरीक्षण आणि अनुभवाच्या जोरावर खेडकर यांनी १९७१ मध्ये पुतळा तयार करण्यास सुरुवात केली. अथक परिश्रम आणि निष्ठेने साडेअठरा फुटांचा आणि आठ टन वजनाचा डौलदार अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा साकारला गेला.

शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीच्या समोर भव्य चबुतऱ्यावर पुतळ्याची उभारणी करण्यात आली. एक डिसेंबर १९७४ ला तत्कालीन सरंक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. एक डिसेंबर २०२४ रोजी पुतळ्याला पन्नास वर्षे पूर्ण होत असून, शिवाजी विद्यापीठाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

असा आहे पुतळा

अश्वारूढ पुतळ्यावर छत्रपती शिवरायांनी पक्की मांड मारली असून, डाव्या हाताने लगाम खेचला आहे. शिवरायांच्या हातात समशेर असून पाठीवर ढाल बांधली आहे. डोक्यावर जिरेटोप, अंगरखा घातलेले शिवाजी महाराज शत्रूवर चाल करून निघालेल्या करारी आणि आत्मविश्वासाने भारलेल्या मुद्रेत आहेत. बी. आर. खेडेकर यांनी बारीकसारीक बारकावे टिपून पुतळा साकारला आहे. शिवरायांची करारी मुद्रा, लगाम ओढल्यानंतर वळलेली घोड्याची मान आणि जमिनीवर घोड्याची एक टाप, तर दुसरी हवेत आहे. या पुतळ्याने शिवाजी विदयापीठात शिक्षण घेणाऱ्या हजारो विदयार्थी, प्राध्यापकांना स्फूर्ती दिली आहे. या पुतळ्याची भव्यता, रूप आणि महाराजांच्या कार्यासमोर सर्वजण नतमस्तक होतात.

 ऊसउत्पादक शेतकरी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांकडून निधी

शिवाजी महाराजांचा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. जिल्ह्यातील ऊसउत्पादक शेतकरी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक रुपया पुतळ्यासाठी निधी घेण्यात आला. जिल्ह्यातील भोगावती, दूधगंगा-वेदगंगा, कुंभी-कासारी, वारणा आणि पंचगंगा सहकारी साखर कारखान्यांनी ऊसउत्पादक शेतकऱ्यांकडून जमा केलेला प्रत्येकी साठ हजार रुपयांचा निधी विद्यापीठाकडे सुपूर्द केला, तर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ६६ हजार ५९० रुपयांचा निधी जमा केला.

सुवर्णमहोत्सवी पुतळा अनावरणाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम

शिवाजी महाराज पुतळा अनावरण सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला ३० नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या कन्या शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के आणि खेडकर कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुतळ्याच्या माहिती पुस्तिका आणि फलकाचे अनावरण होणार आहे. तसेच शाहीर पोवाडाही सादर करणार आहेत.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी