नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला शंभर दिवस उलटून गेले तरी दहशतवाद्यांना पकडण्यात सरकारला अपयश का आले?, सरकारला त्यांचा ठावठिकाणा अद्याप सापडत नाही का?, तुमच्याकडे ड्रोन आहेत, उपग्रह आहेत, पेगासस आहे… मग तुम्ही कोणालाही अटक का केली नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी मोदी सरकारवर केली. (Gogoi’s attack on Modi Govt)
ऑपरेशन सिंदूरवर सोमवार (२८ जुलै)पासून संसदेच्या अधिवेशनात सुरू झालेल्या चर्चेदरम्यान गोगोई यांनी आक्रमकपणे प्रश्न विचारत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली.
कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. की सरकारने खोऱ्यातील पर्यटकांना सुरक्षिततेचे आश्वासन दिले होते. त्यांना भेट देण्यासाठी प्रोत्साहित केले होते, परंतु पहलगाम हल्ल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीयांवर होणारे सर्वात भयानक हल्ले सध्याच्या सरकारच्या काळात झाले आहेत, असा आरोपही गोगोई यांनी केला. (Gogoi’s attack on Modi Govt)
गोगोई यांनी देशाचे संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांच्या ब्लूमबर्ग मुलाखतीचा उल्लेख केला. या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात भारताला झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला होता.
आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून युद्धबंदीचे कारण जाणून घ्यायचे आहे, असे गौरव गोगोई म्हणाले. (Gogoi’s attack on Modi Govt)
“व्यापारावर परिणाम होण्याची धमकी देऊन भारत आणि पाकिस्तानला युद्धबंदीसाठी भाग पाडले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २६ वेळा केला आहे. आम्हाला यामागील सत्य जाणून घ्यायचे आहे,” असे गोगोई म्हणाले.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ते भारताच्या आंतरराष्ट्रीय राजनैतिकतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.. “भारत पाकिस्तानला आयएमएफची मदत का थांबवू शकला नाही?” असा सवाल त्यांनी केला.
सत्याला सामोरे जा
देश दहशतवादाविरुद्ध आणि सत्याच्या बाजूने सरकारसोबत उभा आहे. “आम्ही शत्रू नाही, आम्ही आमच्या देशाच्या आणि आमच्या सशस्त्र दलांच्या बाजूने आहोत, परंतु तुम्ही आम्हाला सत्य सांगावे,” असे ते म्हणतात. आम्ही खोटेपणा आणि फसवणुकीबद्दल सरकारला प्रश्न विचारत राहू, असे ते म्हणाले.