‘सारें’चे राजकीय वारसदार गणपतराव पाटीलच

जयसिंगपूर;  प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले. विकासाला गती दिली. त्यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच आहेत. हा वारसा कोणीही घेऊ शकत नाही. गेल्या निवडणुकीत सर्वांनी ज्यांना मदत करून आमदार केले, ते भाजपाचे आहेत, ते शिंदेंचे आहेत की, अजित पवार गटाचे आहेत हे सांगावे. आता ते स्वतःच्या आघाडीकडून निवडणूक लढवीत आहेत, यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केला.  शिरोळ विधानसभेचे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित जाहीर प्रचार ते बोलत होते.

महायुतीचा एकमेव अजेंडा जातीय तेढ, समाजात भांडणे लावणे हा आहे. आपले भवितव्य सुखकारक करण्यासाठी आणि भविष्य घडविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. बदल हवा तर आमदार हवा, असा दृष्टिकोन ठेवून परिवर्तन करा. संयमी, सुसंस्कृत, सर्वांना भेटणारे आणि कामे करणारे असे गणपतराव पाटील यांचे नेतृत्व आहे. त्यांना विजयी करा. आमची सगळी ताकद तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही सतेज पाटील यांनी दिली.

प्रा. सुकुमार कांबळे, रघुनाथ देशिंगे, विजय धुळूबुळू, आण्णासाहेब हावले, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, राजू वडर यांनीही गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

गणपतराव पाटील यांनी आपण आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि जनतेचा आमदार म्हणून काम करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले. स्वागत व प्रास्ताविक अमरसिंह नाईक यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले. चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी आभार मानले.

यावेळी पक्ष निरीक्षक साके शैलजानाथ, ठाकरे शिवसेनेचे चंगेजखान पठाण, जिल्हा प्रमुख वैभव उगळे, बाजीराव मालुसरे, मधुकर पाटील, कॉ.आप्पा पाटील, अशोकराव कोळेकर, रघुनाथ पाटील, सर्जेराव पवार, भवानीसिंह घोरपडे, हसन देसाई,  संजय पाटील कोथळीकर, युनूस डांगे, दिलीप पाटील कोथळीकर, माजी नगराध्यक्षा अनिता कोळेकर, दत्तच्या संचालिका अस्मिताताई पाटील, ॲड. इंद्रजित कांबळे, आदी उपस्थित होते.

Related posts

काँग्रेसमुळे आखातातील भारतीयांचे जीव धोक्यात; पंतप्रधान मोदींची टीका

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही :  डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन