पॅरीस : नेपाळमधील हिंसाचाराचे वातावरण शांत होतेय न होतेय तोच बुधवारी (१० सप्टेंबर) फ्रान्समध्येही हिंसाचाराचा भडका उडाला. देशभर निदर्शने सुरू झाली आहेत. निदर्शक आणि पोलिसांची झटापट सुरू आहे. निदर्शकांनी रस्ते अडवले आणि जाळपोळ केली. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या सरकारविरुद्ध जनतेचा रोष वाढला आहे. (France Unrest)
‘ब्लॉक एव्हरीथिंग’ चळवळीच्या नेतृत्वाखाली हजारो लोक रस्त्यावर उतरले. प्रचंड गोंधळ आणि अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा रस्त्यावर उतरल्या असून पहिल्या काही तासांत २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजधानी पॅरीसमध्ये निदर्शक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी ठिकठिकाणी लावलेली बॅरिकेड्स पेटवली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. (France Unrest)
गृहमंत्री ब्रुनो रिटेललेऊ म्हणाले की रेनेसमध्ये एक बस जाळण्यात आली आणि वीज वाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे नैऋत्येकडील रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या. त्यांनी निदर्शकांवर ‘बंडाचे वातावरण’ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
मोठ्या प्रमाणात होणारे गोंधळ रोखण्यासाठी मॅक्रॉन सरकारने देशभरात ८०,००० पोलिस तैनात केले होते. तरीही, निदर्शकांनी बॅरिकेड्स तोडली, आगी लावल्या आणि अनेक प्रदेशांमध्ये तीव्र निदर्शने केली. पॅरिसमध्ये कचऱ्याचे डबे पेटवण्यात आले. प्रमुख रस्त्यांवर अडथळे आणल्याचे वृत्त आहे. (France Unrest)
अधिकाऱ्यांनी सांगितले की स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत राजधानीत ७५ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते, परंतु अशांतता पसरविणाऱ्यांवर दिवसभर कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत, पोलिसांनी देशभरात सुमारे २०० जणांना अटक केल्याची पुष्टी केली. “ब्लॉक एव्हरीथिंग” चळवळीने देशाला ठप्प करण्याचे घोषित उद्दिष्ट पूर्णपणे साध्य केले नसले तरी, त्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले ज्यामुळे वाहतूक, कामाचे प्रवास आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.