कोल्हापूर : प्रतिनिधी : सांगली पोलिसांनी बनावट नोटया खपवणाऱ्याला अटक करुन तपास केला असता पोलिसांना बनावट नोटांचे घबाड मिळून आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यातील चौघे संशयित कोल्हापुरचे आहेत. बनावट नोटा कोल्हापुरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या रुईकर कॉलनीत छापल्या जात होते हे तपासात पुढे आले आहे. तसेच कोल्हापूर पोलिस दलातील एक पोलिस या गुन्ह्यात सापडला आहे. पोलिसांनी एक कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Fake currency notes Miraj Kolhapur connection)
मिरज पोलिसांनी सुप्रित काडाप्पा देसाई (वय २२, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहूल राजाराम जाधव (३३,रा. कोरोची, ता. हातकणंगले), इब्रार आदम इनामदार (४४, विश्वकर्मा अपार्टमेंट कसबा बावडा, कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४० रा. वनश्री अपार्टमेंट, टाकाळा, राजारामपुरी, कोल्हापुर), सिद्धेश जगदीश म्हात्रे, (वय ३८ रा. मालाड मुंबई) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या १९ हजार ६८७ बनावट नोटा, २०० च्या ४२९ बनावट नोटा, लॅपटॉप, प्रिंटर, इतर साहित्य, एक इनोव्हा कार असा एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
निलजी बामणी रोडवर ब्रिजखाली घेतले सुप्रीतला ताब्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा खपवण्याची शक्यता लक्षात घेऊन सांगली पोलिसांनी तपास सुरु केला. मिरजेतील महात्मा गांधी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिरजेतील कोल्हापूर ब्रिजखाली निलजी बामणी रोडवर एक व्यक्ती बनावट नोटा खपवण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिस उप निरीक्षक रुपाली गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून पुलाच्या खाली एक व्यक्ती घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशयित सुप्रीत काडाप्पा देसाई ( रा. गडहिंग्लज, ता. कोल्हापूर) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात ५०० रुपयांच्या ४२ हजार किंमतीच्या ८४ बनावट नोटा मिळून आल्या. बनावट नोटा हुबेहुब होत्या पण नोटेवरील हिरव्या रंगाची स्ट्रीप आणि महात्मा गांधीचा वॉटरमार्क जुळत नव्हता. पोलिसांनी सुप्रीत देसाई याला अटक केली. (Fake currency notes Miraj Kolhapur connection)
सुप्रित देसाईकडे अधिक तपास करुन पोलिसांनी राहूल राजाराम जाधव (वय ३३ रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), याला ताब्यात घेतले. राहूल जाधव हा कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथे बनावट नोटा तयार करत होता. या बनावट नोटा तो सुप्रित देसाई, इब्रार आदम इनामदार (वय ४४, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा. टाकाळा) यांना खपवण्यासाठी देत होते. सुप्रित देसाई, इब्रार इनामदार, नरेंद्र शिंदे हे विविध शहरात नोटा खपवत होते.
उच्चभ्रू रुईकर कॉलनीत नोटांची छपाई
पोलिसांनी राहूल जाधव यांच्या मार्केट यार्ड रुईकर कॉलनी परिसरातील त्याच्या कंपनीवर छापा टाकून ५०० रुपयांच्या ६८ बनावट नोटा जप्त केल्या. तसेच बनावट नोटांची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप, प्रिंटर इतर साहित्यही जप्त केले.
बनावट नोटा खपवायला पोलिस पुढे
इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात मुख्यालयात कार्यरत आहे. तो पोलिसांच्या वाहनांवर वाहनचालक आहे. पोलिसांनी इनामदार आणि नरेंद्र शिंदे यांना पुणे बेंगळुरु महामार्गावरील पेठ नाका ते कासेगाव मार्गावर विना नंबरप्लेटच्या टोयोटा इनोव्हा या चारचाकीसह पकडले. या कारमध्ये पाचशेच्या १९ हजार ५३५ बनावट नोटा, २०० रुपयांच्या ८५ हजार ८०० नोटा जप्त केल्या. त्यांच्यासोबत असलेल्या मुंबईतील सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, रा. मालाड, मुंबई) याला ताबयात घेऊन त्याच्याकडील बनावट नोटा, लॅपटॉप, यालाही ताब्यात घेतले.
यांनी केला तपास
पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रुपाली गायकवाड, पूनम पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सर्जेराव पाटील, सर्जेराव पवार, पोलिस नाईक राहूल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, बनसवराज कुंदगोण् राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, विनोद चव्हाण, विनायक झांबरे, संतोष डामसे, महेश गुरव, संदीप घोडे, विकास कांबळे, सतीशकुमार पाटील, निवास माने, सुधीर खोंद्रे, सायबर शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली बोबडे, कॉन्स्टेबल अभिजीत पाटील, अजय पाटील यांनी तपास केला.