Home » Blog » Shahu and health sector: आरोग्यदक्ष राजा

Shahu and health sector: आरोग्यदक्ष राजा

by प्रतिनिधी
0 comments
Shahu and health sector

राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्लेग साथीच्या निर्मूलनासाठी केलेल्या उपाययोजना आजही आदर्शवत वाटाव्यात अशाच आहेत. राज्यकर्ते म्हणून लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणाऱ्या या राजाने आरोग्यक्षेत्रातसुध्दा भरीव योगदान दिले आहे. (Shahu and health sector)

-विक्रम रेपे

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर सार्वजनिक आरोग्य हा कळीचा मुद्दा ठरत आहे. सद्यस्थितीत प्रत्येक देश विविध प्रकारचे कायदे करून आपल्या नागरिकांचे आरोग्य योग्य स्थितीत अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जगाला याच कोरोनाने संसर्ग होऊ नये म्हणून अलगीकरण (Quarantine) नव्याने करायला भाग पाडले. पण आमच्या राजाने शंभर वर्षांपूर्वीच या गोष्टींचा अभ्यास करून त्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी आपल्या संस्थानात आदेश दिला होता. पुराभिलेख कार्यालयातील ठराव बुकांमध्ये स्पष्टपणे Quarantine हा शब्द लिखित पुरावा म्हणून आपण प्लेग साथीच्या काळातील आदेशात पाहू शकतो.  यातूनच राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी आपल्याला जाणवते. इतिहासाची पाने यासाठीच तर चाळून यातून शिकवण घ्यायची असते. (Shahu and health sector)

आरोग्य चांगले राहण्यासाठी आपले शरीर तंदुरुस्त असले पाहिजे अशी शाहू महाराजांची धारणा होती. करवीर संस्थानात जे क्रीडा प्रकार विकसित झाले त्यामागे निश्चितच युवा पिढीचे आरोग्य चांगले राखण्याचा हा महत्वाचा प्रयत्न होता. ‘पिळदार शरीरयष्टी हेच तर राजर्षी शाहू महाराजांनी विकसित केलेल्या लाल मातीतल्या रांगड्या कुस्तीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आज मैदानी खेळ हरवत असताना नक्कीच कुस्तीसारखे क्रीडा प्रकार सार्वजनिक आरोग्यामध्ये समतोल अबाधित ठेवण्याचा प्रबोधनात्मक सध्याही प्रयत्न करत आहेत. आजवर आपल्या प्रजेच्या आरोग्यासाठी इस्पितळे उघडून त्यांच्या उपचारासाठी सोय करणारे अनेक राजे इतिहासाने पाहिले, परंतु बालपणापासूनच बलसंवर्धनाचे धडे देऊन प्रजेचे संपूर्ण आयुष्यच बळकट करणारे राजे विरळाच. राजर्षी शाहू महाराजांना मानवी आजार व रोग्याविषयी कणव व दया होती. १८८१ साली राजर्षी शाहू महाराजांनी नरसोबाची वाडी येथे  महारोग्यांच्या झुंडीच्या झुंडी खरकट्या अन्नावर जगताना पाहिल्या. समाजातून बहिष्कृत जीणे जगणाऱ्या या उपेक्षिताची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी १८९७ साली राजर्षी शाहू महाराजांनी क्वीन एलिझाबेथ लेपर असायलमची स्थापना करुन महारोग्यासाठी स्वतंत्र वसाहत निर्माण केली. (Shahu and health sector)      

देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना देखील राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी निमंत्रित केले होते. परंतु त्या कोल्हापुरात येण्याआधीच त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांनी ती धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सक्षमपणे आपले कर्तव्य बजावले.

सर अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल म्हणजेच सध्याचे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय (CPR Hospital) या ठिकाणी डॉक्टर कृष्णाबाई केळवकर कार्यरत होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान म्हणून महिला विभागासाठी स्वतंत्र वार्डाची नेमणूक करून राजर्षी शाहू महाराज यांनी केळवकर यांना त्याचे प्रमुखपद बहाल केले. आज महिलांच्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर दिसतात. परंतु स्त्रियाना दुय्यम दर्जा असलेल्या काळात  स्वतंत्र महिला विभागाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या आरोग्याचे हित जोपासलेले दिसते.

राजर्षी शाहू महाराजांचे जगातील नवीन उपचार पध्दती, वैद्यकीय जगतातील नवीन संशोधन याकडे लक्ष असे. जगभरात होमिओपॅथी तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने विकसित झाले आहे. १९०२ साली एडवर्ड राजाच्या राज्याभिषेक समारंभासाठी शाहू महाराज लंडन येथे गेले होते. त्या ठिकाणी लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटलला शाहू महाराजांनी आवर्जून भेट दिल्याची नोंद धनंजय कीर यांनी केली आहे. या इंग्लंड भेटीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे बंधू पिराजीराव उर्फ बापूसाहेब घाटगे हे आजारी पडले. त्यावेळी बापूसाहेब घाटगे यांच्यावर होमिओपॅथी पद्धतीने उपचार केल्याची नोंद त्यांच्यासोबत असणाऱ्या डॉक्टर टेंगशे यांनी आपल्या नोट्समध्ये केली आहे.

करवीर संस्थानात पहिला सार्वजनिक दवाखाना उभा करण्याचे श्रेय सुद्धा राजर्षी शाहू महाराज यांनाच जाते. विदेशात असलेले वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आपल्या संस्थानात आणण्यासाठी शाहू महाराजांनी आवर्जून केलेले प्रयत्न आपल्याला या नोंदीतून दिसतात. (Shahu and health sector)

कोल्हापूर संस्थानात आलेल्या प्लेगच्या साथीवेळी लस टोचून घेण्यास नागरिक तयार नव्हते. त्यावेळी घरच्या नोकरासहित स्वतः शाहू महाराजांनी लस टोचून घेतली आणि इतरांना त्यासाठी प्रवृत्त केले. संस्थानच्या कर्मचाऱ्यांना लस टोचून घेण्यासाठी खास तीन दिवसांची रजा देण्यात आली. यातून आरोग्य विषयक जनजागृतीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी विशेष उपक्रम राबविल्याचे आपल्याला दिसते. प्लेगची साथ ही उंदरांमार्फत पसरत होती. शाहू महाराजांनी उंदरांचा नाश होण्यासाठी उंदीर धरून देणाऱ्या व्यक्तीस प्रत्येक उंदरांसाठी एक पैसा याप्रमाणे बक्षीस जाहीर केले होते. (Shahu and health sector)

मिरज येथील मिशनरी हॉस्पिटलसाठी शाहू महाराजांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. तेथील डॉक्टर वानलेस यांनी कोल्हापुरात सेवा द्यावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. यातूनच कोल्हापुरात कावळा नाका येथे हॉस्पिटलची उभारणी केली. तसेच हॉस्पिटलला डॉक्टर वानलेस यांच्या पत्नीचे नाव मेरी वानलेस असे दिले.

कल्पना मेहता यांनी पीएचडी शोधनिबंध  ‘ए स्टडी ऑफ पब्लिक हेल्थ ऑफ कोल्हापूर (१८५८-१९४४) मांडला आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आरोग्यविषयक केलेल्या कार्याचे एक संपूर्ण प्रकरण त्यांनी समाविष्ट केले आहे.

रयतेच्या उत्तम आरोग्यासाठी शाहू महाराजांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. कोल्हापूर स्टेट सर्विसमधील दवाखान्यात लागणारे कंपौंडर्स व नर्सेस नेमताना चांगल्या ट्रेन्ड असलेल्या व सर्व जातीधर्मातील नेमाव्यात असा आदेश महाराजांनी दिला होता. यासंबंधी आवश्यक मनुष्यबळ न मिळाल्यास वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पुढील तजवीज करावी असे सुद्धा शाहू महाराजांनी आदेशात नमूद केले आहे.

आरोग्य क्षेत्रामध्ये लागणाऱ्या मनुष्यबळासाठी अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण देण्याचा एक वर्ग शाहू महाराजांनी सुरू केला होता. तसेच या वर्गात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींना स्कॉलरशिप देण्याबाबतही देखील शाहू महाराजांनी आदेश दिलेले आढळतात.

कोल्हापूर संस्थानासह संस्थांनाबाहेरसुद्धा वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांना शाहू महाराजांनी वेळोवेळी भरीव मदत केली होती. दिल्ली येथील लेडी हार्डीस मेडिकल कॉलेज या संस्थेस मदत म्हणून ४००० रुपये देण्याबाबतचा आदेश शाहू महाराजांनी दिला होता.

शाहू महाराजांचे आरोग्यविषयक निवडक आदेश

  • हिंदू व भंगी यांच्या स्मशानाची जागा आरोग्याच्या दृष्टीने चांगली नसल्याने दुसरीकडे व्यवस्था करणे बाबत. मुलकी ठराव क्रमांक १४९२ /दिनांक ४ जून १९०६
  • शाहूपुरीवरील ओढ्याचे काठी असलेले स्मशान बंद करून त्याऐवजी पंचगंगा नदीवरील स्मशानाचा उपयोग करण्यास व लोकांसमोर दवंडी द्यावी असा हुकूम देण्यात यावा : शाहू महाराज (Shahu and health sector)
  • कॉलरा होऊ नये म्हणून स्वच्छता : चिंचलीच्या यात्रेत कोर्ट राहून त्याचा फायदा बराच झाला तशा श्री जोतिबाच्या यात्रेत होऊ नये म्हणून तेथील गायमुख तलावाचे पाणी स्वच्छ ठेवणे व भंगी वेगळी नेऊन साफसफाई राखणे बद्दल शाहू महाराजांनी हुकूम दिला होता त्या संदर्भातील आवश्यक खर्चास त्यांनी मंजुरी दिली होती.
  • डॉक्टर वानलेस यांच्या दवाखान्यातील लोकांच्या प्रशिक्षणाबाबत महाराजांनी अनेक सूचना देऊन त्यासंबंधी योग्य ती रक्कम मंजूर केली होती.
  • मिरज येथील डॉक्टर वान्लेस यांच्या हॉस्पिटल येथे राजश्री शाहू महाराजांनी स्वतः भेट दिली होती. यावेळी तेथील डॉक्टरांच्या असिस्टंटच्या वर्गाची त्यांनी प्रशंसा केली होती. 
  • राजर्षी शाहू महाराजांनी दवाखाना ठराव क्रमांक ६७० मध्ये परिचारिका नर्सेस यांचा मेहनताना निश्चित केला होता. यामध्ये रोज जाऊन येऊन दवाखान्यातील काम सांभाळून पेशंट अटेंड केल्याबद्दल, बाळंतीणीची सुटका करून मुलाची सुश्रुषा यासह विविध नर्सिंग कार्यासंबंधीत नियमावली आहे.
  • जनावरांचे रोग व त्याची चिकित्सा व उपचार या माहितीच्या पुस्तकाच्या प्रती प्रदर्शन रकमेतून छापून घेण्याच्या खर्चास मंजुरी दिलेबाबत ठराव –
  • राजर्षी शाहू महाराजांचे प्राणी प्रेम आणि भूतदया अनेक प्रसंगातून आपल्याला जाणवते. जनावरांमध्ये उद्भवणारे रोग व त्यावरील चिकित्सा यासाठी माहितीचे पुस्तक छापून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रकमेची मंजुरी शाहू महाराजांनी दिली होती.
  • आरोग्य क्षेत्रामध्ये उपचारासाठी विविध औषधी झाडांची आवश्यकता असते. यासाठी कात्यायनी पार्क या बागेस बोटॅनिकल गार्डन असे नाव देणेबाबत व त्यात सर्व औषधी झाडे लावावीत असा मुलकी ठराव शाहू महाराजांनी केला होता.

सार्वजनिक आरोग्यामध्ये स्वच्छता महत्त्वाची असते. यासाठी शाहू महाराजांनी सातत्याने आदेश दिले आहेत पंचगंगा घाट, कळंबा तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठीचा ठराव शाहू महाराजांनी केला होता.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00