कोल्हापूर : प्रतिनिधी : दोन लाखाचा मकाउ पोपट, बुटकी राधा म्हैस, महाकाय सुल्तान रेडा, सात लाखाचा राजवीर घोडा, काटेरी उंदीर, १५ किलोचा भोपळा, वासाचा आंबे मोहोर, हातसडीचा तांदूळ यासाठी आधुनिक शेतीसाठी नांगर, विविध शेती उत्पादने पाहण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेसह शहरातील नागरिकांनी सतेज कृषी पाहण्यासाठी तपोवन मैदानावर गर्दी केली आहे. या कृषी प्रदर्षनात हजारो रुपयांची उलाढाल झाली आहे.
शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२५” आयोजन करण्यात आले आहे. आठ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. (Butki buffalo parrot )
प्रदर्शनात सर्वात आकर्षण आहे ते पशु, पक्षी प्रदर्षनाचे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्ड करणारी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावची तीन फुटाची राधा म्हैस प्रदर्शनाची मुख्य आकर्षण आहे. अनिकेत त्रिंबक बोराटे यांची ही म्हैस असून १९ जून २०२२ रोजी तिचा जन्म झाला आहे. आणि एक वर्षानंतर ती बुटकी असल्याचे लक्षात आले. जगात ही एकमेव गाय असल्याचे अनिकेत बोराटे यांनी सांगितले. तीन वर्षे वयाची दोन फूट आठ इंच ३१४ किलो वजन तेरा कृषी प्रदर्शनात सहभाग आणि सर्वत्र एक नंबरचे आकर्षण ही म्हैस ठरली आहे. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ताडमाड उंचीची दणकट खिलारी बैलाची माहिती ग्रामीण भागातील शेतकरी त्यांच्या मालकांकडून घेत असल्याची चित्र प्रदर्शनात पहायला मिळाले. (Butki buffalo parrot )
अडीच लाख रुपये किंमतीचा गोल्डन मकाऊ पोपट पाहण्यासाठी अबालवृध्दांनी गर्दी केली आहे. या पक्षांच्या स्टॉलला बच्चे कंपनीने घेराव घातला आहे. आफ्रिकन ग्रे पोपटी, पायपुरी धमनगरी, कोकॅटल, स्मॉल कन्नूर, लव्ह बर्डस्, डव्ह, काटेरी उंदीर, ससे, विदेशी कोंबड्याचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
प्रदर्शनात सुल्तान नावाचे दोन रेडे आहेत. सुल्तान फस्ट जाफराबादी रेडा ५५० किलो वजनाचा असून दोन वर्षे दहा महिने वयाचा आहे. खुपिरेतील भैरु नावाचा लांब शिंगे असलेला रेडा लक्ष वेधून घेत होता. अमर अप्पाजी केंबळेकर यांच्या मालकीचा हा रेडा असून हा टेबलावर दोन पायावर उभा राहितो. सुल्तान रेड्याचा सकाळी आणि रात्री रोज दोन लिटर दूध आणि ४० किलो चारा असा त्याचा आहार आहे. कागल तालुक्यातील हसुर ब्रुदुक गावचे अरविंद बोटे यांच्या मालकीचा आहे. (Butki buffalo parrot )
काळा रंगाचा आणि कपाळावर पांढरा पट्टा असलेला रुबाबदार राजवीर घोड्याची मांड पक्की आहे. १८ महिने वयाच्या राजवीरची किंमत सात लाख रुपये आहे. पाच वर्षाचा पांढरा रंगाचा राजा आणि काळया रंगाचा राजवीर यांचे फोटो घेण्यासाठी तरुणाईचे मोबाईल कॅच करत होते.
तपोवन मैदानात भरलेल्या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. प्रदर्शात २०० कंपन्याचा सहभाग असल्याचे संयोजकांनी सांगितले. शेतीसाठी उपयुक्त नांगर, तणनाशके, ओषधांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. शेतीतून उत्पादित झालेल्या मालांचे स्टॉलही मांडण्यात आले आहे.
तांदुळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंबे मोहोर, बासमती, हातसडीचा तांदूळ उपलब्ध करुन दिला आहे. तसेच नाचणीसह ज्वारी, तांदळाचे पदार्थ मांडण्यात आले आहेत. शहरवासियांनी तांदूळ खरेदीला चांगला प्रतिसाद दिला आहे.
दुपारच्या सत्रात शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मान्यवरांच्या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी जिज्ञासू शेतकरी आणि अभ्यासकांची उपस्थिती असते. प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी, यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,आत्मा,पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद,पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत