Home » Blog » Kunal Patil: सहा दशके घरात काँग्रेस… तरीही भाजपमध्ये प्रवेश

Kunal Patil: सहा दशके घरात काँग्रेस… तरीही भाजपमध्ये प्रवेश

by प्रतिनिधी
0 comments
Kunal Patil

कुणाल पाटील भाजपमध्ये गेले. आजोबा, वडिलांपासूनच्या सहा दशकांचा काँग्रेसचा वारसा त्यांनी अरबी समुद्रात बुडवला. साठ वर्षे घरात काँग्रेस असूनही ते काँग्रेस विचारधारा आत्मसात करू शकले नाहीत. काँग्रेसने असे भुसा भरलेले नेते वाढवण्यापेक्षा वैचारिक पाया भक्कम असलेले कार्यकर्ते, नेते घडवायला हवेत. (Kunal Patil)

-डॉ. विजय चोरमारे

धुळे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या चुडामण पाटील यांना १९६२ च्या निवडणुकीत एक लाख ४८ हजार ४५२ मतं मिळाली होती. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील फुलपूर मतदारसंघातून लढलेल्या पंडित नेहरू यांना एक लाख १८ हजार ९३१ मते मिळाली होती. विक्रमी मते मिळवलेल्या चुडामण पाटील यांची त्यावेळी दस्तुरखुद्द पंडित नेहरू यांनी दखल घेतली होती. निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनावेळी सभागृहातच त्यांनी ‘कौन है ये चुडामण पाटील,’ अशी विचारणा केली होती. नेहरूंनी त्यांना वैयक्तिक भेटीसाठी बोलावले आणि त्यांच्याकडून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तसेच धुळे मतदार संघाबाबतही जाणून घेतले होते.

चुडामण आनंदा पाटील यांनी १९६२, १९६७ आणि १९७२ अशा तीन निवडणुका धुळे लोकसभा मतदारसंघातून जिंकल्या. चुडामण पाटील यांचे पुत्र रोहिदास पाटील सातवेळा निवडून आले, अनेक वर्षे मंत्री राहिले. रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील २०१४ आणि २०१९ यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु २०२४ मध्ये पराभव होताच, अवघ्या वर्षभरातच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 

भुरट्या नेते-कार्यकर्त्यांचे महत्त्व का वाढले?

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये अक्षरशः रांग लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे अनेक भुरट्या नेते-कार्यकर्त्यांचेही महत्त्व वाढले आहे. एरव्ही ज्यांचा पक्षप्रवेश जिल्ह्याच्या ठिकाणी झाला असता अशा तालुका पातळीवरच्या नेत्याच्या प्रवेशालाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहू लागले आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाला आपली कामगिरी दाखवायची आहे. विधानसभेला मिळालेला जनाधार कसा टिकून आहे किंवा वाढला आहे, हे दाखवून द्यायचे आहे. त्याचमुळे विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते अजितदादांच्या पक्षात येत आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते एकनाथ शिंदेंच्या पक्षात येत आहेत. तर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. याला काही अपवाद आहेत. परंतु सर्वसाधारणपणे सूत्र असे आहे. सत्ताधारी महायुतीतल्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची उदाहरणेही आहेत.

आयुष्यभर काँग्रेसचा लाभ घेतलेल्यांचा निर्लज्जपणा

या सगळ्यातली गंभीर गोष्ट म्हणजे आयुष्यभर काँग्रेसचे लाभ घेतलेली मंडळी निर्लज्जपणे भाजपमध्ये जाताना दिसत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याची वाट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशस्त केली. विधानसभा निवडणुकीनंतर संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडली. आता कुणाल पाटील काँग्रेस सोडत आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे दीर्घकाळ काँग्रेसमध्ये आमदार, मंत्री होते. कुणाल पाटील यांची परंपरा त्याहून मोठी आहे. सुमारे साठ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या घराण्यातील कुणाल पाटील यांना विधानसभेच्या पराभवानंतर एक वर्षही चैन पडला नाही. विरोधात राहून संघर्ष करण्याची कुणाची तयारीच नाही, हे यावरून दिसते.

सत्तेच्या वळचणीला जाण्याची अगतिकता

प्रत्येकाला सत्ता पाहिजे, सत्ता नसेल तर सत्तेच्या वळचणीला तरी आपण असायला पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. खरेतर लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघातून शोभा बच्छाव निवडून आल्या आहेत. अर्थात मालेगावच्या अधिक्यावर त्या निवडून आल्या आहेत. बाकी धुळ्याची जहागिरी असलेल्या कुणाल पाटील यांच्या घराण्याला स्वतःच्या मतदारसंघापलीकडे फार काही जोपासता, वाढवता आले नाही. तरीसुद्धा उत्तर महाराष्ट्रातील आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांचे कौतुक केले जाऊ लागले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांना स्वतःची जागा राखता आली नाही. धुळ्यातील पाच पैकी चार आमदार भाजपचे आणि एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. भाजपच्या राम भदाणे यांनी कुणाल पाटील यांचा पराभव केला. भाजपकडून पराभव पत्करूनही त्यांनी भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घेतला आहे, यावरून सत्तेच्या वळचणीला जाण्याची त्यांची अगतिकता लक्षात येते. २०१४ साली ते आमदार म्हणून निवडून आले. भाजपचे सरकार सत्तेवर आले. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर एक वर्षही त्यांना चैन पडला नाही.

सहा दशकांपासून अधिक काळ काँग्रेसच्या विचारधारेत वाढलेला नेता भाजपमध्ये जातो. यावरून काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण करण्याकडे किती दुर्लक्ष केले याची कल्पना येऊ शकते. सहा दशके घरात काँग्रेस आहे. आजोबा पंडित नेहरूंचे निकटवर्तीय होते. वडील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. आणि स्वतः कुणाल पाटील राहुल गांधी यांच्या निकटचे म्हणून ओळखले जात होते. तरीही ते काँग्रेस सोडतात. ज्या भाजपविरोधात राहुल गांधी संघर्ष करताहेत, त्या भाजपमध्ये सहजपणे प्रवेश करतात. काँग्रेसमध्ये काही भाजपचे एजंट असल्याचे विधान मध्यंतरी राहुल गांधी यांनी केले होते. भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले असे नेते हे खऱ्या अर्थाने काँग्रेसमधील भाजपचे एजंट आहेत. असे आणखी कोणकोण एजंट आहेत, त्यांच्यावर पक्षाने बारीक नजर ठेवायला हवी.

आपली पक्षावर नाराजी नाही, आपण फक्त विकास कामांसाठी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

आता भाजपमध्ये जाताना त्यांना काँग्रेसची काळजी वाटू लागली आहे. त्याचमुळे महाविकास आघाडीमध्ये राहून काँग्रेस कधीही वाढू शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्ष जर आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असेल तर ते जिंकू शकतील. महाविकास आघाडीमध्ये राहून कधीही जिंकू शकणार नाही, असा दावा पाटील यांनी केला. महाविकास आघाडी असतानाही कुणाल पाटील स्वतःच्या मतदारसंघात निवडून येऊ शकले नाहीत, तिथे फक्त काँग्रेस असती तर काय त्यांची परिस्थिती झाली असती याचाही विचार करण्याची गरज आहे.

कुणाल पाटील यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भाजपामध्ये राहूनच विकास होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली विकासकामं वेगानं होत आहेत आणि म्हणूनच आपण भाजपामध्ये प्रवेश करीत आहोत. त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षात देखील विकास झाला, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने विकास पुढे होईल असं वाटतं नाही, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे काय हे त्यांनाच माहीत. कुणाल पाटील भाजपमध्ये गेले. आजोबा, वडिलांपासूनच्या सहा दशकांचा काँग्रेसचा वारसा त्यांनी अरबी समुद्रात बुडवला. साठ वर्षे घरात काँग्रेस असूनही ते काँग्रेस विचारधारा आत्मसात करू शकले नाहीत. काँग्रेसने असे भुसा भरलेले नेते वाढवण्यापेक्षा वैचारिक पाया भक्कम असलेले कार्यकर्ते, नेते घडवायला हवेत. सत्ता मिळायला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण ही बैठक पक्की केल्याशिवाय पुढची लढाई लढता येणार नाही. भाजपविरोधातील लढाई जिंकण्यासाठी केवळ संख्याबळ नव्हे, तर वैचारिक पाया भक्कम असलेले कार्यकर्ते हवे आहेत.

हेही वाचा :
‘शक्तीपीठ’ विरोधात १२ जिल्ह्यात चक्काजाम
‘मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही…’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00