जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरए) भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करून पाच कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले. अजित आचरेकर असे त्याचे नाव असून या कारवाईमुळे विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली असून आचरेकरचे भाजपा नेत्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. (BJP office-bearer arrested in gold smuggling case)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून काहीजण मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती डीआरआयच्या गुप्त वार्ता विभागाला मिळाली. त्यांनी ‘ऑपरेशन अल्केमिस्ट’ अंतर्गत शनिवारी पहाटे सापळा रचून आचरेकर याच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पथकाकडे ३.२ किलो परदेशी बनावटीचे २४ कॅरेट सोने जप्त केले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे पाच कोटी रुपये आहे. आचरेकर व त्याच्या साथीदारांनी हे सोने मेणाच्या (Wax) स्वरूपात लपवून विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना विमानतळावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती असून डीआरआयचे पथक या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार आणि इतर संशयितांचा शोध घेत आहे. (BJP office-bearer arrested in gold smuggling case)
राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
. सोने तस्करीमध्ये भाजपाचा पदाधिकारी अजित आचरेकरवर झालेल्या कारवाईनंतर विरोधकांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स वर आचरेकरचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजप पक्षात स्वागत करत असल्याचा फोटो पोस्ट करून म्हटले आहे की, चव्हाण यांचे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते. कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली. त्यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर काल रात्री मिळाले. चव्हाण हे मधल्या काळात अचानक मुंबई विमानतळावर कामगार संघटनेच्या कामात घुसले. त्यांनी इतर संघटना फोडून विमानतळावर नियंत्रण मिळवले. गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्या व पोसल्या.
आणि आता त्याच लोकाना सोने तस्करी प्रकरणात डीआरआय ने अटक केली आहे! भाजपा पैसा कुठून कमावतो, हे उघड होईल. फोटोत भाजपा अध्यक्ष ज्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, त्यांना डीआरआय ने अटक केली आहे! महाराष्ट्र या लोकांनी नासवलं आहे! फडणवीस, आता तरी गंभीर व्हा!, असा टोला लगावला आहे. (BJP office-bearer arrested in gold smuggling case)