कोल्हापूर : प्रतिनिधी : होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना बॅट, दांडके आणि बेल्टने मारताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा शैक्षणिक संस्थेने केला असला तरी होस्टेलच्या रेक्टरने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शिक्षण विभाग आणि पोलिस या प्रकाराचा तपास करत आहेत. (Talsande)
व्हायरल झालेला व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील श्री शामराव पाटील निवासी आणि अनिवासी शिक्षण संस्थेच्या होस्टेलमधील आहे. त्यामध्ये एक मुलगा मुलांना प्लास्टिकच्या बॅटने मारत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओळीने उभारलेल्या लहान मुलांना बॅट, दांडके आणि पट्ट्याने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ दोन महिन्यापूर्वीच असल्याची चर्चा आहे. पण याच संस्थेतील रेक्टरविरोधात विदयार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा नोंद झाल्यावर मारहाणीचे व्हिडोओ व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे. (Talsande)
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात सनी गौतम मोहिते (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा सिद्धीविनायक सनी मोहिते (वय १६ रा. उचगाव ता. करवीर) हा शामराव पाटील शाळेमध्ये दहावीत शिक्षण घेत आहे. सहा ऑक्टोबर रोजी सिद्धीविनायक मोहिते आणि त्याच्याच वर्गातील पृथ्वीराज कुंभार यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले. या भांडण्यात रेक्टर राहूल कोळी यांनी दोघांना ताकीद दिली. रेक्टर कोळी यांनी पी.टी. परेडच्यावेळी स्टेजवर पीव्हीसी पाईपने सिद्धीविनायक मोहिते याला बेदम मारहाण केली. पाइपने मारहाण केल्याने त्याच्या पार्श्वभाग, डोके आणि पाठीवर वळ उठले आहे. त्याच्या पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रेक्टर राहूल कोळी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (Talsande)
दरम्यान जिल्हा शिवसेना प्रमुख रवीकिरण इंगवले यांनी शैक्षणिक संस्थेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दोषी विद्यार्थ्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली. दोषी विद्यार्थ्यांची बालसुधारगृहात रवानगी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Talsande)