कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने दूध उत्पादकांना ११३ कोटी ६६ लाखाची दिवाळी भेट जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम खात्यावर जमा होणार असल्याने यंदा दूध उत्पादकांची दिवाळी दणदणीत साजरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Diwali 2024)
दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास गोकुळकडून अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळमार्फत म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी ११३ कोटी ६६ लाख रुपये इतकी उच्चांकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँकेतील खात्यावर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ११ ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार आहे. गोकुळच्या लाखो दूध उत्पादकांना दिलेली दिपावली भेट आहे.” अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
एक एप्रिल २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर अडीच रुपये व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर दीड रुपयांप्रमाणे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. यापैकी प्रतिलिटर २५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे. (Diwali 2024)
यावर्षी गोकुळने म्हैस दूधाकरीता ५८ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपये तर गाय दूधाकरीता ३४ कोटी ७० लाख ९३ हजार रूपये इतका दूध दर फरक देण्यात येणार आहे. दर फरकावर सहा टक्के प्रमाणे होणारे व्याज तीन कोटी २० लाख ३५ हजार व डिंबेचर व्याज ७.७०% प्रमाणे ८ कोटी ९६ लाख ६६ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११% प्रमाणे डिव्हिडंड ८ कोटी १६ लाख ८९ हजार रूपये असे एकूण ११३ कोटी ६६ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली.
या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या ७,९२७ दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. गोकुळने प्रतिदिनी दूध संकलनाचा १८ लाख ४२ हजार लिटरचा टप्पा ओलाडला असून दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात रमजान ईद सणानिमित्या २२ लाख ३१ हजार लिटरची दूध विक्री केली आहे. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास ५८ रुपये ५४ पैसे तर गाय दूध उत्पादकास ३८ रुपये ३७ पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दरफरकासह मिळाला आहे.
हेही वाचा :