विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित

कोल्हापूर, प्रतिनिधीः माझ्याविरोधात राजेश लाटकर आहेत की सतेज पाटील याची पर्वा मी करीत नाही, विकासकामे आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरा जात असल्याने निवडून येण्यात मला कसलीही अडचण वाटत नाही, अशा विश्वास कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी महाराष्ट्र दिनमानला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

गेल्या पाच वर्षांत आमदार नसतानाही सरकारच्या माध्यमातून आपण कोट्यवधींचा निधी कोल्हापूरसाठी आणला आहे. रंकाळा सुशोभिकरणापासून पूर नियंत्रण प्रकल्पापर्यंत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. विकासकामांचा डोंगर घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना दुभंगली असल्याकडे लक्ष वेधले असता क्षीरसागर म्हणाले,  २००४ ला नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी कोल्हापुरातून शिवसेना संपली असे मानले जात होते. मोठ्या धडाडीने शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना वाढवण्याचे काम मी केले. एकाचे तीन आमदार केले, तीनाचे सहा आमदार केले. आज एकत्रित शिवसेना म्हणून माझ्याकडे पाहिले जाते. आणि आता जे शिंदे साहेबांच्या शिवसेनेत, पदाधिकारी आहेत ते हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे आहेत. बाकीचे जे काही आहेत त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तुमची खूप जवळीक आहे,त्याचा तुम्ही कोल्हापूरसाठी कसा उपयोग करून घेतला, या प्रश्नावर ते म्हणाले, कोल्हापूरची जनता सूज्ञ आहे. मित्रा संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राबरोबरच कोल्हापूरसाठी काम केले. कोल्हापुरात पूर परिस्थितीमुळे हजारोंचे नुकसान होते, त्यासाठी पूर नियंत्रण प्रकल्प कोल्हापुरात आणला. वर्ल्ड बँकेचे २७०० कोटी आणि महाराष्ट्र  सरकाचे ५०० कोटी असा ३२०० कोटींचा प्रकल्प कोल्हापुरात आणला. या माध्यमातून आता जिथे पाणीच नाही तिथे पाणी पाठवणार आहेत. राधानगरी सारखे स्वयंचलित दरवाजे नियंत्रित करणार आहोत. शिरोली सारख्या ठिकाणी पिलर उभे करणार आहोत जेणेकरून पाण्याची फूग कमी होईल.

काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार विरोधात नाही त्याबाबत क्षीरसागर म्हणाले, लोकांना माहिती आहे की, काँग्रेसच्या अंतर्गत खूप मोठा गोंधळ आहे. कोल्हापुरात उमेदवारी पहिल्यांदा जाहीर केली नंतर बदलली. अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली. त्याचा निश्चित फायदा होईल. कोल्हापुरात कोणीही उभे राहिले तरी माझी विकासकामे व सर्वसामान्य माणसाच्या पाठबळावर मी लोकांसमोर जाणार आहे. मतदार संघात विरोधकांचे बूथ अनेक ठिकाणी लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे.

विरोधकांकडून होणा-या आरोपांसंदर्भात विचारले असता क्षीरसागर म्हणाले, रस्ते प्रकल्पावरून खोटे आरोप करीत आहेत, परंतु सत्य लोकांना ठाऊक आहे. मी शिवसेनेच्या माध्यमातून प्रामणिकरणे काम करतो. विविध माध्यमांतून अनेकांना मदत करतो. एखाद्यावर अन्याय झाला तर मला सहन होत नाही. माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करणा-यांना मला सांगायचे आहे की, मी अन्यायाविरुद्द लढणारा कार्यकर्ता आहे. सामान्य माणसांवर अन्याय होत असेल तर त्याच्या मदतीसाठी मी तत्पर असतो. वस्तुस्थिती लोकांना माहीत आहे, त्यामुळे विरोधकांचे खोटे नरेटिव्ह यावेळी चालणार नाही.

रंकाळा सुशोभिकरणाच्या कल्पनेबाबत ते म्हणाले, २०१९ ला झालेला माझा पराभव तत्कालीन नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना पचला नाही, त्याचे त्यांना दुःख झाले. महापुराच्या वेळी १५ दिवस पूर परिस्थतीत ते माझ्या बरोबर होते, त्या काळात मी केलेले काम त्यांनी पाहिले होते. नगरविकास मंत्री झाल्यावर कोल्हापूरचा पहिला दौरा त्यांनी केला. त्यावेळी रंकाळा पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ वीस कोटी मंजूर केले. रंकाळ्याचा डीपीआर तयार होता. त्यामध्ये नंतरच्या काळात आणखी पाच कोटी मंजूर केले. ठरवले तर खूप काही करता येते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी