सिडनी : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाहीत. हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी दिली. (Cummins)
चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीपुढे अंतिम संघ सादर करण्याची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत आहे. ऑस्ट्रेलियाने मागील महिन्यात प्राथमिक संघ जाहीर केला होता. त्या संघात आतापर्यंत चार बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श हा अगोदरच पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून बाहेर पडला होता. कमिन्स घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असून सध्या सुरू असणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळलेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो या दुखापतीतून सावरेल, अशी निवड समितीस आशा होती. तथापि, तो अद्याप पूर्णत: फिट नसल्याने त्याला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. (Cummins)
जोश हेझलवूडच्या कमरेचे स्नायू दुखावल्याने तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी अष्टपैलू खेळाडू मार्नस स्टॉइनिसने वन-डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्याच्याजागीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नव्या खेळाडूची निवड करावी लागणार आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध दोन वन-डे सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी निवडलेल्या संघामध्ये वेगवान गोलंदाज शॉन ॲबॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि बेन ड्वॉर्शुझ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, फिरकीपटू तन्वीर सांघा, अष्टपैलू कूपर कॉनॉली आणि फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगुर्क हेसुद्धा या संघामध्ये आहेत. आता यांच्यापैकीच चौघांची निवड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघामध्ये करण्यात येऊ शकते. (Cummins)
सध्या स्टीव्ह स्मिथ हा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. तो आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यापैकी एकाकडे श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांसाठी व चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधारपदाची धुरा देण्यात येईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये खेळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच्या दोन वन-डे सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. (Cummins)
हेही वाचा :