प-यांच्या देशात हरवलेल्या बबिताचे गूढ

नैनितालः उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या प-यांच्या देशात हरवलेल्या एका राजकुमारीची चर्चा सुरू आहे. गेल्या चाळीस दिवसांपासून उत्तराखंडच्या डोंगररांगामध्ये गायब झालेल्या तरुणीच्या शोधासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न चालवले आहेत. परंतु ना तिचा शोध लागत आहे, ना काही धागादोरा सापडत आहे. त्यामुळे साहजिकच या हरवण्याचे गूढ वाढले आहे. आणि त्यासंदर्भातील दंतकथांना पूरक अफवांजा बाजार गरम झाला आहे. (babita pandey missing case)

नैनितालची २४ वर्षीय एमबीएची विद्यार्थिनी बबिता पांडे उत्तराखंडमधील प्रसिद्ध दयारा बुग्याल येथे ट्रेकिंगसाठी गेली होती. गेल्या ४० दिवसांपासून ती बेपत्ता आहे. २९ मे रोजी ती शेवटची दिसली होती. त्यानंतर तिचा कोणताही मागमूस लागलेला नाही. तिचा शोध घेण्यासाठी पोलीस, एसडीआरएफ, डॉग स्क्वॉड, लष्कर, ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. मात्र अद्याप तिचा किंवा तिच्याशी संबंधित कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे तिच्या गायब होण्याचे गूढ वाढत चालले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर विविध अफवा पसरू लागल्या आहेत. विशेषतः ‘पऱ्यांच्या देशा’शी संबंधित खैंट पर्वताची कथा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

‘पऱ्यांच्या देशा’ची अफवा नेमकी काय?

स्थानिक लोक खैंट पर्वताला ‘पऱ्यांचा देश’ म्हणून ओळखतात. तेथील एका फलकावरही अशी नोंद करण्यात आली आहे. स्थानिक लोककथांनुसार रात्रीच्या वेळी या पर्वतावर रहस्यमय प्रकाश दिसतो. जंगलात एकटे गेलेल्या व्यक्तींना पऱ्या किंवा वनदेवी आपल्या ताब्यात घेतात आणि त्या व्यक्ती रहस्यमयरीत्या गायब होतात, अशी समजूत आहे. (babita pandey missing case)

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग, चमोली आणि टिहरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही चैत्र महिन्यात वनदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. गावात कोणतीही अनिष्ट घटना घडू नये, यासाठी ही पूजा केली जाते.

मात्र या दंतकथांना कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही. या केवळ पिढ्यान् पिढ्या सांगितल्या जाणाऱ्या लोककथा आहेत. अशा घटना कुणी प्रत्यक्ष पाहिल्याचा पुरावा उपलब्ध नाही.

बबिता पांडे प्रकरणाशी या कथांचा संबंध आहे का?

सोशल मीडियावर बबिता पांडेला पऱ्या घेऊन गेल्याची चर्चा सुरू असली तरी उपलब्ध माहिती त्याला कोणताही आधार देत नाही.

यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे खैंट पर्वत आणि दयारा बुग्याल यांचा एकमेकांशी थेट संबंध नाही. (babita pandey missing case)

खैंट पर्वत हा टिहरी गढवाल जिल्ह्यातील चौंदाणा गावाजवळ आहे, तर बबिता ज्या दयारा बुग्याल परिसरातून बेपत्ता झाली तो उत्तरकाशी जिल्ह्यात आहे. दोन्ही ठिकाणांमधील अंतर १०० किलोमीटरहून अधिक आहे.

म्हणूनच ‘पऱ्यांच्या देशा’ची कथा आणि बबिता पांडे हिचे बेपत्ता होणे यांचा थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

नेमके काय घडले? (babita pandey missing case)

उधमसिंह नगरचा हरमनपाल सिंह आणि उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरचा हरमनप्रीत सिंह या आपल्या दोन मित्रांसह बबिता पांडे उत्तरकाशी येथे ट्रेकिंगसाठी गेली होती. हर्षिल, गंगोत्री आणि परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर २८ मे रोजी तिघे रैथल गावात थांबले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बबिता या दोन्ही मित्रांसोबत याठिकाणी शेवटची दिसली. (babita pandey missing case)

२९ मे रोजी त्यांनी रैथलहून दयारा बुग्यालकडे ट्रेक सुरू केला. रात्री ते गोई बेस कॅम्प येथे थांबले. त्याच रात्री, मध्यरात्रीनंतर बबिता रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली. तेव्हापासून तिचा कोणताही मागमूस लागलेला नाही.

तपासात उघड झालेली धक्कादायक बाब

या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली.

उत्तरकाशी पर्यटन विभागाच्या ‘एक्सप्लोर उत्तरकाशी’ या अधिकृत पोर्टलवर बबिता पांडे किंवा तिच्या दोन सहकाऱ्यांच्या नावाची वैध डिजिटल ट्रेकिंग परवानगीच नव्हती. जिल्हा पर्यटन अधिकारी के. के. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ट्रेकिंग एजन्सीमार्फत हे तिघे गेले होते, त्यांनी शासनाचे नियम मोडले.

दररोज केवळ १५० ट्रेकर्सना परवानगी देण्याचा नियम असताना एजन्सीने जुन्याच कागदी परवान्यावर बबिता आणि तिच्या सहकाऱ्यांची नावे चिकटवली होती. चेकपोस्टवर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यात जुन्या ट्रेकर्सचीच माहिती दिसत होती. त्यामुळे संपूर्ण ट्रेकिंग प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने पार पडल्याचे तपासात उघड झाले आहे.

शोधमोहीम अद्याप सुरू

बबिता पांडे यांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत पोलीस, एसडीआरएफ, लष्कर, डॉग स्क्वॉड, ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली आहे. मात्र ३८ दिवस उलटल्यानंतरही तिचा कोणताही ठोस मागमूस सापडलेला नाही.

बबिता गायब झाली त्या रात्री तिच्यासोबतचे दोन मित्र मद्यपान करीत होते. त्या दरम्यान ती बाहेर फेरफटका मारत होती. मद्यपान करता करताच दोघे तंबूमध्ये झोपून गेले. त्यांना बबिताचा विसर पडला. सकाळी उठून पाहिल्यानंतर बबिता नसल्याचे लक्षात आले आणि त्यांचे धाबे दणाणले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी व्यापक पातळीवर शोधमोहीम सुरू केली. आपण मैत्रिणींसोबत फिरायला जात असल्याचे बबिताने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते, त्यामुळे कुटुंबीयांनी कुठलीही हरकत घेण्याचे कारण नव्हते. मात्र प्रत्यक्षात ती दोन मित्रांसोबत फिरायला बाहेर पडली होती. पोलिसांनी तिच्यासोबतच्या दोन्ही मित्रांची कसून चौकशी केली, परंतु त्यांच्याकडून काहीही संशयास्पद माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना ताब्यात किंवा अटक केलेली नाही.

बबिताला जंगली प्राणी घेऊन गेले, की जंगलात फिरताना रस्ता चुकून भलतीकडेच भरकटली, तिच्यासमवेत आणखी काही गंभीर प्रकार घडला की तीच कुठं परस्पर निघून गेली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासूनही कोणत्याही प्रकारचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे बबिताच्या गायब होण्याचे गूढ वाढले आहे. (babita pandey missing case)

या रहस्यमय बेपत्ता प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपास यंत्रणा सर्व शक्यतांचा तपास करत आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा आणि लोककथांपासून दूर राहून अधिकृत तपासाच्या निष्कर्षांची प्रतीक्षा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र बबिताचा शोध लागेपर्यंत प-यांच्या देशाची अफवा कमी होण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.

Related posts

व्हिएतनाममध्ये ३२ भारतीय पर्यटकांची बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू

सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली राम मंदिर देणगी चोरीची चौकशी करा – कन्हैया कुमार

खंडणीसाठी उद्योगपतीच्या बंगल्यावर गोळया झाडणाऱ्या चौघांचा एनकाऊंटर