नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाटला देशातंर्गत स्पर्धामध्ये खेळण्यापासून रोखल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघाला चांगलेच झापले आहे. आई होणे हा गुन्हा नाही. आपल्या देशात मातृत्वाचा सन्मान केला जातो. ही बाब एकाद्या खेळाडूच्या विरोधात वापरली जाऊ शकत नाही. अशी भूमिका न्यायालयाने मांडली. (Court Raps Wrestling Federation Over Vinesh Phogat Issue)
कुस्ती महासंघाने फोगाटला २६ जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली आहे. तिला अपात्र ठरवताना महासंघाने असा दावा केला होता की, डोपिंगविरोधी नियमांनुसार निवृत्तीतून परतणाऱ्या खेळाडूंना सहा महिन्याची पूर्वसूचना देण्याची आवश्यकता आहे. जुलै २०२५ मध्ये आई झाल्यानंतर पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या विनेशने गोंडा येथील राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेत भाग घेतला होता. महासंघाच्या निर्णयाविरोधात विनेशने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्यक्ष आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने विनेश फोगाट प्रकरणात तज्ज्ञ समिती स्थापन करावी, असा आदेश केंद्र सरकारला दिला. मातृत्व रजेनंतरही परतणाऱ्या विनेशला आगामी आशियाई खेळांच्या चाचणीत भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे. (Court Raps Wrestling Federation Over Vinesh Phogat Issue)
कोर्टाने असे म्हणले की, विनेश जुलै २०२५ आई झाली. आता मे महिना आहे. ती आंतरराष्ट्रीय ख्यातीची कुस्तीपटू आहे. तिच्यासाठी तुमच्यात वाद किंवा मतभेद असतील पण क्रीडा जगताचे नुकसान होता कामा नये. देशात मातृत्व साजरे केले जाते. याची किंमत एकाद्याला का भोगावी लागावी. परिपत्रकात झालेल्या बदलांमुळे सर्व काही स्पष्ट होते. असे वर्तन करु नका. हे खेळाच्या हिताचे नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. केंद्र सरकारने तज्ज्ञांची समिती नियुक्ती करुन निर्णय द्यावा. तिला अशियाई चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी दिली पाहिजे, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. (Court Raps Wrestling Federation Over Vinesh Phogat Issue)