कन्व्हेन्शन सेंटरमुळे जिल्ह्याचा कायापालट होईल : महेश जाधव

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांसह सामाजिक कामांचा धडाका लावला आहे. राजाराम तलावाकाठी आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरमुळे केवळ शहराचा नव्हे तर जिल्ह्याचा कायापालट होईल, असा विश्वास भाजपाचे सचिव महेश जाधव यांनी व्यक्त केला. (Rajesh Kshirsagar)

कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे प्रचारसभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. महेश जाधव म्हणाले, जिल्ह्यात औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी आदी क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. याअनुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामूहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. याचा विचार करून क्षीरसागर यांनी कोल्हापुरात कन्व्हेन्शन सेंटर व्हावे यासाठी पाठपुरावा केला.

भाजप महानगर अध्यक्ष  विजय जाधव म्हणाले, राजेश क्षीरसागर यांनी मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी याबाबत नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कन्व्हेंशन सेंटरसाठी राजाराम तलाव येथील जागा प्रस्तावित केली आहे. (Rajesh Kshirsagar)

गेल्या अडीच वर्षापासून क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात कामाचा धडाका लावला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणून कोल्हापूरचे नवे विकासपर्व सुरु केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर पूरस्थिती नियंत्रणासाठी ३२०० कोटी रुपये , रस्त्यांसाठी  १०० कोटी, अमृत २.० योजनेतून.२९१ कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी, रंकाळा सुशोभीकरणासाठी २५ कोटी, मुलभूत सोई सुविधासाठी २५ कोटी रुपये अशा अनेक कामांचा समावेश असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले.  यावेळी शिवसेना उपनेत्या आमदार जयश्री जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, दीपक चव्हाण, मंदार तपकिरे, अंकुश निपाणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी