Consciousness in children : श्रीमंत बाप, गरीब बाप

Consciousness in children

मित्रांनो माझ्या या लेखामध्ये पालकांना एक साधा सरळ आणि सोपा प्रश्न विचारणार आहे. तुमच्या मुलांमध्ये “जाणीव” आहे का?? (Consciousness in children)

-अजय पाटील

देशाबद्दल, समाजाबद्दल, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल जाणीव असणे खूप मोठी गोष्ट आहे मात्र त्याबद्दल मी विचारणार नाही. पालक म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी जे करत आहात त्याची तुमच्या मुलांना जाणीव आहे का??

यासाठी गेल्या महिनाभरात माझ्यासमोर आलेली दोन उदाहरणं तुमच्यासमोर मांडणार आहे. (Consciousness in children)

  1. माझ्या चांगल्याच परिचयाचे असलेल्या प्रतिष्ठित डॉक्टरांचे मला बोलावणे आले. चाइल्ड काऊन्सलर म्हणून मी त्यांच्या मुलाशी संवाद साधावा अशी त्यांची इच्छा होती. पार्श्वभूमी विचारल्यावर ते म्हणाले. तो अकरावी मध्ये असून नुकतेच त्याने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आहे मात्र त्याला डायरेक्ट ५००० रुपयांचे रॅकेट हवे आहे. मी त्याला खूप समजावले की सुरुवात स्वस्त रॅकेट घेऊन कर मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मी खूप गरीबीत दिवस काढले खूप कष्ट करून इथपर्यंत आलो. माझ्या मुलाला मात्र डायरेक्ट महागड्या वस्तू हव्या असतात. त्याच्या मित्रांनी कोणतीही वस्तू विकत घेतली की त्यालाही ती हवी असते. इतरांचा ‘हेवा’ करताना आई-वडील म्हणून आमचे मत विचारात घेण्याची गरज त्याला भासत नाही. (Consciousness in children)

हे श्रीमंत वर्गात मोडणारे गृहस्थ. ते आणि त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतात. मोठं चार मजली हॉस्पिटल, त्यातील वरचे दोन मजले घर, पैसा, इस्टेट आणि कार वगैरे सर्व सुखसुविधा त्यांच्या पायाशी लोळण घेत असताना त्यांची खंत हीच की त्यांच्या मुलाला कशाचीही ‘जाणीव’ नाही.

  • दुसरं उदाहरण माझ्या स्वतःच्या मूळ गावातीलच. गावातील शेतमजूर असलेली व्यक्ती त्याच्या २० वर्षाच्या मुलाने मोटरसायकल घेतली म्हणून पेढे घेऊन आला. मी त्याचं अभिनंदन केलं तर तो अभिमानाने सांगायला लागला पोराने शेतात राबून स्वतःच्या मेहनतीने मोटरसायकल घेतली म्हणून. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर असीम आनंद होता. ही त्यांच्या कुटुंबातील आजवरची पहिलीच मोटरसायकल. ती पण त्याच्या पोराने ३ शेतकऱ्यांच्या शेतात कष्ट करून घाम गाळून विकत घेतलेली. शिवाय शेतमजुरी सोबतच हा मुलगा शहरात जाऊन कॉलेजमध्ये शिक्षण पण घेतोय. (Consciousness in children)

वडिलांना ५००० रुपयाची रॅकेट मागणारा डॉक्टरांचा मुलगा आणि स्वतःच्या मेहनतीने मोटरसायकल विकत घेणारा शेतमजुराचा मुलगा. यामध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जाणीव नसणे आणि जाणीव असण्यातील फरक.

डॉक्टर आणि त्यांची पत्नी स्वतः मेहनत करत आहेत आणि मुलाला मात्र सर्व आयतं, मुबलक स्वरूपात देत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलात आपल्या पालकांबद्दल, आपल्याला मिळणाऱ्या सुविधांबद्दल जाणीव निर्माणच होत नाहीये. दुसरीकडे आपल्या आई-वडिलांसोबत शेतात राबणाऱ्या मुलामध्ये मात्र ती जाणीव आहे. याचे कारण तो आपल्या आई-वडिलांना कष्ट उपसतांना बघतो आहे. शिवाय त्याला आयतं काहीच मिळत नाही तर त्यालाही त्यांच्यासोबत शेतात राबावे लागते.

मुलांना सर्व आयतं, पटकन आणि मुबलक मिळत राहिलं की आपल्या पालकांना या सुविधांसाठी काय संघर्ष करावा लागतो याची जाणीव त्यांच्यात निर्माण होत नाही. याउलट त्यांची नकार ऐकण्याची क्षमता संपुष्टात येते. त्यांच्यात पोकळ अहंकार निर्माण होतो. आणि कोणत्याही गोष्टीसाठी नकार देणारा त्यांना आपला शत्रू वाटायला लागतो. एक चाइल्ड काऊन्सलर म्हणून मी सर्व पालकांना सांगतो तुम्ही जे काम करता तिथे तुमच्या मुलांना नक्की घेऊन जा. तुम्ही त्यांना सुविधा पुरवण्यासाठी जे कष्ट करता ते मुलांना कळू द्या. तुमचे बालपण संघर्षात गेले असेल त्यामुळे मुलांना संघर्ष करू द्यायचा नाही हा विचार खूप चुकीचा आहे. मुलांना सर्वच आयतं देऊ नका, त्यांनी मागितले की लगेच देऊ नका थोडा वेळ घ्या. त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्नही करू नका. ही मुबलकता मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम करते.

एक लक्षात घ्या ‘‘संघर्षातूनच जाणिवेचा उगम होत असतो.’’

फुलपाखरू जेव्हा कोशातून बाहेर पडते तेव्हा त्याला कोश आतून फोडावा लागतो. तेव्हाच त्याच्या पंखांमध्ये उडण्याची ताकद निर्माण होते. तुम्ही तो कोश त्याला बाहेरून फोडून दिला तर फुलपाखरू मरून जाते.

सर्व गोष्टी आयत्या आणि मुबलक देत राहिला तर मुलं तकलादू बनतील आणि भविष्यात कठीण परिस्थिती आली तर कोलमडून पडतील.

मला दोन बाप भेटले. पैशाने श्रीमंत असलेला आणि पैशाने गरीब असलेला. मात्र माझ्यासाठी ज्याच्या मुलांमध्ये आपल्या पालकांबद्दल जाणीव जिवंत आहे तो बाप श्रीमंत आहे. आणि ज्याच्या मुलांमध्ये ही जाणीव निर्माणच झालेली नाही तो बाप गरीब.

आता सांगा तुम्ही पालक म्हणून श्रीमंत आहात की गरीब ?

 (चाइल्ड काऊन्सलर, जिंदगी फाउंडेशन, जळगाव)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर