काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या विदयमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आमदार जाधव यांच्या प्रवेशाने कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Kolhapur Politics)

दीपावलीच्या पहिल्या दिवशी आमदार जाधव आणि त्यांचे पुत्र सत्यजीत जाधव यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आमदार जाधव यांची शिवसेनेच्या उपनेत्यापदी निवड केली आहे. यावेळी खासदार धैर्यशिल माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. त्यानंतर २०२१ मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजीत कदम यांचा पराभव करत विजयश्री मिळवून दिली होती. २०२४ च्या निवडणूकीत आमदार जाधव निवडणूक लढवण्यास पुन्हा इच्छुक होत्या. त्यांच्यासह इच्छुकांनी मुलाखती दिल्या. पण काँग्रेसने माजी स्थायी समिती राजू लाटकर यांना उमेदवारी दिली. लाटकर यांच्या उमेदवारीला माजी नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर काँग्रेसने त्यांची उमेदवारी बदलून खासदार शाहू छत्रपती यांच्या स्नुषा मधुरिमाराजे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आमदार ऋतुराज पाटील, राहूल पाटील आणि मधुरिमाराजे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी काँग्रेसने मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्या रॅलीलाही आमदार जाधव अनुपस्थित होत्या. (Kolhapur Politics)

आमदार जाधव नाराज असूनही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून आमदार जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश करुन घेतला. आमदार जाधव यांना माननारा वर्ग मोठा असून त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी