Choksi PNB: चोक्सीला आणायचे आहे की त्यालाच यायचे आहे?

Choksi PNB

Choksi PNB

मेहुल चोक्सीच्या अटकेनंतर गोदी मीडियाला आनंदाचे भरते आले आहे. कसलीही किरकोळ गोष्ट घडली तरी मोदींचा मास्टरस्ट्रोक म्हणून भलावण केली जाते. (Choksi PNB)

प्रतिनिधी

सर्वसामान्य लोकांनी कितीही मोठ्या ब्रँडच्या दुकानातून सोने खरेदी केली तरी शेवटी आपल्या सोनाराकडे जाऊन त्याच्या खरेपणाची खात्री करून घेतात, असे प्रवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील सोने व्यापाऱ्यातील बड्या लोकांच्या बैठकीत झोडत होते. त्यावेळी त्या बैठकीत बसलेल्या एका व्यक्तिचा उल्लेख करून नरेंद्र मोदी म्हणाले, हमारे मेहुल भैय्या बैठे है…

देशाचे पंतप्रधान प्रतिष्ठितांच्या बैठकीत हमारे किंवा भैय्या असा उल्लेख कुणाही ऐऱ्यागैऱ्याचा करीत नाहीत. मोदींनी उल्लेख केलेले हे मेहुल भैय्या म्हणजेच मेहुल चोक्सी. १५ नोव्हेंबर २०१५ रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती. (Choksi PNB)

पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात फरारी असलेला हा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी. नुकतीच बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारताच्या तपास यंत्रणांनी बेल्जियमकडे प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. परंतु त्याला भारताच्या स्वाधीन केले जाईल किंवा नाही याबाबत अजूनही संदिग्धता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याला ‘हमारे मेहुल भय्या’ असे संबोधले होते, त्या मेहुल चोक्सीला अखेरच्या दिवसात मायदेशी सेवा मिळावी म्हणून त्याच्या इच्छेखातर त्याला भारतात आणले जात असल्याची चर्चा आहे. नेमके हे प्रकरण काय आहे?

बनावट हमीपत्रांद्वारे १३ हजार कोटींचा घोटाळा

पंजाब नॅशनल बँकेकडून बनावट हमीपत्रे घेऊन ती परदेशातील भारतीय बँकांच्या शाखांना सादर केली. त्यावर कोट्यवधींची कर्जे घेतली असा नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात पीएनबीचे काही अधिकारी व कर्मचारीही सामील असल्याचे उघडकीस आले. (Choksi PNB)

मेहुल चोक्सी हा मूळचा हिरे व्यापारी. चोक्सीने १९७५ मध्ये रत्न आणि दागिन्यांच्या व्यवसायात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८५ मध्ये त्याचे वडील चिनुभाई चोक्सी यांच्याकडून ‘गीतांजली जेम्स’ची धुरा स्वीकारली. त्यावेळी, ही कंपनी रफ आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवर काम करीत होती. भारतात चार हजार दुकाने असलेली ही कंपनी हिरे आणि दागिन्यांचा व्यवहार करत असे. २०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याचा आरोप मेहुल चोक्सीवर झाला. मुंबईतील फोर्टजवळच्या शाखेतील पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट हमीपत्रे जारी केली. त्याद्वारे परदेशातील भारतीय बँकांच्या शाखांना सादर करत कोट्यवधींची कर्जे घेण्यात आली. त्यानंतर ही कर्जे चुकवण्यात आली नाहीत. तब्बल १३ हजार कोटींचा हा घोटाळा उघडकीस आला. पीएनबी घोटाळा उघडकीस येण्याच्या काही दिवस आधी, जानेवारी २०१८ मध्ये चोक्सी देश सोडून पळून गेला. तपास संस्थांनी त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले आणि आतापर्यंत अनेक मालमत्ता जप्तही केल्या आहेत. (Choksi PNB)

भारत आणि बेल्जियम यांच्यात अनेक वर्षांपासून प्रत्यार्पणाचा करार आहे. पण चोक्सी कॅन्सरवरील उपचारांसाठी बेल्जियममध्ये आला आहे. त्यामुळे त्याला अटक आणि प्रत्यार्पणापासून संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात येणार असल्याचे चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले आहे. मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वा या कॅरेबियन देशाचा नागरिक तसेच रहिवासी आहे. नीरव मोदीनंतर चोक्सी हा या घोटाळा प्रकरणात दुसरा मुख्य आरोपी आहे.

… तर प्रत्यार्पण प्रक्रिया लांबणार

पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर चोक्सी फरारी आरोपी होता. गेल्या वर्षी तो बेल्जियममध्ये असल्याचे आढळले. वैद्यकीय कारणास्तव तो तिथे गेला होता. भारतातून पळून गेल्यानंतर अँटिग्वा येथे २०१८ पासून तो राहत होता. चोक्सीविरोधात इंटरपोलने बजावलेली ‘रेड कॉर्नर नोटीस’ काही काळापूर्वी मागे घेण्यात आली होती. तेव्हापासून प्रत्यार्पणाच्या माध्यमातून त्याला अटक करण्याबाबत भारताच्या यंत्रणांचे प्रयत्न सुरू होते. २०१८ व २०२१ मध्ये चोक्सीविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने काढलेले अटक वॉरंट बेल्जियमला प्रत्यार्पणाच्या विनंतीबरोबर दाखवले गेले. त्याच्या अटकेनंतर कागदपत्रांची औपचारिक पूर्तता करण्यात आली. असे असले, तरी चोक्सी वैद्याकीय कारणास्तव जामीन अर्ज करू शकतो. जामीन मंजूर झाल्यास चोक्सी पुन्हा अँटिग्वालाही जाऊ शकतो. तसे झाल्यास त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडू शकते. (Choksi PNB)

गोदी मीडियाला भरते

मेहुल चोक्सीच्या अटकेनंतर गोदी मीडियाला आनंदाचे भरते आले आहे. कसलीही किरकोळ गोष्ट घडली तरी मोदींचा मास्टरस्ट्रोक म्हणून भलावण केली जाते. मेहुल चोक्सीच्या अटकेनंतर मोदींचे ब्रह्मास्त्र असे एका गोदी चॅनलने म्हटले आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही नाचायला लागले आहेत.

मेहुल चोक्सीसारख्या फरारी गुन्हेगारांबाबत आणि भ्रष्टाचाराबाबत मोदी सरकारचे धोरण ‘झिरो टॉलरन्स’चे आहे. चोक्सीला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटले आहे. तर केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट असून मोदी सरकारच्या यशस्वी मुत्सद्देगिरीचा हा परिपाक आहे, असे म्हटले आहे.

सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा भारतीय बँकिंग इतिहासातील मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानला जातो. दागिने व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांची त्यात प्रमुख भूमिका होती. २०१८मध्ये हा घोटाळा उघडकीस येणार याची चाहुल लागताच दोघेही भारत सोडून पळून गेले. (Choksi PNB)

विशेष बाब म्हणजे, मेहुल चोक्सीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या मागणीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतील विशेष न्यायालयात केलेला अर्ज सात वर्षांपासून प्रलंबित आहे.

ईडीने जुलै २०१८ मध्ये चोक्सीला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या तरतुदींनुसार फरारी घोषित करण्याची आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. मात्र ईडीच्या अर्जात प्रक्रियात्मक त्रुटी असल्याचा आरोप मेहुल चोक्सीने केला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन (पीएमएलए) न्यायालय आणि उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीच्यावतीने केलेल्या विविध अर्जांमुळे या प्रकरणाला वारंवार विलंब होत आहे.

भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीनुसार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. मेहुल चोक्सीच्यावतीने बेल्जियमच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. कॅन्सरवर उपचार सुरू असल्यामुळे भारतात जाणे शक्य नसल्याचा युक्तिवाद केला जाऊ शकतो. न्यायलयाने त्याला जामीन दिल्यास त्याचे प्रत्यार्पण लगेच होऊ शकणार नाही. (Choksi PNB)

दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय यंत्रणांना मेहुल चोक्सीला भारतात आणायचे आहे की, मेहुल चोक्सीलाच अखेरच्या काळात आपल्या मायदेशी भारतात यायचे आहे…

कारण कॅन्सरवरील अद्ययावत उपचार भारतातही मिळू शकतात. आणि नरेंद्रभाई मोदी यांच्यासारखे कनवाळू पंतप्रधान असल्यामुळे भारतात आपली चांगली काळजी घेतली जाऊ शकते, अशीही खात्री त्यांना असू शकते.

मेहुल चोक्सीला खरोखर भारतात यायचे आहे  किंवा नाही यावरच पुढच्या गोष्टी घडणार आहेत. ब्रह्मास्त्र वगैरे सगळ्या गोष्टी झूट आहेत.

हेही वाचा :
पाच लुटेरे…
अलाहाबाद हायकोर्टाच्या टिप्पणीवर आक्षेप

Related posts

JD Vance Visit: ट्रम्प यांचा वर्षअखेरीस भारत दौरा

Athani murder : खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत

Congress Slams Bhandari: पोलिसांनी माधव भंडारींची चौकशी करावी